Santosh Kulkarni writes Vijaydurg fort special report sakal
कोकण

विजयदुर्ग ढासळतोय...

तटबंदी कमकुवत; दुरुस्तीसाठी ठोस पावले पडेनात

संतोष कुळकर्णी

मराठ्यांचे आरमारी केंद्र म्हणून ओळख असलेला आणि ज्याच्या तटबंदीवर तत्कालीन तोफगोळ्यांचे व्रण आजही दृष्टिपथास पडतात, असा ''घेरिया'' अर्थात ‘विजयदुर्ग’ किल्याची तटबंदी ढासळत चालली आहे. अष्टशताब्दी महोत्सवामुळे किल्याच्या शौर्याची गाथा विविध प्रसारमाध्यमांच्या मदतीने संपूर्ण जगासमोर आली आणि त्यावेळेपासूनच किल्यावरील पर्यटकांची वर्दळ वाढली; मात्र काही वर्षांपासून शासनाचे किल्याकडे होत असलेले दुर्लक्ष आज किल्याच्या अस्तित्वाबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण करीत आहे. किल्याच्या पश्‍चिमेकडील तटबंदी ढासळत असताना ऑगस्ट २०२० मध्ये किल्याच्या बुरुजाच्या तटबंदीची भिंत ढासळल्याने पुन्हा एकदा विषय ऐरणीवर आला खरा; मात्र दीड वर्षात शिवप्रेमींना त्याच्या डागडुजीची प्रतीक्षाच आहे.

१६५ वर्षे मराठ्यांच्या अंमलाखाली

सुमारे १२७ वर्षे विजापूरकरांकडे असलेला किल्ले विजयदुर्ग १६५३ मध्ये छत्रपती शिवरायांनी जिंकून घेतल्यानंतर पुढे सुमारे १६५ वर्षे मराठ्यांचा अंमलाखाली होता. या काळात किल्ल्यात अनेक सुधारणा झाल्या. किल्ल्यावर कान्होजी आंग्रे, तुळाजी आंग्रे, संभाजी आंग्रे, आनंदराव धुळप यांच्यासारखे तेजस्वी आरमारप्रमुख होऊन गेले. इंग्रज, पोर्तुगीज, डच या परकियांनी ‘जिब्राल्टर’ म्हणून उल्लेख केलेला हा किल्ला शौर्याच्या आठवणी जागवत उभा आहे.

पुरातत्त्व विभागाने लक्ष देण्याची गरज

मागील सुमारे दहा वर्षांपासून त्याची पश्‍चिमेकडील तटबंदी कमकुवत होऊन ढासळत चालली आहे. त्याच्या डागडुजीसाठी अनेक प्रयत्नही झाले. त्यानंतर ऑगस्ट २०२० मध्ये पुन्हा पूर्वेकडील बुरुजाच्या तटबंदीची संरक्षक भिंत ढासळल्याने दुर्गप्रेमींमधील अस्वस्थता कमालीची वाढली. याकडे पुरातत्त्व विभाग आणि शासनाने वेळीच लक्ष दिले नाही तर इतिहासाच्या आठवणींचा हा खजिना नष्ट होण्यास वेळ लागणार नाही.

बांधकामासाठी तज्ज्ञांची मते आवश्यक

काही दुर्गप्रेमींच्या मतानुसार, सुमारे ४०-४५ वर्षांपूर्वी किल्ल्याची तटबंदी ढासळत चालली होती. त्यावेळी पुरातत्त्व खात्याने या तटबंदी भिंतीची ७५ टक्के डागडुजी केली होती; मात्र झालेली डागडुजी पूर्णतः यशदायी ठरली नाही. केवळ सिमेंट व वाळूने याचे बांधकाम न करता त्यासाठी तज्ज्ञांची मते घेऊन विशिष्ट पध्दतीचे बांधकाम साहित्य वापरून त्याची डागडुजी करणे गरजेचे होते. दुर्दैवाने तसे न झाल्याने किल्ल्याची तटबंदी ढासळत असल्याचा मतप्रवाह आहे. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा पूर्वेकडील तटबंदीची भिंत ढासळल्याने किल्ल्याच्या संवर्धनाची बाब अधोरेखित झाली.

डागडुजीची प्रतीक्षाच

ऑगस्ट २०२० च्या पावसाळ्यात किल्ला प्रवेशद्वाराजवळील बुरुजाच्या पायवाटेची संरक्षक भिंत ढासळली आणि ऐतिहासिक ठेवा लोप पावत असल्यामुळे दुर्गप्रेमींमध्ये अस्वस्थता पसरली. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही भेट देत त्याची पाहणी केली; मात्र सुमारे दीड वर्ष उलटून गेली तरीही अद्याप त्याच्या डागडुजीला सुरुवात झालेली नाही.

प्रेरणोत्सव समितीचा मानस

इतिहास जपतानाच भविष्यातील दुर्गपर्यटनाचा विचार करून व किल्ल्याचा ऐतिहासिक बाज कायम ठेवून आतमध्ये विद्युत व्यवस्था, प्रदर्शनीय हॉल असावा, याबाबतचा नकाशा तयार करून भारतीय पुरातत्व विभागाच्या केंद्रीय सांस्कृतिक विभागाकडे प्रकल्प सादर केला जाणार आहे. किल्ल्याकडे जाणार्‍या रस्त्याचे सुशोभीकरण करण्यासाठी मेरीटाईम बोर्डाकडे प्रकल्प सादर करून सुमारे दहा वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला. यामध्ये समिती कोणताही निधी मागत नसून त्यांना केवळ परवानगी हवी आहे. यामध्ये गावांचेही सुशोभीकरणही केले जाणार आहे. असंख्य शिवप्रेमींच्या माध्यमातून ''एक घर एक चिरा'' हे ब्रीद जोपासत किल्ल्याची डागडुजी करण्याचा प्रयत्न आहे.

काय होणे गरजेचे?

किल्याचा ‘अ’ वर्गात समावेश होणे आवश्यक असून तसे झाल्यास किल्ल्याच्या डागडुजीसाठी सर्व शासकीय सवलती मिळवणे शक्य होणार आहे. भविष्यातील किल्ल्याच्या डागडुजीचा तसेच सुरक्षिततेचा प्रश्‍न निकाली निघणार आहे. डागडुजीच्या निधीचा कालावधी सरकारकडून निश्‍चित केला जाणार असून चौकीदार, कर्मचारी, डागडुजी, साफसर्फाइचा प्रश्‍न सुटेल. संपर्क कार्यालयही असेल, जेथे पर्यटकांना सर्वप्रकारची माहिती उपलब्ध होऊ शकणार आहे.

...तर पर्यटन वाढेल

किल्ल्याच्या पडझडीची तातडीने दुरुस्ती झाली नाही, तर एकवेळ संपूर्ण तटबंदी कमकुवत बनून ढासळणे सुरूच राहील. त्यामुळे येणार्‍या पर्यटकांनाही ती धोक्याची सूचना ठरेल. पर्यायाने पर्यटन व्यवसायावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. सध्या येत असलेल्या पर्यटकांमुळे स्थानिक उलाढाल वाढली आहे. निवास-न्याहारी योजनानांही बर्‍यापैकी काम मिळाले आहे. स्थानिक सुविधांमध्ये वाढ झाल्यास येणार्‍या पर्यटकांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होऊन आर्थिकस्तर उंचावण्यास मदत होणार आहे.

विजयदुर्ग सब सर्कल

भारतीय पुरातत्व खात्याच्या सर्वेक्षण विभागाकडून विजयदुर्ग सब सर्कल म्हणून मान्यता मिळाली आणि त्याचे कार्यालयही सुरू झाले. यामध्ये विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, जयगड या किल्ल्यांबरोबरच गुहागरची मशीद, पन्हाळे काझी पुरातन गुंफा यांचा समावेश आहे; मात्र हे कार्यालय गतिमान होण्याची आवश्यकता आहे.

सद्यस्थिती अशी...

  • दरवर्षी सुमारे दोन लाख भाविकांची विजयदुर्गला भेट

  • विजयदुर्ग किल्ल्यावर हवी पाण्याची व्यवस्था

  • पर्यटकांच्या सोयीसाठी हवीत अधिक साधने

  • पायथ्याशी शासनाचे माहिती कार्यालय आवश्यक

ढासळतेय तटबंदी?

वर्षानुवर्षे खाडीत गाळ साचत असल्याने पाण्याची खोली कमी झाली आहे. त्यामुळे लाटांचा मारा थेट किल्याच्या तटबंदीवर होतोय. किल्ल्यात गोड्या पाण्याची विहिर असलेल्या ठिकाणच्या तटाजवळील मातीचा भराव खचल्याने तटबंदी वाकडीतिकडी होत आहे. त्यामुळे पश्‍चिमेकडील तटबंदी धोकादायक बनत चालली आहे. या ढासळत चाललेल्या तटबंदीच्या दुरुस्तीसाठी तज्ज्ञांच्या प्रयोगशाळेत पृथःकरण करून त्यानुसार तटबंदीला साहित्य वापरून कुशल कारागिरांकडून त्याची डागडुजी होणे गरजेचे आहे. केवळ सिमेंट व वाळू वापरून हे काम थांबणारे नसल्याचा मतप्रवाह आहे. तसेच ग्लोबल वार्मिंगचाही अभ्यास होणे आवश्यक.

किल्ल्याचा इतिहास

  • ११९५ ते १२०५ - दरम्यान शिलाहार घराण्यातील राजा भोज याने किल्ला बांधल्याचा उल्लेख

  • १२१८ - किल्ला देवगिरीच्या यादवांच्या ताब्यात

  • १३५४ - विजयनगरच्या राजाने देवगिरीच्या यादवांचा पराभव करून कोकण प्रांत बळकावला

  • १४३१ - विजयनगरच्या राजाचा पराभव करून किल्ला बहमनी सुलतान अल्लाउद्दीन अहमदशाहच्या ताब्यात

  • १४९० ते १५२६ - बहमनी राज्याचे पाच तुकडे झाले. त्यात हा किल्ला विजापूरच्या आदिलशाहीकडे सोपवला.

  • १५२६ ते १६२३ - या सुमारे १२७ वर्षांच्या काळात किल्ला विजापुरांच्या अंमलाखाली

  • १६५३ - छत्रपतींनी किल्ला जिंकल्यानंतर अनेक सुधारणा

  • १८१८ - मराठेशाही संपून किल्ला इंग्रजांच्या ताब्यात

किल्ल्याची भौगौलिक माहिती

  • छत्रपतींनी किल्ला जिंकला, त्यावेळी एकूण क्षेत्रफळ सुमारे ५ एकर

  • सध्याचे किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे १७ एकर १९ गुंठे.

  • किल्ल्यात गणेश, राम, हनुमान, दर्या, तुटका, सिखरा, शिंद, शाहा, व्यंकट, सर्जा, शिवाजी, गगन, मनरंजन, गोविंद, सदाशिव, खुबलढा तोफा बारा, धनजी बुरूज तोफा बारा, पाण, पडकोट खुष्की, नर असे एकूण वीस बुरूज.

  • तटबंदीची उंची सुमारे ३६ मीटर, पाच तटबंद्यांमुळे किल्ला अभेद्य.

  • किल्ल्यात शंकर व भवानी मातेच्या मंदिरांचे अवशेष, प्रवेशद्वारावरील मारुती मंदिर सुस्थितीत.

  • १८१८ मध्ये खग्रास सूर्यग्रहणावेळी जॉन्सन व लैकीयर या शास्त्रज्ञांकडून हेलियमचा शोध. त्या ठिकाणी असलेल्या चबुतऱ्याला ‘साहेबांचे ओटे’ तर ठिकाणाला ‘हेलियमचे पाळणाघर’ म्हणून ओळख.

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग ‘विजयदुर्ग सब सर्कल’ या नावाने सिंधुदुर्ग किल्ला, विजयदुर्ग किल्ला, जयगड, गुहागर-दापोली येथील पुरातन मशीद आणि पन्हाळे-काजीच्या गुहांसाठी अस्तित्वात आलेल्या या विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. राज्यकर्त्यांची अनास्था कारणीभूत आहे. शिवप्रेमींनी आवाज उठविण्याची गरज आहे.

- राजीव परुळेकर, किल्ले अभ्यासक

विजयदुर्गचे बांधकाम चुनागच्चीचे आहे. जुन्या साधनांचा वापर करून जुन्याच गोष्टी नव्याने जपणे म्हणजे ‘दुर्गसंवर्धन’. केवळ ढासळलेली तटबंदी दुरुस्त करून चालणारी नाही, तर त्याच्या आसपासची डागडुजीही झाली पाहिजे. पाण्याचे बाह्यमार्ग खुले केल्यास पावसाचा ताण येणार नाही. ‘मास्टर प्लान’ झाला, तरच जपणूक होईल.

- डॉ. अमर अडके, दुर्ग अभ्यासक

ढासळलेल्या संरक्षक भिंतीच्या कामाची निविदा निघाली; मात्र प्रत्यक्षात कामाला अद्याप प्रारंभ झालेला नाही. पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून त्याचे काम होणार आहे. यासाठी डागडुजीच्या यंत्रणेला वेग देणे आवश्यक आहे. डागडुजी वेळीच झाली, तर पुढचा भाग ढासळणार नाही. किल्ले संवर्धनाच्या दृष्टीने गतिमान काम अपेक्षित आहे.

- प्रसाद देवधर, सरपंच-विजयदुर्ग

किल्ले विजयदुर्ग प्राधिकरणकडे गेला पाहिजे. तसे झाल्यास त्याचे संगोपन, संवर्धन आणि जतन करण्यामध्ये फारशा अडचणी जाणवणार नाहीत. यादृष्टीने चर्चा सुरू असून प्राधिकरणकडे गेल्यास अनेक प्रश्‍न मार्गी लागतील, असा विश्‍वास वाटतो.

- राजन दिवेकर,मुंबईसह रायगड उपमंडळप्रमुख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT