सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा sakal
कोकण

सिंधुदुर्गाच्या पाऊलखुणा : नाराज बापूसाहेब कारभारापासून दूर

शिवप्रसाद देसाई : सकाळ वृत्तसेवा

ब्रिटिशांनी कारभार हातात घेतल्यावर अनेक बदल केले. यात तत्कालीन राजे चौथे खेमसावंत (Khimavant) उर्फ बापूसाहेब यांचा सल्ला घेतला जायचा; मात्र बऱ्याचदा तो मानला जात नसे. यातून नाराज होवून बापूसाहेबांनी कारभारातून हळूहळू लक्ष काढून घेतले. याच काळात संस्थानमध्ये बंडाची चाहूलही लागली.

सावंतवाडी संस्थानचे पोलिटिकल सुप्रिटेंडन्ट रिचर्ड स्पूनर यांनी विविध खात्यांमध्ये सुधारणा करण्याचे प्रयत्न सुरू केले. किल्ल्यात व इतर ठिकाणी लोक कमी करून स्वतंत्र फौज (फलटन) उभी केली. यातील शिपायांना कवायत शिकवण्यासाठी युरोपियन अंमलदारांची नेमणूक केली. शिक्षण क्षेत्रातही बदल करायला सुरूवात केली. १२ नोव्हेंबर १८३९ ला सर्वसामान्य लोकांसाठी शाळा सुरू केली. यात मोडी लिहिणे, वाचणे, व्याकरण, गणित, बिजगणित हे विषय शिकवले जायचे. काही दिवसांतच शाळेत मुलांची संख्या ५० पर्यंत पोहोचली. त्यात २२ ब्राह्मण, ११ वाणी व उर्वरीत इतर जातीचे विद्यार्थी होते. वर्षभरात ही संख्या १२० पर्यंत गेली.

एखाद्या विधवेशी विवाह करण्यासाठी पाटदाम कर घेण्याची पद्धत होती. स्पूनर यांनी ही पद्धत बंद केली. पत्राची ने-आण करण्यासाठी पोष्टाची स्थापना केली. यासाठी पत्र कोठे पाठवायचे यावर त्याचे पैसे ठरत असत. त्याकाळात ठाण्याहून आलेल्या एका पत्राला १ रुपया ९ आणे मोजावे लागायचे. सैन्याच्या फलटणीतील लोकांची शुश्रृषा करण्यासाठी आणि सर्वसामान्यांना मोफत औषधे मिळावी यासाठी त्यांनी दवाखान्याची स्थापना केली. बहुसंख्य सुधारणा स्पूनर यांच्या कारकीर्दीत झाल्या.

या कारभारात ब्रिटिश बापूसाहेबांचा सल्ला घ्यायचे; मात्र काही बाबतीत हा सल्ला मानला जात नसे. यातूनच पुढे बापूसाहेबांनी कारभारातील लक्ष काढून घ्यायला सुरूवात केली. पुढे पुढे ते पोलिटिकल सुपरिटेडन्टना भेटही देईनासे झाले. याबाबत त्यांना भेटीसाठी स्पूनर यांनी पत्रेही पाठवली; परंतु त्याचा उपयोग झाला नाही. बापूसाहेबांनी लक्ष काढण्याचे कारण त्यांचा सल्ला मानला न जाण्याशी जोडले जात होते. विशेषतः पाटदाम घेण्याचे बंद करणे योग्य नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. गरिब लोक अडचणीच्यावेळी पाट लावतात. अशा लोकांकडून कर घेणे योग्य नसल्याचे पोलिटिकल सुपरीटेन्डट यांचे म्हणणे होते. त्या काळात ब्रिटिशांनी मोरोकृष्ण लेले यांनाच मदतगार म्हणून नेमले होते. त्यांना या पदावरून हटवावे, असे बापूसाहेबांचे मत होते; मात्र ब्रिटिश ते ऐकेना. १८४० मध्ये स्पूनर यांची बदली झाली. त्यांच्या जागी विल्यम कोर्टनी यांची नियुक्ती झाली. त्यांनीही राजेसाहेबांनी कारभारात लक्ष घालावा म्हणून बरेच प्रयत्न केले. मुंबई सरकारकडून राजेसाहेबांसाठी थैलीपत्र आणली; मात्र त्याचाही उपयोग झाला नाही. शेवटी त्यांनी कारभारातून लक्ष काढूनच घेतले.

