रत्नागिरी : आरोग्य विभागाकडून १२ ते १४ वयोगटांतील साधारणत: सहावी ते आठवीत शिकणाऱ्या मुलांसाठी २१ मार्चपासून कोविड लसीकरणाला सुरुवात होणार आहे. जिल्ह्यात ७० हजारांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना ही लस देणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली. कोविड लसीकरणाचा आठवा टप्पा सुरू करण्यात येत आहे. या टप्प्यात १२ ते १४ वयोगटातील शाळकरी मुलांचे लसीकरण केले जाईल. आत्तापर्यंतच्या सात टप्प्यात कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिनची लस वापरली आहे.
आता मुलांसाठी मात्र कोरबेवॅक्स लस उपलब्ध झाली आहे. या लशीच्या एका व्हायलमध्ये (बाटली) २० डोस आहेत. एका इंजेक्शनमधून ०.५ मिली इतका डोस दिला जाईल. कोव्हॅक्सिनप्रमाणेच कोरबेवॅक्स लशीचे दोन डोसमधील अंतर चार आठवडे राहील. १५ मार्च २००८ ते १५ मार्च २०१० मध्ये जन्मलेल्या सर्व मुलांना ही लस घेता येणार आहे. जिल्ह्यात ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर ही लस देऊन या मोहिमेचा प्रारंभ होणार आहे. आतापर्यंत पहिल्या टप्प्यात हेल्थ केअर वर्कर, दुसरा टप्पा फ्रंटलाईन वर्कर, तिसरा टप्पा ४५ वयोगटावरील सहव्याधी व ६० वयोगटासाठी घेण्यात आला. ४५ वयोगटावरील सर्व नागरिकांसाठी चौथा टप्पा, १८ ते ४४ वयोगटासाठी पाचवा, १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना सहाव्या टप्प्यात आणि १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी सातवा टप्पा घेण्यात आला. आठव्या टप्प्यात जिल्ह्यासाठी १२ ते १४ वयोगटातील मुलांसाठी २० हजार ४०० डोस उपलब्ध झाले आहेत. मुलांचे लसीकरण करून घ्या, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, उपाध्यक्ष उदय बने यांनी केले आहे.
दुसऱ्या डोसची टक्केवारी ८१.१६ टक्के
जिल्ह्यात आजपर्यंत कोविड लसीकरणाची पहिल्या डोसची मात्रा १० लाख ५३ हजार ७२९ देण्यात आली असून हे प्रमाण ९७. ४० टक्के आहे. दुसऱ्या डोसची मात्रा ८ लाख ७८ हजार २० असून हे प्रमाण ८१.१६ टक्के आहे. आतापर्यंत एकूण १९ लाख ३१ हजार ७४९ लशीच्या मात्रा देऊन नागरिकांना पूर्णपणे सुरक्षित केले आहे. २००७ वा त्यापूर्वी जन्मवर्ष असलेले पात्र (१५ ते १८ वर्षे वयोगटातील) पहिल्या डोसची मात्रा ४९ हजार ३४७ लशीच्या मात्रा दिल्या असून ते प्रमाण ६८.७८ टक्के आणि दुसऱ्या डोसची मात्रा ३४ हजार ६३१ असून हे प्रमाण ४८.२७ टक्के आहे.
एक नजर..
लसीचे नाव कोरबेवॅक्स
डोसचे प्रमाण ०.५ मिली
एका बाटलीत २० डोस
दुसरा डोस ४ आठवड्यानंतर
१५ ते १८ वर्षे वयोगट
पहिल्या डोसची मात्राः ४९ हजार ३४७
दुसऱ्या डोसची मात्राः ३४ हजार ६३१
एक नजर..
पहिल्या डोसची मात्राः १० लाख ५३ हजार ७२९
दुसऱ्या डोसची मात्राः ८ लाख ७८ हजार २०
आतापर्यंत लशींच्या मात्राः १९ लाख ३१ हजार ७४९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.