बडोद्याशी पुन्हा नातेसंबंधांची लागली चाहूल sakal
कोकण

सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा; बडोद्याशी पुन्हा नातेसंबंधांची लागली चाहूल

सावंतवाडीत परतल्यावर बापूसाहेब महाराजांच्या विवाहासाठी बोलणी सुरू झाली. बडोदा येथील गायकवाड घराण्याशी नातेसंबंध जोडण्याबाबत ही बोलणी होती.

- शिवप्रसाद देसाई

सावंतवाडीत परतल्यावर बापूसाहेब महाराजांच्या विवाहासाठी बोलणी सुरू झाली. बडोदा येथील गायकवाड घराण्याशी नातेसंबंध जोडण्याबाबत ही बोलणी होती. बापूसाहेब मात्र सुरुवातीला इतक्यात विवाह करण्याच्या मन:स्थितीत नव्हते. बडोदा संस्थानचे राजे सयाजीराव गायकवाड यांची नात श्रीमंत लक्ष्मीदेवी यांचे स्थळ बापूसाहेबांसाठी आले होते.

सावंतवाडी संस्थान आकाराने लहान असले तरी त्याची प्रतिष्ठा मोठी होती. त्यातच बापूसाहेब महाराज उच्चशिक्षण घेऊन आले होते. शिवाय, महायुद्धात सहभाग घेतल्याने त्यांच्याबद्दलचा आदर खूपच वाढला होता. ऐन पंचवीशीतील बापूसाहेब महाराज आता संस्थानची सूत्रे हातात घेण्यासाठी सज्ज झाले होते. अशावेळी त्यांच्या विवाहाविषयी चर्चा होणे साहजिकच होते. त्या काळात बडोदा हे भारतातील एक महत्त्वाचे आणि नावाजलेले संस्थान होते. याआधी १८८० मध्ये बडोदा घराण्याची सोयरीक सावंतवाडीशी झाली होती. तत्कालीन राजे श्रीमंत रघुनाथराव उर्फ बाबासाहेब यांचा विवाह बडोदा संस्थानचे श्रीमंत खंडेराव महाराज यांच्या कन्या आणि सयाजीराव महाराज यांच्या भगिनी ताराबाबा यांच्याशी झाला होता.

सयाजीराव महाराज आपली नात श्रीमंत लक्ष्मीदेवी यांच्यासाठी स्थळ शोधत होते. लक्ष्मीदेवी यांचा जन्म १ मे १९०७ ला बडोद्यात मोतीबाग वाड्यात झाला. युवराज फत्तेसिंह राजे आणि पद्मावती या दांपत्याचे लक्ष्मीदेवी हे अपत्य. तत्कालीन राजे श्रीमंत सयाजीराव महाराज आणि महाराणी निलगिरी येथे होत्या. त्यामुळे लक्ष्मीदेवींचे नामकरण त्यावेळी करण्यात आले नाही. पुढच्यावर्षी श्रीमंत प्रतापसिंह राजे यांचा जन्म झाल्यावर दोन्ही भावंडांचे बारसे १० जुलै १९०८ ला बडोद्यात करण्यात आले. इंदूमती या आणखी एक भगिनी मिळून ही तीन भावंडे होती. यात लक्ष्मीदेवी कायम हसतमुख असायच्या. अभ्यासाविषयीही त्यांना विशेष आत्मियता होती. अभ्यास झाल्यानंतर बागेत फिरून विविध प्रकारची फुले, पाने गोळा करून त्याच्या विविध चित्रकृती बनवण्याचा त्यांना छंद होता. प्रेमळ, मनमिळावू स्वभावामुळे श्रीमंत सयाजीराव महाराजांच्याही त्या आवडत्या होत्या. मोतीबाग महालात या भावंडांना भेटायला महाराज येत.

यावेळी लक्ष्मीदेवी स्वागतासाठी त्यांना सगळ्यात आधी सामोऱ्‍या जात असत. त्यांच्या गोड वाणीने महाराज आनंदित होत. सगळ्यात जास्त प्रेम लक्ष्मीदेवींवरच होते. त्यांना खो-खो, विटी-दांडू, घोड्यावर बसणे असे मैदानी खेळ आवडायचे. त्यांना पितृसुख फारसे लाभले नाही. त्या दोन वर्षांच्या असतानाच युवराज फत्तेसिंह राजे यांचे निधन झाले. तिन्ही भावंडांच्या शिक्षण व देखभालीची जबाबदारी सयाजीराव महाराजांवर आली. त्यांच्या शिक्षणासाठी मिसेस बार्नेट यांची केअरटेकर म्हणून नियुक्ती करण्यात आली. पुढे नोव्हेंबर १९१९ मध्ये लक्ष्मीदेवींच्या आई पद्मावतीही निर्वतल्या. साहजिकच सयाजीराव महाराजांचे या तिन्ही भावंडांबाबतचे प्रेम, जबाबदारी आणखी वाढली. मिस ओलीव, मिस विल्टशिअर, मिस ड्युई, मिस मार्सेडे अशा शिक्षिका या तिघांच्या शिक्षणासाठी नेमण्यात आल्या.

