सिंधुदुर्ग : कोल्हापूरकरांकडून पेशव्यांच्या मदतीने किल्ले परत घेतल्यानंतर सावंतवाडीकरांशी संबंधीत राजकीय समीकरणे पुन्हा बदलली. त्यांनी पेशव्यांची मदत घेत पोर्तुगीजांकडून पेडणे महाल परत घेण्यासाठी संघर्ष सुरू केला. याला ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारचे पाठबळ होते. हा महाल मिळवल्यानंतर ग्वाल्हेरहून मिळणारी मदत महादजी शिंदे आणि जीवबादादांच्या निधनानंतर घटली. पोर्तुगीजांनी उचल खात पेडणे महालावर कायमचा ताबा मिळवला. सततच्या युद्धामुळे संस्थानची आर्थिक स्थिती खालावली.
कोल्हापूरकरांकडील ठाणी परत मिळवल्यावर सावंतवाडीकरांनी पोर्तुगीजांकडून तहात गमावलेला पेडणे महाल परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्या तहामध्ये ठरल्याप्रमाणे कोल्हापूरकरांविरोधातील लढाईत पोर्तुगीजांची पूर्ण मदत झाली नव्हती. सावंतवाडीकरांना त्यांचे गेलेले किल्ले, ठाणी परत मिळवून देण्यासाठी पोर्तुगीजांचा काहीच उपयोग झाला नाही. पेडणे महाल परत घेण्यासाठी सावंतवाडीकरांनी सैन्याची काही प्रमाणातील कुमक पेडणे येथे पाठवली. सीमांवर चौक्यापासून आपला अंमल सुरू केला. पोर्तुगीजांनीही सावध होत आपले लोक जागोजागी ठेवले. त्यांच्या प्रभावाखालील कुटुंबांना बार्देसात जावून राहण्याचे आदेश दिले. यात पेशव्यांची सावंतवाडीकरांना मदत होती.
पेशव्यांचे सरदार परशुरामभाऊ पटवर्धन यांना फौज घेवून सावंतवाडीकरांच्या मदतीला पाठवायचे ठरले होते. तिकडे पोर्तुगीजांनाही पेडणे महाल आपल्याकडे ठेवण्यात फारसे स्वारस्य नव्हते. कारण सावंतवाडीकरांना पेशव्यांचा पाठिंबा होता. त्यामुळे संघर्ष अटळ होता. सावंतवाडीकरांनी आपला खर्च देवून पेडणे महाल आपल्याकडे कायमचा ठेवावा, असा पोर्तुगीजांचा प्रस्ताव होता. यासंदर्भातील बोलणे करण्यासाठी पोर्तुगीजांनी आपला वकील बहुगूण कामत याला थेट पेशव्यांकडे पाठवले. तेथे पेशव्यांचे दुसरे एक सरदार देवबा लाड यांनी पोर्तुगीजांच्या म्हणण्याप्रमाणे पर्याय काढण्याचे वकील कामत यांच्याकडे कबुल केले; मात्र सावंतवाडीकरांचे हितचिंतक असलेल्या जीवबादादांना ही गोष्ट पटली नाही. त्यामुळे त्यांनी पेडणे महाल पोर्तुगीजांकडून ताकदीच्या जोरावर मिळवण्याबाबत पेशव्यांकडे शब्द टाकला. ही चर्चा सुरू असतानाच १२ फेब्रुवारी १७९४ला महादजी शिंदे यांचे निधन झाले. त्यामुळे पेशव्यांकडून मिळणाऱ्या मदतीची आशा मावळली.
इकडे सावंतवाडीकरांनी स्वतंत्रपणे सैन्याची जमवाजमव सुरू केली. सोमसावंत उर्फ आबासाहेब व सांतो राम आकेरकर यांच्या नेतृत्वाखाली सप्टेंबर १७९४ मध्ये सावंतवाडीकरांचे सैन्य पेडणेकडे रवाना झाले. पोर्तुगीजांनीही त्यांच्याविरूद्ध लढाईची चांगली तयारी केली होती. दोघांमध्ये चकमक झाली; मात्र पोर्तुगीजांना माघार घ्यावी लागली. नोव्हेंबर १७९४ मध्ये पेडणे महाल सावंतवाडीकरांच्या ताब्यात आला. यानंतर सोम सावंत यांनी पोर्तुगीजांचा पूर्ण पराभव करण्यासाठी पुढे चाल केली. याला शह देण्यासाठी पोर्तुगीजांनी रेडी येथील यशवंतगडावर आरमार पाठवण्याची तयारी केली. याला प्रतीशह देण्यासाठी सावतंवाडीकरांनी जीवबादादांचे भाऊ नरोबादादा यांच्याकडे मदत मागितली. याचदरम्यान जीवबादादा खर्ड्याच्या लढाईला पुण्यात यायचे होते. त्यामुळे त्यांच्याकडून सावंतवाडीकरांना मदत होईल, अशी भीती पोर्तुगीजांना वाटली. त्यामुळे रेडीवर चाल करण्याचा बेत त्यांनी रद्द केला.
