रत्नागिरी : सागर एवढा अफाट की त्याला काहीही होऊ शकत नाही हा समजच चुकीचा. सागर म्हणजे असंख्य सजीवांच्या जीवनचक्रांशी जोडलेले एक अक्षरशः जिवंत माध्यम (लिविंग ओशन्स) आहे. जगभरातील समुद्रांमधील अधिवास, जैवविविधता, अन्नसाखळ्या आणि समुद्राच्या पाण्याचा दर्जा या समुद्राच्या पर्यावरणाच्या आधारस्तंभांना माणसाच्या हस्तक्षेपाने धोका निर्माण झाला आहे. समुद्रातील सजीवांच्या अस्तित्वासाठी अधिवास आवश्यक आहे, अशी माहिती डॉ. स्वप्नजा मोहिते यांनी दिली.
डॉ. मोहिते म्हणाल्या, समुद्रात एकपेशीय जीवनापासून ते महाकाय ब्लू व्हेलपर्यंत अगणित जीव राहतात. प्लवंग वनस्पती या समुद्रातल्या जीवसृष्टीचा पाया आहेत. प्रकाश संश्लेषण करणार्या या सूक्ष्म वनस्पती जगातील अर्ध्या प्राणवायूची निर्मिती करतात. याशिवाय सिविड्स, केल्पसारखी शेवाळे, सी ग्रास हेसुद्धा भर घालत असतात. या अन्नसाखळीतील प्राथामिक उत्पादकांपासून सर्वात वरच्या भक्षकांपर्यंत सगळ्यांना हा समुद्र आसरा देत असतो आणि यातल्या अनेक अन्नसाखळ्या आपल्यापर्यंतही येऊन पोचतात.
पृथ्वीची उत्पत्ती 3.5 ते 4 अब्ज वर्षांपूर्वी झाली तेव्हापासून आजतागायत ही उत्क्रातींची प्रक्रिया अव्याहतपणे सुरू आहे. एकपेशीय जीवांपासून आज अनेकपेशीय सजीवांच्या अनेक प्रजातींपर्यंत प्रवास पोचला आहे. पृथ्वीवर 1 ट्रिलियन सजीवांच्या प्रजाती असून पैकी फक्त 1.75 ते 1.8 दशलक्ष प्रजातींना नावे देऊ शकलो आहोत. सजीव ज्या ठिकाणी निर्माण झाले तो पृथ्वीच्या निर्मितीत तयार झालेला सागर आणि त्याचे आपल्या अस्तित्वात असणारे योगदान महत्त्वाचे आहे. आपले जगणे आणि श्वास घेणे, पृथ्वीवरचे कार्बन आणि प्राणवायूचे चक्र, हवामानातील बदल, जलचक्र आणि गोड्या पाण्याचे स्रोत, आवडीचे सी फूड म्हणजे मासे आणि इतर जलचर, सारे समुद्राशी, त्याच्या पर्यावरणाशी निगडित आहे. हे सारे माणूस सोयीस्करपणे विसरत आहे, अशी खंत डॉ. मोहिते यांनी व्यक्त केली.
शत्रूपासून लपण्यासाठी, विश्रांतीसाठी, प्रजोत्पादनासाठी किंवा जीवनाच्या महत्त्वपूर्ण टप्प्यासाठी समुद्री अधिवास आवश्यक असतात. मानवामुळे अधिवास नष्ट होत आहेत. खोल समुद्रात प्रवाळ आणि स्पंज अनेक मासे आणि इतर जलचरांचे अधिवास म्हणून काम करतात पण समुद्रतळाशी फिशिंग करणार्या ट्रॉलिंगसारख्या जाळ्याच्या वापराने या अधिवासांना नुकसान पोहोचते. काही जाळी माशांच्या पूर्ण थव्यांना पकडून त्यातील पिल्ले आणि वयस्क मासे यांची मासेमारी करून त्या प्रजातील धोका पोहोचवतात.
दुवा नष्ट झाल्यास जैवविविधता धोक्यात
समुद्रातील प्रत्येक सजीव या कोणत्या ना कोणत्या तरी अन्नसाखळीचा दुवा असतो. एक दुवा नष्ट झाला की त्याचा परिणाम पूर्ण साखळीवर होऊन जैवविविधता धोक्यात येते. वेळीच काळजी घेतली गेली नाही तर हे जीव एक्सटिंक्ट म्हणजे पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर पोहोचतात. याचा दूरगामी परिणाम समुद्राच्या इकोसिस्टिमवर आणि पर्यायाने मानवी जीवनावरही होत असतो. समुद्रातील अन्नजाळे हे या सगळ्या परिणामांवर अवलंबून असते. संतुलित पर्यावरणासाठी समुद्रातले हे महत्वाचे आधारस्तंभ टिकले पाहिजेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.