कोर्टनी यांनीही राज्यव्यवस्थेत सुधारणा केली. दिवाणी खटल्यांचा निवाडा करण्यासाठी तिरायत कोर्टाची स्थापना करून खटल्यांची होणारी गर्दी कमी करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. यासाठीची फी दाव्याच्या रकमेवर ४ आण्यापासून १२ हजार पर्यंत ठरवण्यात आली. वसुलीच्या सोईसाठी संस्थानचे तीन भाग करून प्रत्येक भागावर कमावीसदार नावाचा एक एक अंमलदार नेमला. १ सप्टेंबर १८४३ मध्ये हा बदल अंमलात आणला. त्याला पोलिस अंमलदार असा हुद्दा दिला गेला. पुढे चोरी, मारामारी अशा फौजदारी फिर्यादींचा निवाडाही त्यांच्याकडेच सोपवण्यात आला.

ब्रिटिशांच्या पूर्णवेळ अंमलानंतर हळूहळू बंडाचे झेंडेही उभे राहू लागले. ५ नोव्हेंबर १८३८ मध्ये एक बंड झाले. आत्मो चौकेकर यांचे बंड म्हणून याची ओळख आहे. चौकेकर हे संस्थानच्या कारभारात खास लोकांपैकी एक होते. त्यांनी राम सावंत, शिवा सावंत तिरवडेकर व बापू पालयेकर यांच्या मदतीने ५ नोव्हेंबर १८३८ ला सकाळीच बंडाचा झेंडा उभारला. शंभर जणांच्या जमावासह त्यांनी ब्रिटिशांना कारभारात मदत करणारे कारभारी मोरोकृष्ण लेले यांच्या घरावर हल्ला केला. यावेळी लेले यांना पकडून बंडवाल्यांनी राजवाड्यात आणले. तेथे त्यांना बसवून ठेवत त्यावर पहारा बसवला. यावेळी बापूसाहेब महाराज झोपले होते. या आवाजाने ते जागे झाले व एकूण प्रकार त्यांना समजला. यावेळी बंडकरांनी राजवाड्यातील कोठाराची कुलपे तोडून आतील धान्य सोबत असलेल्या जमावाला वाटले. यानंतर लेले यांना एका खोलीत बंद करून ठेवले.

यानंतर बंडखोर बापूसाहेब महाराजांना भेटले. तुम्हाला आम्ही गोमन्तक प्रांतात (गोवा) घेऊन जाणार आहोत. निघण्याची तयारी करा, असे सांगून दरवाजावर पहारा लावून ते बाहेर असलेल्या जमावाकडे निघून गेले. थोड्यावेळाने बापूसाहेब देवदर्शनाच्या निमित्ताने बाहेर येवून लेले यांना भेटले. यानंतर त्यांनी राजवाड्यात उपलब्ध सैनिकांच्या मदतीने काही ठिकाणी आपला बंदोबस्त लावला. सायंकाळी याबाबतच्या अफवा बाहेर फुटल्या. यात बंडखोर बापूसाहेब आणि युवराज आनासाहेब यांना घेऊन पळून जाणार असल्याचे वृत्त पसरले.

