ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पुरातत्त्व वैभवात भर घालणारी आणखी ३५ हून अधिक कातळशिल्पे उजेडात आली आहेत. कसालपासून अवघ्या दहा किलोमीटरवरील खोटले (ता. मालवण) गावच्या धनगरवाडी सड्यावर आढळलेल्या या शिल्पांमध्ये मनुष्याकृती, प्राणी, मासे, अमूर्त रचना यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे येथे आढळलेले ‘लज्जागौरी’सदृश कातळशिल्प आश्चर्यकारक असून, आधुनिक काळातील ‘लज्जागौरी’ हे या प्रतिमेचे उन्नत रूप असावे, अशी शक्यता आहे; मात्र या सर्व कातळशिल्पांचे अस्तित्व या परिसरातील चिरेखाणींमुळे धोक्यात आल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. अनेक कातळशिल्पे चिरेखाणींमध्ये नष्टही झाल्याचे समोर आले आहे, अशी माहिती या कातळशिल्पांचा शोध लावणारे अभ्यासक व ‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत यांनी दिली.
लळीत म्हणाले, ‘‘२१ वर्षांपासून जिल्ह्यातील कातळशिल्पांचे संशोधन व अभ्यास करीत आहे. अलीकडेच माझे ‘सिंधुदुर्गातील कातळशिल्पे’ हे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. नवीन कातळशिल्पे शोधण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू असताना खोटले येथील माळरानावर ‘वेताळा’चे चित्र कोरलेले आहे, अशी माहिती मिळाल्यावर मी व डॉ. सई लळीत यांनी या परिसरात मोहीम आखली. या परिसरात राहणारे लक्ष्मण बाबू जंगले यांच्या मदतीने शोध घेतला असता, खोटले आणि पोईपच्या सीमेवर एका टेकडीच्या उतारावरील झाडाझुडपांमध्ये जांभ्या दगडात कोरलेली मानवाकृती निदर्शनास आली. वास्तविक हे एक कातळशिल्प असून, येथील लोकमानस त्याला ‘वेताळ’ म्हणून ओळखते. या संदर्भात काही लोककथाही या भागात प्रचलित आहेत. या ‘वेताळा’ला नवसही बोलले जातात, अशी माहिती मिळाली.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘वेताळाचे हे कातळशिल्प पाहिल्यावर या परिसरात आणखी काही अशाच प्रकारची कातळशिल्पे असण्याची दाट शक्यता होती. तशी विचारणा करता काही ठिकाणी ‘पांडवांची चित्रे’ आहेत, लहानपणी आम्ही ती पाहिली आहेत; मात्र ती शोधावी लागतील, असे श्री. जंगले यांनी सांगितले. ते आणि याच परिसरातील दुसरे रहिवासी नारायण रामा मोडक यांच्या मदतीने सड्यावर शोध घेतला असता ठिकठिकाणी ३५ हून अधिक कातळशिल्पे आढळून आली. या सर्व शिल्पांमध्ये भरलेली माती काढून त्यांची स्वच्छता करून मोजमापे घेण्यात आली.
या कातळशिल्पांमध्ये सहा मनुष्याकृती, तीन चतुष्पाद प्राणी, दोन मासे, गोलाकृती व अन्य १२ अमूर्त शिल्पे, एक शिल्पपट्ट किंवा मांड याचा समावेश आहे. पैकी काही कातळशिल्पे झिजली असून, काही अतिशय सुस्थितीमध्ये आहेत. अगदी सुरुवातीलाच २० फूट व्यासाचे एक वर्तुळाकृती कातळशिल्प नजरेला पडते. येथून अवघ्या काही फुटांवर एक मोठी चिरेखाण आहे. या ठिकाणाहून सुमारे अर्धा किलोमीटर पुढे गेल्यावर टेकडीच्या उतारावर झाडाझुडपांमध्ये एक सुस्पष्ट मानवाकृती दिसते. तिच्या शिराकडच्या बाजूला दगडांचा मोठा ढीग आहे. स्थानिक रहिवासी याला ‘वेताळ’ म्हणून ओळखतात.
अशीच मानवाकृती हिवाळे, कुडोपी येथेही आढळली आहेत. याचठिकाणी एक गुहासुद्धा आढळली; मात्र आता ती मातीने भरली आहे. येथून आणखी सुमारे एक किलोमीटर परिसरात एका छोट्याशा टेकडीवर एकाच ठिकाणी विविध प्रकारची ३० कातळशिल्पे आढळून येतात. आमच्यासोबत असणाऱ्या स्थानिकांनीही ती प्रथमच पाहिली. या सर्व कातळशिल्पांमधील माती, गवत काढल्यानंतर ती स्पष्ट दिसू लागली. याठिकाणी वाघासारख्या प्राण्याची दोन चित्रे अतिशय महत्त्वपूर्ण आहेत.’’
खोटले-धनगरवाडी परिसरात ३५ हून अधिक कातळशिल्पे
मानवाकृती, प्राणी, मासे, अमूर्त आकृत्यांचा समावेश
कातळशिल्पे या आदिमानवाच्या पाऊलखुणा
चिरेखाणींपासून कातळशिल्पांना धोका
काही कातळशिल्पे
खाणींमध्ये नष्ट
सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात जांभ्या दगडाच्या सडेपठारांवर आढळणारी ही कातळशिल्पे म्हणजे आदिमानवाच्या या परिसरातील वास्तव्याच्या पाऊलखुणा आहेत. या कातळशिल्पांची निर्मिती मध्याश्मयुग ते नवाश्मयुग (इसवी सनपूर्व २० ते १० हजार वर्षे) या काळात झाली असावी. या काळात मानव हा भटका शिकारी अवस्थेत होता. अलीकडेच राज्याच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालयाने केंद्र सरकारमार्फत कातळशिल्पांना ‘जागतिक वारसा स्थळ’ म्हणून मान्यता मिळावी, असा प्रस्ताव ‘युनेस्को’ या जागतिक संस्थेकडे पाठविला होता. तो प्राथमिक स्वरूपात स्वीकारून त्यांचा समावेश तात्पुरत्या यादीत केला आहे. यामध्ये सिंधुदुर्गातील कुडोपी येथील कातळशिल्पांचा समावेश आहे. ही घटना केवळ जिल्ह्याच्याच नव्हे, तर महाराष्ट्राच्या दृष्टीनेही भूषणावह आहे.
- सतीश लळीत, कातळशिल्प अभ्यासक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.