ओरोस : ऐतिहासिक, नैसर्गिक, सामाजिक वारसा गेली ५०० वर्षे जपणारा जिवंत ठेवा म्हणजे मालवण तालुक्यातील धामापूर तलाव. या तलावातील अनेक गोष्टींचा उलगडा अद्याप झालेला नाही. येथील निसर्ग व तलाव हे नेहमीच जगभरातील नागरिकांसाठी आकर्षण राहिले आहे. या तलावाचा वारसा, इतिहास व महत्त्व सांगणारी शॉर्ट फिल्म तयार करण्यात आली आहे. ‘मी धामापूर तलाव बोलतोय’ या शीर्षकाखाली तयार झालेल्या या शॉर्ट फिल्मचा प्रीमियर शो शुक्रवारी (ता. ८) दुपारी चारला बॅ. नाथ पै शैक्षणिक भवन, एमआयडीसी कुडाळ येथे दाखविण्यात येणार आहे. खास विद्यार्थ्यांसाठी याचे आयोजन केले आहे.
धामापूर तलाव म्हटले की, निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेले सौंदर्य डोळ्यासमोर उभे राहते. या तलावाकाठी तासनतास उभे राहून येथील सौंदर्य डोळ्यात साठवून ठेवावेसे वाटते. तलावाकाठी भगवती मंदिरानजीक असलेल्या पायऱ्या म्हणजे या अद्भुत सौंदर्यानजीक घेऊन जाणारी शिडी आहे. तेथील पाणी, काठी असणारे जंगल, त्या जंगलात पशु-पक्ष्यांचा असलेला किलबिलाट तसेच प्राण्यांचे वास्तव्य हे सर्वच अचंबित करणारे आहे.
या तलावाचा इतिहास ऐकून आहोत, वाचला सुद्धा आहे; मात्र आता चित्रफितीद्वारे पाहण्याची संधीही उपलब्ध झाली आहे. शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून ‘मी धामापूर तलाव बोलतोय’ या शीर्षकाखाली ही फिल्म प्रसिद्ध झाली असून, त्याचे सध्या प्रीमियर शो सुरू आहेत.
स्यमंतक जीवन शिक्षण विद्यापीठ यांच्या माध्यमातून ही शॉर्ट फिल्म बनविली आहे. अलीकडेच धामापूर तलावाचा समावेश वल्ड हेरिटेजमध्ये झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर बनविलेल्या शॉर्ट फिल्मला विशेष महत्व प्राप्त झाले असून उत्सुकताही निर्माण झाली आहे. या पाणथळ भागाची जनजागृती व्हावी, येथील नैसर्गिक ठेव्याची माहिती व्हावी, या उद्देशाने ही फिल्म तयार केली आहे.
विविध भाषांमध्ये...
धामापूर तलावाचा वारसा सांगणारी ही शॉर्ट फिल्म मराठी भाषेत बनविण्यात आली आहे. तशीच ती हिंदी, इंग्रजी या भाषांसह जगातील विविध भाषेत बनविली आहे.
मी धामापूर तलाव बोलतोय’ ही शॉर्ट फिल्म तयार झाल्यानंतर पहिला शो गोवा येथे आर्ट फेस्टिव्हलमध्ये दाखविला होता. ४ एप्रिलला हा शो झाला. त्यानंतर दुसरा शो कुडाळ एमआयडीसी येथील बॅ नाथ पै शिक्षण भवनात ८ जुलैला विद्यार्थ्यांसाठी दाखविण्यात येणार आहे. त्यानंतर मुंबई, पुणे येथील येथील विद्यार्थ्यांसाठी ही शॉर्ट फिल्म दाखविण्यात येणार आहे.
- लक्ष्मण आरोसकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.