गुहागर (जि. रत्नागिरी) : तालुक्यात गुहागर बरोबरच तवसाळ, रोहिले किनाऱ्यांवर अनेक वर्षे समुद्री कासवे अंडी घालण्यासाठी येत असत. मात्र जयगड खाडीतील औद्योगिक विकासामुळे गेल्या पाच वर्षात येथे एकही कासव अंडी घालण्यासाठी आले नाही. लॉकडाउनमुळे खाडीतील हालचाली बंद झाल्या. परिणामी तब्बल पाच वर्षांनी एका कासविणीने तवसाळचा किनारा गाठला.
कासव संवर्धनाबाबत जनजागृती झाली नव्हती; तेव्हापासून कासवाच्या अंड्यासाठी रोहिले आणि तवसाळचा समुद्रकिनारा प्रसिद्ध होता. अंडी घालून पळणाऱ्या कासविणीला पलटी मारून पकडण्याचे कसब असलेल्या व्यक्ती काही काळापुरत्या हिरो ठरायच्या. कासविणीच्या पाठी ओळखीत विकल्याही जात असत; मात्र कासव संवर्धनाकडे वनखात्याने लक्ष देण्यास सुरवात केली. जनजागृती झाली. यामुळे गुहागरमध्ये हा विषय येण्यापूर्वी तवसाळ, रोहिल्यात कासव संवर्धन होऊ लागले होते.
(कै.) वैभव सुर्वे आणि विजय सुर्वे वन खात्याच्या सहकार्यातून दरवर्षी 3 ते 4 घरटी संरक्षित करत असत. मात्र 2010 ते 2015 या कालावधीत हे प्रमाण कमी होत गेले. 2010 पासून जयगड खाडीकिनारी औद्योगिक विकास होऊ लागला. कान्होजी आंग्रे पोर्ट, जिंदल औष्णिक वीज प्रकल्पाचे जेएसडब्ल्यू पोर्ट, चौघुले शिपयार्ड असे प्रकल्प सुरू झाले. सुवर्णदुर्ग शिपिंग कार्पोरेशनतर्फे जयगड ते तवसाळ फेरीबोट सेवा सुरू झाली. मोठी जहाज बंदरात येण्यासाठी समुद्र आणि खाडीच्या दरम्यानच्या गाळाचा सातत्याने उपसा (ड्रेझिंग) होऊ लागला. या सर्वांचा परिणाम म्हणून 2015 पासून तवसाळ, रोहिले समुद्रकिनाऱ्यांवर अंडी घालण्यासाठी कासवे दृष्टीस पडलेले नाही.
वर्दळ थांबली अन्
देशात 25 मार्चला लॉकडाउन जाहीर झाला. जयगड बंदरातील वर्दळ अचानक थांबली. फेरीबोट सेवा बंद झाली. या बदलामुळे तवसाळला ऑलिव्ह रिडले जातीच्या कासविणीने अंडी घातल्याचे निदर्शनास आले. सध्या स्थानिक ग्रामस्थांनी ही अंडी संरक्षित केली आहेत.
जयगड खाडीतील औद्योगिकरणाचा फटका कासवांना बसत आहे. या भागात जखमी वा मृत कासवे आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वन खात्याने तवसाळ परिसरात कासव संगोपन केंद्र उभारून जखमी कासवांवर उपचार करण्याची, संगोपनाची व्यवस्था निर्माण करावी.
- नीलेश सुर्वे, तवसाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.