सौ. येसूबाई धरणगावकर या लक्ष्मीदेवींना मराठी शिकवायच्या. पुढे रा. प्रभूदेसाई यांची त्यांचे शिक्षक म्हणून नियुक्ती झाली. संगीत, बागकाम, विणकाम, शिवणकाम आदी कला त्यांना शिकवल्या जायच्या. शिवाय मिस मार्सेडे इंग्रजी, रा. प्रभूदेसाई गणित, भूगोल आणि मराठी, रा. वैष्णव हे गुजराती भाषेचे शिक्षण त्यांना द्यायचे. पुढे १९१५ मध्ये नरहर अनंत केळकर यांची शिक्षक म्हणून नियुक्ती झाली. बडोदा प्रांतातील शाळा पाहणीसाठी सयाजीराव महाराज जायचे. यावेळी बऱ्याचदा ते नातवंडांना सोबत नेत असत. लक्ष्मीदेवी यांना पडजीभेबाबत त्रास होता. १९१९ मध्ये त्यांच्यावर मिरज येथे शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी स्वतः महाराज उपस्थित होते. १४ एप्रिल १९२० ला लॉयल्टी बोटीने श्रीमंत लक्ष्मीदेवी शिक्षणासाठी इंग्लंडला गेल्या. तेथे दोन वर्षे शिक्षण घेऊन ११ मार्च १९२२ ला त्या बडोद्यात परतल्या. याच दरम्यान त्यांच्या विवाहाबाबत बोलणी सुरू झाली.

श्रीमंत लक्ष्मीदेवी यांच्यासाठी बापूसाहेब महाराज योग्य वर असल्याचे सयाजीराव महाराजांना जाणवले. लक्ष्मीदेवी युरोपात जाण्याआधी महाराजांनी विवाहाची बोलणी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी ते युरोपात होते. त्यांनी युरोपातून आपल्या दिवाणांना पत्र पाठवून या संदर्भात कळवले. बडोद्याचे दिवाण सर मनूभाई यांनी बेळगावचे कलेक्टरांना या संदर्भात पत्र पाठवले. त्या काळात बेळगावचे कलेक्टर सावंतवाडीचे पोलिटीकल एजंट होते. शिवाय बडोद्याहून रा. अमृतराव पुरुषोत्तम सबनीस यांना बापूसाहेब महाराजांचे मत आजमावण्यासाठी सावंतवाडीत पाठवण्यात आले. ते महाराजांना भेटले; मात्र याबाबतचे नेमके उत्तर त्यांना मिळाले नाही.

पुढे लक्ष्मीदेवी शिक्षणासाठी (१९२०) युरोपात जायला निघाल्या. त्यामुळे पुढचे काही दिवस विवाहाचा हा विषय मागे पडला. सयाजीराव महाराज युरोपातून परतल्यानंतर काहीकाळ मुंबईत होते. यावेळी तेथील जय महाल येथे त्यांनी बापूसाहेबांना भेटायला बोलावले. यावेळी स्वतः त्यांनी विवाहाचा विचार बोलून दाखवला; मात्र बापूसाहेबांनी ‘विचार करून कळवतो’, असे मोघम उत्तर दिले. यानंतर सयाजीराजांनी धारचे महाराज व बापूसाहेबांचे मेहुणे उदाजीराव महाराज पवार यांना पत्र लिहून यात मध्यस्थी करण्याची विनंती केली. सुमारे दीड, दोन महिन्यांनी ही लग्नाची बाब जुळू शकणार नाही असे बापूसाहेबांनी कळवल्याने हे विवाहाचे बोलणे तेथेच थांबले.

विवाह आणि नातेसंबंध जुळायचेच असतील तर वेळ आल्यानंतर सगळेच जुळून येत. या विवाहाबाबतही तसेच झाले. नोव्हेंबर १९२० च्या दरम्यान बापूसाहेबांचा विवाहाबाबत विचार बदलला. त्यांच्या सेक्रेटरीकडून बडोदा दरबारात एक खासगी पत्र गेले. यात विवाहाबाबत बापूसाहेब महाराजांचे मतपरिवर्तन झाले असल्याचा उल्लेख होता. यावेळी सयाजीराव महाराज युरोपात होते. त्यांनी तेथून बापूसाहेबांच्या नावे एक पत्र लिहिले व ते रा. ब. रावजी रघुनाथ शिरगावकर यांच्याबरोबर पाठवले. त्यावेळी बापूसाहेब महाराज अक्कलकोटला गेले होते. शिरगावकर तेथे जावून त्यांना भेटले. यावेळी महाराजांनी लग्नाचा फेरविचार करण्याचे मान्य करून श्रीमंत लक्ष्मीदेवी यांना पाहण्याची इच्छा व्यक्त केली. हे समजताच सयाजीराव महाराजांनी श्रीमंत लक्ष्मीदेवींना मुंबईत बोलावून घेतले. १० मार्च १९२२ ला त्या मुंबईत आल्या. त्यावेळी बापूसाहेबही मुंबईत होते. भेटीचा योग जुळून आल्यानंतर दोघांनीही एकमेकांना पसंत केले. यामुळे सावंतवाडी आणि बडोदा घराण्यात दुसऱ्यांदा सोयरीक होणार हे नक्की झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT