'महायुतीच्या नेत्यांनी संभाव्य उमेदवाराबाबत टीकाटिप्पणी करणे योग्य नाही. मंत्री सामंत यांनीही कुठले दावे करू नयेत.'
कणकवली : उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचे बंधू व उद्योजक किरण सामंत यांना रत्नागिरी-लोकसभा निवडणूक लढवायची असेल, तर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा. कमळ चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवावी, म्हणजे कोणी दुखावणार नाही, असे स्पष्ट मत नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी व्यक्त केले.
उद्योगमंत्री सामंत यांनी शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबतच राहावे, असेही प्रतिपादन आमदार नीतेश राणे यांनी केले. येथे श्री. राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विचारण्यात आलेल्या प्रश्नाला त्यांनी हे उत्तर दिले.
राणे म्हणाले, ‘किरण सामंत यांनी लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मंत्री सामंत हे देखील त्याअनुषंगाने आपली भूमिका मांडत आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी लोकसभा निवडणुकीबाबत पक्षाची भूमिका आधीच मांडली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग (Ratnagiri-Sindhudurg) लोकसभा मतदारसंघात भाजपचे वर्चस्व आहे. त्यामुळे या मतदारसंघात ‘एनडीए’चा जो उमेदवार असेल तो कमळ या निशाणीवरच शंभर टक्के निवडणूक लढविणार आहे.’
ते पुढे म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने मतदानाचे गणित आम्ही आधीच मांडले आहे. या मतदारसंघात आमची सहा लाख मते आहेत. त्यामुळे कमळ निशाणीवर जो उमेदवार लढेल, तो शंभर टक्के निवडून येणार आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी संभाव्य उमेदवाराबाबत टीकाटिप्पणी करणे योग्य नाही. मंत्री सामंत यांनीही कुठले दावे करू नयेत.
कारण, ‘एनडीए’चा उमेदवार हा पक्षाच्या वरिष्ठांच्या बैठकीतच निश्चित होणार आहे. त्यामुळे मंत्री सामंत यांनी उमेदवार जाहीर करण्याची घाई करू नये. येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये अंबादास दानवे हे विरोधी पक्षनेतेपदी असणार नाहीत. ठाकरे गटाचे अनिल परब यांनी त्या पदासाठी दावा केला आहे. ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत हे देखील पुढचे खासदार असणार नाहीत, असेही श्री. राणे म्हणाले.
मिठबाव येथील प्रसाद लोके यांचा खून, त्यानंतर त्यांच्या पत्नीने केलेली आत्महत्या या प्रकरणांचा तपास सीआयडीकडे वर्ग करावा, अशी मागणी जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्याकडे केली असल्याची माहिती आमदार श्री. राणे यांनी यावेळी दिली. या खून प्रकरणातील मुख्य संशयित किशोर पवार हा ब्रेन ट्युमर या आजाराने त्रस्त असल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
अशा परिस्थितीमध्ये या गुन्ह्याचा तपास योग्य रितीने होऊन आरोपींवर गुन्हा दाखल होऊन न्यायालयाकडून कठोर शिक्षा व्हावी, अशी समस्त देवगडवासीयांची भावना आहे. या गुन्ह्याचे स्वरूप व विस्तार मोठ्या प्रमाणात असल्याने तसेच यामध्ये अनेक आरोपींचा सहभाग असल्याने हा तपास लवकरात लवकर व्हावा, अशीही सर्व जनतेची इच्छा असल्याचेही श्री. राणे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.