ब्रिटिशांना हा प्रकार कळताच त्यांनी सैन्याची जमवाजमव केली. दुसऱ्या दिवशी ६ नोव्हेंबरला सकाळी ६ वाजता ब्रिटिशांचे सैन्य राजवाड्याच्या जवळपास पोहोचले. यावेळी बंडकरी पळून जावू लागले. त्यांना ब्रिटिशांनी अडवून राम सावंत, शिव सावंत-तिरवडेकर आणि बापू पालयेकर यांना कैद केले. आत्मो चौकेकर आणि इतर बंडखोर कोटाच्या तटावरून तळ्यात उड्या टाकून पळून गेले.

पुढे ब्रिटिशांनी बंडखोरांची चौकशी केली. त्यांना काय शिक्षा द्यायची याचा सल्ला बापूसाहेबांना विचारला. त्यांनी रिवाजाप्रमाणे बंडखोरांचे हातपाय काढावे असा सल्ला दिला; मात्र ब्रिटिशांनी आपल्या कायद्यानुसार तिघांनाही जन्मठेपेची शिक्षा दिली. त्यांच्यासह एकूण १४ जणांना अहमदाबाद येथे तुरुंगात पाठवले. उरलेल्या ६२ जणांना जामिनावर सोडले.

पुढे चौकेकर यांनी भोजसावंत माणगावकर यांना मदतीला घेवून गोव्यातील तसेच सावंतवाडीतील काहींना गोळा करत १८३८ मध्ये पुन्हा बंड उभारले. त्यांनी हनुमंतगड किल्ला ताब्यात घेतला. सावंतवाडीचा राजवाडा ताब्यात घेण्यासाठी काही मार्गावर आपला अंमल निर्माण केला. ब्रिटिशांनी पुन्हा हे बंड मोडण्यासाठी सैन्य पाठवले. त्यात चौकेकर यांच्यासह १८ जणांना पकडण्यात आले. भोज सावंत यांची सैन्याबरोबरच चकमक होवून त्यांचा मृत्यू झाला. या बंडखोरांना काय शिक्षा द्यावी याबाबत पुन्हा बापूसाहेबांचा अभिप्राय घेण्यात आला. त्यांनी यातील सदाशिव रामचंद्र जोशी यांना संस्थानच्या चालीप्रमाणे ब्राह्मण असल्याने देहांत शिक्षा न देता इतर प्रमुखांना फाशीची शिक्षा द्यावी, बाकिच्यांना कैदेची व इतर शिक्षा देण्याचा सल्ला दिला. ब्रिटिशांनी मात्र पुन्हा आपल्या कायद्यानुसार प्रमुखांना काळ्या पाण्याची आणि इतरांना कैदेची शिक्षा देण्याचा निकाल दिला.

बंडखोरांना दिली अशी नेमणूक

अगदी सुरूवातीला बंड केलेले फोंडसावंत तांबुळकर व त्यांची मुले यांचा संस्थानात उपद्रव सुरूच होता. ब्रिटिशांसाठी ती डोकेदुखी ठरली. अखेर त्यांनी जाहीरनामा काढून हे सर्वजण सरकारच्या स्वाधीन झाल्यास अपराधांना माफी देण्याची ग्वाही दिली. त्याप्रमाणे फोंडसावंत व त्यांचे सात मुलगे हजर झाले. पैकी चौघांनी आळीपाळीने सावंतवाडीत रहावे व उरलेल्या चौघांची कलंबिस्त येथे राहून वतनाची व्यवस्था पहावी. परवानगीशिवाय कोठेही बाहेर जावू नये. अशा अटीवर त्यांना नेमणूक करून दिली.

सतीची प्रथा केली बंद

संस्थान काळात सती जाण्याची प्रथा होती. ब्रिटिशांनी कारभार हातात घेतल्यावर ती बंद केली. याबाबतचा जाहीरनामा काढून त्याची अंमलबजावणी केली. त्याकाळात देवीची साथ यायची. यावर उपाय म्हणून ब्रिटिशांनी देवी डॉक्टर नेमले. त्यांच्यावर देवी आजार पसरू नये यासाठी खबरदारी घेण्याची जबाबदारी असायची.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT