पर्यटनाची गाडी रुतली जागेवरच sakal
कोकण

सिंधुदुर्ग : पर्यटनाची गाडी रुतली जागेवरच

कोट्यवधीचा निधी येऊनही ठरतो निरुपयोगी

- नंदकुमार आयरे

सिंधुदुर्गनगरी: दर्जेदार कामे आणि योग्य नियोजनाअभावी सिंधुदुर्गातील पर्यटन विकासाची गाडी जाग्यावरच धूर काढत अडकली आहे. आतापर्यंत करोडो रुपयांचा पर्यटन निधी येऊनही अपेक्षित विकासाचा टप्पा गाठता आलेला नाही. परिणामी निधी येऊनही पर्यटन जिल्ह्यात सर्वदूर पोहोचलेले नाही. सिंधुदुर्गच्या पर्यटनासाठी राज्याने नुकतेच आणखी २३ कोटी रुपये मंजूर केले. गेल्या आर्थिक वर्षात विविध योजनांमधून पर्यटनावर निधी खर्च झाला; मात्र हा निधी आणि प्रत्यक्ष पर्यटनावर पडणारा प्रभाव याचे कधीतरी ऑडिट करावे लागणार आहे. सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा म्हणून घोषित होऊन २० वर्षे उलटली.

जिल्ह्याच्या पर्यटनवृद्धीसाठी सोयी सुविधा निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंत निधिही मोठ्या प्रमाणात आला; परंतु प्रत्यक्षात निधी किती प्रभावीपणे वापरला गेला हा प्रश्नच आहे. आलेल्या निधीपैकी किती टक्के निधी प्रत्यक्षात कामांवर खर्च होतो हा न सुटणारा प्रश्न आहे. दरवर्षी पर्यटन विकासासाठी कोट्यवधीचा निधी येऊनही तो कामांची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेच्या व ठेकेदारांच्या घशात जात असेल तर पर्यटन विकासाची गाडी पुढे कशी जाणार? पर्यटनाच्या नावाखाली परस्पर मेवा पळवणारे तिसरेच आहेत, याचे उदाहरण द्यायचे झाले तर पर्यटन वाढीमध्ये सर्वांत महत्त्वाची भूमिका असलेल्या रस्‍ते विकासाचा विचार करता येईल. कोट्यवधीचा निधी खर्चूनही काही ठिकाणी रस्तेच अस्तित्वात नाहीत.

पराकोटीच्या भ्रष्टाचारामुळे पहिल्याच पावसात रस्ते गायब झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे पर्यटनाला खिळ बसली आहे. जिल्ह्यातील ठराविक पर्यटनस्थळे केंद्रित करून जिल्ह्याचा पर्यटन विकास सुरू आहे. जिल्ह्यातील शेकडो पर्यटनस्थळे ेअद्यापही दुर्लक्षितच आहेत. रस्ते सुस्थितीत नसल्याने वाहतूक सेवा नाही, याचा परिणाम येथील पर्यटनावर होत आहे.

प्रत्यक्षात प्रकल्पावर खर्च किती?

जिल्ह्याच्या भविष्यातील पर्यटनाची मोठी स्वप्ने रंगवली जात आहेत. घोषणाही मोठ्या होतात; पण प्रत्यक्षात आतापर्यंत किती पर्यटन प्रकल्प अस्तित्वात आले आणि ते पूर्ण झाले हे सांगणे फारच कठीण आहे. पर्यटनदृष्ट्या महत्वाकांक्षी असलेला ‘सी-वल्ड’ सारख्या प्रकल्पालाही राजकारणाचे ग्रहण लागले आहे ते सुटेल तेव्हा प्रकल्प मार्गी लागेल. अशीच परिस्थिती सध्या आहे. अनेक पर्यटन विकासकामांच्या घोषणा झाल्या; पण प्रत्यक्षात काहीच झाले नाही.

वाहन व्यवस्था हवी दर्जेदार

सिंधुदुर्ग निसर्गरम्य आहे. ऐतिहासिक गड, किल्ले, मंदिरे आहेत. विविध ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करणारे धबधबे, स्वच्छ समुद्र किनारे आणि पर्यटन स्थळे आहेत. पर्यटकांचा ओघही जिल्ह्यात वाढत आहे; पण केवळ निसर्ग सौंदर्य, पर्यटनस्थळे असून उपयोगाची नाहीत तर पर्यटनस्थळांचा सर्वांगीण विकास, तेथे जाणारे रस्ते, तेथील सोयीसुविधा आणि वाहन व्यवस्था दर्जेदार असणे आवश्यक आहे. याकडे दुर्लक्ष झाले आहे.

निधी अडकतो टक्केवारीत

केवळ पर्यटन विकासासाठी कोट्यवधी रुपये निधी येऊन विकास होणार नाही तर प्राप्त होणारा निधी शंभर टक्के विकासकामांवर खर्च झाला पाहिजे. सद्यस्थितीत येणारा निधी टक्केवारीत विभागला जात असल्याने पर्यटनदृष्ट्या दर्जेदार कामे पाहायला मिळत नाहीत. जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी कोट्यवधीचा निधी मिळत असला तरी, जोपर्यंत विकासकामातील भ्रष्टाचाराला ब्रेक लावला जात नाही तसेच येथील रस्ते, पाणी व अन्य आवश्यक सोयी सुविधा जोपर्यंत दर्जेदार निर्माण होत नाहीत, तोपर्यंत कितीही निधी आला तरी जिल्ह्याच्या पर्यटनाची गाडी पुढे सरकणार नाही. त्यासाठी कठोर पावले उचलावी लागणार आहेत.

पर्यटन विस्तारेना

सिंधुदुर्गात पर्यटन मालवण आणि काही किनारपट्टी भागातच स्थिरावल्याचे दिसत आहे. समुद्रकिनाऱ्याचे आकर्षण हे यामागचे कारण आहे. वास्तविक पर्यटन जिल्ह्यात सर्वदूर पसरायला हवे. तसे होताना दिसत नाही. निधी खर्च नियोजनाचे हे अपयश म्हणावे लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT