रत्नागिरी : रत्नागिरी कस्टम विभागाने पकडलेल्या जहाजावरील सुमारे साडेतीन हजार शेळा-मेढ्यांपैकी आतापर्यंत ३०० शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. उपासमारी व घटसर्प (एचएस) हा आजार झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेळ्यांचा मृत्यू झाला.
जिल्हा परिषद पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला. काही समाजिक संस्थांनी पुढाकार घेतल्याने आणि मालकाने खाद्य पाठविल्याने सांडेलावगण येथे त्यांची देखभाल सुरू आहे. त्यामुळे शेळ्या दगावण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
रत्नागिरी कस्टम विभागाने काही दिवसांपूर्वी एका जहाजावर कारवाई केली. जहाज मालकांकडे जलवाहतुकीचे कोणतेही परवाने नसल्याने बेकायदा शेळ्या-मेंढ्यांची वाहतूक केल्याप्रकरणी हे जहाज पकडण्यात आले. जहाज गुजरातहून दुबईला निघाले होते. या शेळ्या मेंढ्यांचा मांसासाठी वापर केला जातो. यापूर्वीही अशा प्रकारे वाहतूक झाली आहे.
जहाज जयगड बंदरात आणण्यात आले होते. तेथे जेव्हा जिल्हा परिषद पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शेळ्या-मेंढ्यांची तपासणी केली, तेव्हा त्यांची परिस्थिती अतिशय गंभीर होती. बहुतांशी शेळ्या-मेंढ्यांची उपासमार झाली होती. त्यात समुद्रातील प्रवासामुळे अनेक अशक्त बनल्या होत्या. जहाजाची क्षमता आठशे ते हजार मेंढ्यांची असताना साडेतीन हजार शेळया-मेंढ्यांची वाहतूक करण्यात आली. त्यामुळे चेंगरून, गर्दीमुळे ऑक्सिजनची कमी आणि तणावामुळे अनेक पशु आजारी पडले.
जहाजात तेव्हा ६० शेळ्या-मेंढ्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांचे शवविच्छेदन करून अहवाल तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आला. दरदिवशी तेव्हा १० ते १५ शेळ्या-मेंढ्या मरत होत्या. आतापर्यंत सुमारे ३०० शेळ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतल्याने आणि मूळ मालकाने काही प्रमाणात खाद्य पाठविल्याने आता या शेळ्यांची देखभाल होत आहे. परंतु तपासणीचा अहवाल आम्हाला प्राप्त झाला आहे. त्यामध्ये या पशुंना घटसर्प झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
आता या सर्व पशुंचे लसीकरण केले जात आहे. औषधोपचार आणि देखभाल केली जात असल्याने शेळ्या-मेंढ्यांचे मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
"साडेलावगण येथे शेळ्या-मेंढ्यांनी भरलेल्या जहाजामधील अनेक शेळ्यांचा मृत्यू झाला. त्यांची तपासणी केल्यानतंर उपासमार आणि घटसर्प झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. आता योग्य ते लसीकरण आणि औषधोपचार सुरू असल्याने हे पशु दगावण्याचे प्रमाण कमी झाले आहे."
- डॉ. डी. एस. जगदाळे, जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी, रत्नागिरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.