मांसाहारी माशांचे प्रमाण घटले; अतिमासेमारीचा परिणाम
सावंतवाडी - कोकणात अतिमासेमारीमुळे समुद्रातील अन्नसाखळी अडचणीत आली आहे. मांसाहारी माशांची संख्या घटत असून, तारली, बांगडा अशा शाकाहारी माशांची संख्या वाढली आहे. सागरी इको सिस्टिमच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा मानली जात आहे. त्यावर वेळीच नियंत्रण न आणल्यास काही माशांच्या जाती लुप्त होण्याची शक्यता आहे.
समुद्र ही परिसंस्था मानल्यास जंगलांप्रमाणेच येथेही मजबूत अन्न साखळी कार्यरत असते. त्याचे प्रमुख तीन स्तर मानले जातात. प्राथमिक पातळीवर वनस्पतीजन्य व प्राणीजन्य प्लवंग, दुसऱ्या टप्प्यात त्यावर अवलंबून शाकाहारी मासे आणि तिसऱ्या टप्प्यात या माशांना खाणारे मांसाहारी मासे असतात. या अन्न साखळीत माणूस या बाह्यघटकाचा हस्तक्षेप वाढल्याने समुद्राची "इको सिस्टिम' अडचणीत आली आहे.
समुद्रातील मासेमारीसाठी काळानुरूप तंत्रज्ञानाचा वापर वाढला. त्यामध्ये तीव्रतेने व्यावसायिकता आली. मासे खाणाऱ्यांची संख्या वाढली. त्यासाठी वेगवान ट्रॉलर्स, कमी आसाची मोठी पर्ससीनसारखी जाळी, माशांना शोधणाऱ्या सॅटेलाइटवर आधारित यंत्रणेचा वापर वाढला आणि ओव्हर फिशिंग वाढले. यामध्ये प्रामुख्याने मांसाहारी माशांना चांगली चव असल्याने त्यांना मागणी वाढली. अशा माशांना पकडण्यासाठी वेगळी जाळी, वेगळे तंत्र विकसित झाले. त्यामुळे असे मासे समुद्रातून अक्षरशः गाळून काढले जात आहेत. कोकण किनाऱ्यावर घोळ, बळा, करवत, ताकट, मुशी हे चवदार मांसाहारी मासे अलीकडे अभावाने दिसू लागले आहेत. सुरमईचा आकार कमी झाला आहे.
मांसाहारी माशांचे प्रमाण घटल्याने त्यांचे खाद्य असलेल्या तारली, बांगडा अशा माशांची कोकणातील समुद्रात संख्या वाढली आहे.
येत्या आठ-दहा वर्षांत माशांच्या काही प्रजाती कोकणातील समुद्रातून नष्ट होण्याची भीती व्यक्त होत असून. त्याचा थेट परिणाम कोकणात मासेमारीवर अवलंबून हजारो कुटुंबावर होणार आहे.
कोकणात मासेमारी नौकांची संख्या ज्या प्रमाणात वाढली, त्या तुलनेत उत्पादनात वाढ झालेली नाही. माशांची प्रजातीवार वाढ व त्याचा दर पाहिल्यास सागरी अन्न साखळीवर मोठा परिणाम झाल्याचे दिसत आहे.
- डॉ. केतन चौधरी, मत्स्य अभ्यासक
दृष्टिक्षेपात
संख्या वाढलेले शाकाहारी मासे - बांगडा, तारली
संख्या कमी झालेले मांसाहारी मासे - शेंगटी, शेंगाळे, कर्ली, मोडुसा, शिवड, घोळ, करवत, बळा
आकार कमी जाणवणारे मासे - सुरमई, म्हाकूल, बांगडा, मोरी, सरंगा, पापलेट.
महाराष्ट्रातील रेड लिस्टेड मासे - मुशी, करवत किंवा नाली, कानमुशी किंवा कनार, गोलाड किंवा वाकटी, कोंबडा, सोनमुसा, वागबीर, लांज किंवा लाजा, मिगला किंवा वाघोल, शिंग पाकट, वागली, सुंभा किंवा टोळ, घोडा मासा, गोब्रा.
|