पारंपरिक भात  sakal
कोकण

सिंधुदुर्ग : पारंपरिक भातबियाणे संकरितवर ‘भारी’!

उलट प्रवास; सुगंधी तांदूळ पडला मागे; आहारातील महत्त्वही ठळक

सकाळ वृत्तसेवा

पारंपरिकचा उतरता काळ

जिल्ह्यात १९९० ते १९९५ पर्यंत पारंपरिक भात बियाण्यांच्या वापर केला जात होता; परंतु यातील अधिक बियाणी अधिक उंच वाढणारी होती. त्यामुळे भात परिपक्व झाल्यानंतर ते जमिनीवर कोसळून नुकसान होण्याचे प्रकार अधिक असायचे. भाताची लोंबी जमिनीवर पडायची आणि शेतकऱ्यांच्या हातात गवत यायचे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लागवड केल्यानंतर शेतकऱ्याला अपेक्षित उत्पादन मिळत नव्हते. याच काळात सुधारित आणि संकरित भात बियाण्यांचा प्रचार आणि प्रसार जोमाने सुरू झाला. कमी उंचीची आणि अधिक उत्पादन देणारी सुरक्षित भातबियाणी उपलब्ध होऊ लागली. उत्पादन क्षमता या एकाच निकषावर शेतकऱ्यांनीदेखील मागचापुढचा कसलाही विचार न करता या बियाण्यांचा सर्रास वापर करण्यास सुरुवात केली. परिणामी, पिढ्यानपिढ्या जपलेली, संवर्धन केलेली आणि पोषणमूल्य असलेली भातबियाणी शेतातून गायब होऊ लागली. ज्यांना बियाण्यांचे महत्त्व माहिती होते, अशा मोजक्या शेतकऱ्यांनी काही प्रमाणात त्या पिकांची लागवड करून उत्पादन घेणे सुरू ठेवले; परंतु त्यांची संख्या नगण्य होती. अनेक भागातून पारंपरिक भातबियाणे नामशेष होण्याच्या मार्गावर होते.

संकलन, संवर्धनावर भर

पारंपरिक भातबियाण्यांमध्ये पोषणमूल्य आणि औषधी गुणधर्म आहेत, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काही संस्था, शेतकरी, फार्मर कंपनी, पारंपरिक भात बियाण्यांचे महत्त्व पटलेले काही तज्ज्ञ यांनी पारंपरिक भातबियाण्यांचे संकलन आणि संवर्धनाचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू केले आहे. खेड्यापाड्यात जाऊन शेतकऱ्यांकडे असलेली बियाणी ही मंडळी संकलन करण्याचे काम करीत आहेत. त्यातून भातबियाण्यांची ५२ बियाणी उपलब्ध झाली आहेत.

पोषणमूल्य, औषधी गुणधर्म

पारंपरिक भात बियाण्यांच्या तांदळामध्ये पोषणमूल्य आणि औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते. प्रत्येक बियाण्यांचे गुणधर्म वेगळे असल्याने कोणता तांदूळ आहारात वापरावा, हे देखील माहिती करून घेणे आवश्यक आहे.

मागणी वाढतेय

कीटकनाशक आणि रासायनिक खतांच्या अवास्तव वापराचे परिणाम आता दिसत आहेत. त्यामुळे बहुतांशी ग्राहक विषमुक्त अन्नाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे पुन्हा पारंपरिक तांदळाची मुंबई, पुण्यासह विविध शहरांमध्ये मागणी वाढली आहे. त्यासाठी प्रतिकिलो १०० ते १५० रुपये दर देण्यास ग्राहक तयार आहेत. त्यामुळे जरी उत्पादन कमी मिळत असले, तरी उत्पादनाला मिळणारा दर लक्षात घेता आता पारंपरिक भात लागवडीकडे कल वाढेल, अशी अपेक्षा आहे.

विद्यापीठस्तरीय संशोधन हवे

आहारातील पारंपरिक भातबियाण्यांचे महत्त्व काही वर्षांत अधोरेखित झाले. ज्या दोषांमुळे त्या बियाण्यांपासून शेतकरी दूर गेले, ते दोष दूर करण्यासाठी विद्यापीठस्तरावर संशोधन व्हावे. पिकाची हानी होऊ नये या अंगाने संशोधन झाल्यास पारंपरिक बियाण्यांचा सुकाळ होईल.

त्या-त्या भागातील भौगोलिक स्थितीशी जुळवून पारंपरिक भात दीर्घकाळ टिकून राहिले आहे. पारंपरिक भाताचे उत्पादन कमी येते, अशी टीका केली जाते; परंतु ते सत्य नाही. शुद्ध बियाणे निवडल्यास काही जातीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळते. पात कापणे, नत्रयुक्त खताचा मर्यादित वापर करणे, कणखरपणा येण्यासाठी सिलिकॉनयुक्त भात तुसाची राख, बायोचार, पेंढा, उसाचे चिपाड, नारळाच्या झावळ्या व सेंद्रिय खतांचा यशस्वी वापर करणे गरजेचे आहे.

- प्रमोद जाधव, उपायुक्त, समाजकल्याण विभाग, सिंधुदुर्ग तथा पारंपरिक भात बियाण्यांचे अभ्यासक

कोकणातील शेतीचा शाश्वत विकास घडवायचा असल्यास स्थानिक पिके व त्यांची मूल्यवर्धित उत्पादने पुढे आणणे आवश्यक आहे. आपल्याच बियाणांची जोपासना व सुधारणा करण्याचे ज्ञान शेतकरीवर्गापर्यंत पोहोचायला हवे.

- संतोष गावडे, अध्यक्ष, अॅग्रिकार्ट कंपनी, कुडाळ

पूर्वी अन्न हेच औषध मानले जायचे; परंतु आता हेच अन्न विष बनत असून ते लोकांच्या लक्षात येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे लोक पोषणमूल्य असलेल्या अन्नाकडे वळत आहेत. काही वर्षांपासून स्थानिक भात आणि कडधान्य पिकांचा अभ्यास करीत आहोत. त्यातून पोषणमूल्य असलेल्या बियाण्यांचे संकलन, संवर्धन करीत शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहोत. शेतात विविध पिकांचे प्रयोग करीत असून, तीन-चार वर्षांत लाल पोहे, पेजेचा तांदूळ, तांदूळ आदीपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ३० लाखांची उलाढाल केली आहे.

- संजय पाटील, प्रकल्प समन्वयक, बाएफ पुणे

सिंधुदुर्ग-रत्नागिरीत ५२ जाती

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत ५२ प्रकारची पारंपरिक भातबियाणी आढळून आली आहेत. यामध्ये वालय-प्रकार दोन, बेळा-प्रकार दोन,पाटणी-प्रकार दोन, कोथिंबिरी, लवेसाळ, विक्रम, करमळी, डामगा छोटा बेळा, सरवट, मुणगा-प्रकार दोन, सोरटी, खारा मुणगा, जांभळा भात, शिर्डी, यलकट, रुची, जाड मुणगा, आंबे मोहर, रत्ना, महाडी, बारीक पाटणी, तुर्या, भद्रा, फोंडा लाल, खारल, वरंगळ, घाटीपकंज, खामडी, करहानी याशिवाय ओळख न पटलेल्या तीन प्रकारांचा समावेश आहे. काळ्या भातांचे पाच प्रकार आढळले आहेत.

अधिक उत्पादन देणारी सुधारित आणि संकरित भात बियाणी आल्यानंतर आपसूकच पौष्टिक गुणधर्म आणि विशिष्ट चव असलेली पारंपरिक भात बियाणी मागे पडली; परंतु गेल्या पाच-सहा वर्षांत पारंपरिक भाताच्या तांदळाचे आहारातील महत्त्व लोकांना कळू लागले आहे. क्रेझ असलेल्या सुगंधी तांदळाला देखील पारंपरिक तांदळाने किमतीत मागे टाकले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची वाटचाल पुन्हा एकदा सुधारित, संकरितकडून पारंपरिक भातबियाण्यांकडे सुरू झाली आहे. या भातबियाण्यांची सीड बँक नुकतीच सुरू झाली असून, पारंपरिक भातबियाण्यांच्या संवर्धनाच्या दृष्टीने हे सकारात्मक पाऊल मानले जात आहे.

- एकनाथ पवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Fire News: कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ९ गाड्या दाखल

Latest Marathi News Updates : खेरवाडी उड्डाणपुलावर चालत्या कारने घेतला पेट

Jalgaon Jamod Assembly Election 2024 Result : जलंब मतदार संघाचा विक्रम मोडत जळगावने रचला नवा इतिहास

Phulambri Assembly Election 2024 Result : फुलंब्री विधानसभेत 25 जणांचे डिपॉझिट जप्त! मनसेसह 19 उमेदवारांना नोटा पेक्षाही कमी मतदान

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

SCROLL FOR NEXT