रत्नागिरी : महिन्याभरात दोन टप्प्यात पडलेल्या मुसळधार पावसाने मोहोर कुजून गेला असून कैरीवर अॅथ्रॅक्सनोजचा प्रादुर्भाव झाला आहे. फळावर काळे डाग पडले असून निसर्गापुढे बागायतदार हतबल झाले आहेत. शिल्लक राहिलेला मोहोर वाचवण्यासाठी औषध फवारणीचा मारा करावा लागत आहे. त्यामुळे खर्च वारेमाप होत असल्याची चिंता बागायतदारांनी व्यक्त केली.
नोव्हेंबर महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसाने बागातयदारांचे कंबरडे मोडले आहे. पाऊस आणि ढगाळ वातावरणाचे परिणाम आता आंबा बागांमध्ये दिसू लागले आहेत. पावसामुळे मोहोर आणि कणी गळून गेली. सध्या वाटाण्याऐवढ्या कैरीवर अॅथ्रॅक्सनोजचा प्रादुर्भाव झाला आहे. बारीक फळावर आतापासूनच डाग पडत आहेत. फुलोऱ्यातील मोहोर कुजून गेला असून बुरशीनाशकाचाही परिणाम झालेला नाही. पानावर काळे पडले असून ती सुखून जाणार आहेत. पावसामुळे पन्नास टक्के मोहोर वाया गेला होता.
उरलेल्या पन्नास टक्के मोहोरातील तीस टक्के कुजून गेला आहे. शिल्लक मोहोरातून उत्पादन मिळावे यासाठी बागायतदार झटत आहेत. दोन दिवसांपूर्वी हवामान विभागाने डिसेंबर महिन्यात पुन्हा पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे उरलेला मोहोरही वाचवण्यासाठी बागायतदारांना तारेवरची कसरत करावी लागेल.
वातावरणामुळे अनेक हापूसच्या कलमांना पालवी फुटायला लागलेली आहे. ती कधी जून होणार आणि त्यातून मोहोर येणार हे सांगणे कठीण आहे. मार्च महिन्यात बाजारात येणारा हापूसचा टक्का अत्यंत कमी राहील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. यंदा हंगामाच्या सुरवातीला प्रचंड मोहोर येईल असा अंदाज वर्तविला जात होता, परंतु तो फोल ठरला. नोव्हेंबर महिन्यात सलग तिन दिवसांचा पाऊस दोन टप्प्यात पडला होता.
सध्या शिल्लक राहिलेला मोहोर वाचवण्यासाठी औषध फवारण्या सुरु आहेत. त्यामधून मिळणार्या उत्पादनावरच सर्वकाही अवलंबून राहणार आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीसच आंबा मुबलक मिळेल असा सध्याचा अंदाज आहे. मे महिन्यात आंबा मिळाला तरीही दराचा प्रश्न निर्माण होणार असून त्याचा फटका आर्थिक उत्पन्नवर होणार आहे.
पावसाने हाती आलेले पिक वाया गेले असून बागायतदारांचे कंबरडे मोडले आहे. या परिस्थितीत जास्तीत जास्त उत्पादन कसे मिळेल यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- राजेंद्र कदम, बागायतदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.