चिपळूण ( रत्नागिरी ) - राज्यातील शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी या महाविकास आघाडीचा कारभार ठीक चालताना दिसत नाही. भाजप सेनेची दुचाकी गाडी असती तर ती फास्ट धावली असती. मात्र तीनचाकी गाडी फार मोठा पल्ला गाठेल असे वाटत नाही, असे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी चिपळुणातील भूमीपूजन कार्यक्रमास हजेरी लावली. त्यानंतर कापसाळ येथील विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत रणकंदन सुरू आहे. असेच मतभेदाचे मुद्दे वारंवार उपस्थित होणार आहेत. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कसा तोडगा काढतात ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मुळात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र यायला नको होते. मात्र ते आले आहेत. सत्तेतील समान वाट्यावरून सेना भाजप युती तुटली. दोन्ही पक्षांचे सरकार स्थापन हावे. यासाठी आपण मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. भाजपला तीन वर्षे मुख्यमंत्रीपद तर शिवसेनेला दोन वर्षे असा फॉर्म्युला सुचवला होता. मात्र त्यावर दोन्ही पक्षात एकमत न झाल्याने युती होऊ शकली नाही. राज्यातील महाविकास आघाडी सरकार दीर्घकाळ चालेल याची शाश्वती नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी माझे चांगले मित्रत्वाचे सबंध आहेत. त्यांनीही मला सेनेसोबत राहण्याचा आग्रह केला होता. मात्र एकदा भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने सेनेसोबत जाण्याचे टाळले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबाबत बोलताना ते म्हणाले, केवळ पक्षाच्या झेंड्याच्या रंग बदलून उपयोग नाही. तर मने बदलली पाहिजेत. मनसे आणि भाजप एकत्र येऊ शकणार नाहीत. त्यातूनही ते एकत्र आल्यास देशभरात भाजपचा तोटाच अधिक होईल.
नागरिकत्व कायद्याबाबत आठवले म्हणाले, नागरिकांच्या मागणीनुसारच कायदा लागू केला जात आहे. राजकीय पक्षांनी आंदोलनाच्या भूमिका घेतल्याने सर्व गदारोळ सुरू आहे. नागरिकांची मागणी होती म्हणूनच केंद्र सरकारने कायदा आणला आहे. हा कायदा भारतीय संविधानाला छेद देणारा नाही, असा विश्वासही श्री. आठवले यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - काय सांगता ! यंदा हापूस जाणार अर्जेंटिनाला
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.