तिकडे सावंतवाडीकरांनी आगेकूच सुरूच ठेवली. फोंड्याच्या अलिकडेच पोर्तुगीज आणि सावंतवाडीकरांची लढाई होवून यात सर्व फोंडा महाल सावंतवाडीकरांना मिळाला. तिसरे खेम सावंत उर्फ राजश्री यांच्या कारकीर्दीत खूप लढाया झाल्या. यात खजिन्याची स्थिती खूपच खालावली. फोंड्याजवळील या लढाईत तर खजिना जवळपास रिकामीच झाला. यामुळे सावंतवाडीकरांना पैसे मिळवण्यासाठी अनेक मार्ग अवलंबावे लागले. यातून काही माणसे दुखावलीही गेली. सावंतवाडीकरांच्या दृष्टीने आणखी एक वाईट गोष्ट घडली. ६ जानेवारी १७९६ ला जीवबादादांचे निधन झाले. यामुळे ग्वाल्हेरहून मिळणारे पाठबळ जवळपास बंद झाले. साहजीकच सावंतवाडीकरांचे पारंपरिक शत्रू असलेल्या कोल्हापूरकर आणि पोर्तुगीजांनी उचल खाल्ली. कोल्हापूरकरांनी सावंतवाडीवर स्वारी करत अनेक भागात धुमाकूळ घातला. यावेळी सावंतवाडीकरांनी चंद्रो फर्जंद यांना या सैन्याला शह देण्याची जबाबदारी सोपवली. फर्जंद यांनी आवळेगाव येथे २५ ऑक्टोबर १७९८ला कोल्हापूरच्या सैन्याचा पराभव केला. फर्जंद यांनी या लढाईत मोठा पराक्रम गाजवला. त्यामुळे राजश्री यांनी त्यांना आपला कायमचा सरदार म्हणून नेमले.
कोल्हापूरकरांचे संकट टळताच काही दिवसांनी म्हणजे १८०० मध्ये पोर्तुगीजांनी पुन्हा डोके वर काढले. त्यांचा गर्व्हनर जनरल फ्रान्सीस्को अन्टोनिओ डाव्हेगा काब्राल याने आपला सेनापती कर्नल जाकी व्हिसेंट गोडीनो डिमीरा याच्याबरोबर मेजर डॉस्यांटास आणि ४०० निवडक सैनीकांना पेडणे महाल सावंतवाडीकरांकडून जिंकून घेण्यासाठी पाठवले. या सैन्यासोबत तोफाही होत्या. पेडणेच्या रक्षणासाठी असलेल्या सावंतवाडीकरांच्या सैन्याबरोबर पोर्तुगीजांची तिथल्या रवळनाथ मंदिराच्या जवळ लढाई झाली. यात सावंतवाडीकरांना माघार घ्यावी लागली. या लढाईत सावंतवाडीकरांचे तीन नातलग पोर्तुगीजांनी पकडून आग्वादच्या किल्ल्यात कैद करून ठेवले. पुढे पेडणे महालाचे मुख्य देसाई नागो मादे प्रभू पेडणेकर व रवू वेंक नाईक पारसेकर यांनी पोर्तुगीज सरकारशी तह केला आणि त्यांच्याशी निष्ठेने वागण्याचे कबूल केले. यानंतर पेडणे महाल कायमचा पोर्तुगीजांकडे गेला. एक-दोनवेळा सावंतवाडीकरांनी आपला वकील पोर्तुगीजांशी तह करायला पाठवला; मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही.
गाव दिले इनाम
जीवबादादा आणि त्यांचे बंधू नरोबादादा ज्येष्ठ चिरंजीव नारायणराव यांनी सावंतवाडीकरांची बरीच मोठी कामे केली होती. त्यामुळे त्यांना काही जमीन ईनाम म्हणून द्यावी, असा निर्णय राजश्रींनी घेतला. २ एप्रिल १७९४ला त्यांना तळगाव तर्फ वराड हा गाव इनाम म्हणून दिला. कोल्हापूरकरांकडून किल्ले परत घेताना द्यावा लागलेला पैसा जीवबादादा आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्या क्रेडीटवर सावकाराकडून मिळवून दिला होता. त्याच्या फेडीसाठी तेच किल्ले या कुटुंबाकडे स्वाधीन करावे असे सावंतवाडीकरांना वाटत होते; मात्र जीवबादादा आणि इतरांनी ते कबुल केले नाही.
दुष्काळाने केले हाल
सावंतवाडी संस्थानमध्ये १७९२ला दुष्काळ पडला. यामुळे पिक फार कमी प्रमाणात आले. सगळीकडे हाहाकार माजला. धान्याचे भाव गगनाला भिडले. एरवी १ रुपयाला २३ किंवा २४ शेर मिळणारा तांदूळ तितक्या रकमेत पाच शेरही मिळेना. यावेळी बाहेरून धान्य आणण्याची सोय नव्हती. लोकांचे खूप हाल झाले. १७९३ मध्ये मात्र चांगला पाऊस होवून पिक घेता आले; मात्र धान्याचे भाव कमी व्हायला दोन वर्षे लागली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.