रत्नागिरी : जिल्ह्यात सुमारे 5 टक्के दिव्यांग आहेत. यातील काहींना परिस्थितीमुळे दोन वेळचे अन्नही खायला मिळत नाही. काहींना स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळत नाही. अशांकरिता आस्था सोशल फाउंडेशन ‘सन्मानाने अन्न’ ही योजना राबवणार आहे. येत्या 1 जानेवारीपासून हा उपक्रम सुरू करण्याचा मानस आहे, अशी माहिती संस्थापक सुरेखा पाथरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आस्थाच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलताना पाथरे म्हणाल्या, कोणत्याही दिव्यांग व्यक्तीवर उपाशी राहण्याची वेळ येऊ नये, लाचारीने भीक मागून जगण्याची हतबलता नशिबी येऊ नये यासाठी हा उपक्रम सुरू करत आहोत. संबंधितांनी आस्थाकडे संपर्क साधल्यानंतर सत्यता, वास्तव परिस्थिती पडताळून अशा व्यक्तींच्या कायमस्वरूपी अन्नाची सोय होईपर्यंत अन्न पुरवण्याची व्यवस्था करणार आहे. ज्या भावनेने देवाला नैवेद्य अर्पण करतो, त्या भावनेने अन्नदानासाठी इच्छुक असणार्या दात्यांनी आस्थाकडे संपर्क साधावा. तसेच यासाठी पारदर्शक हिशोब, देणगीदारांची रक्कम 80 जी लाभास पात्र राहील. तसेच आपले दान सत्पात्री होईल, अशी ग्वाही श्रीमती पाथरे यांनी दिली.
अन्नदानासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, शासन, देवस्थाने, मंडळे, ग्रामसंघ, लोकप्रतिनिधी, दानशूर व्यक्तींशी समन्वय साधण्यात येणार आहे. जी दिव्यांग व्यक्ती अन्नाबाबतीत स्वयंपूर्ण झाली की ही मदत थांबविण्यात येणार आहे. या उपक्रमाला रत्नागिरीसह बाहेरूनही हातभार लागेल अशी अपेक्षा संकेत चाळके यांनी व्यक्त केली. अधिक माहितीसाठी आस्था सोशल फाउंडेशन, संपर्क कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, मारुती मंदिर येथे संपर्क साधावा, असेही त्यांनी आवाहन केले. पत्रकार परिषदेला शमिन शेरे, डॉ. श्रीष्टी भार्गव, आस्था हेल्पलाईनचे समन्वयक संकेत साळवी, प्रथमेश पडवळ, प्रसाद आंबोळकर, संपदा कांबळे, स्नेहीका तांडेल, मयुरी जाधव, अनुष्का आग्रे आदी उपस्थित होते.
डोळ्यातले अश्रू पाहून सुचली कल्पना!
संगमेश्वरमध्ये हक्काचे धान्य मिळत नसल्याचा एका माऊलीचा फोन आला. त्यांचा मोठा मुलगा अपघातामुळे कोमात व दुसरा जन्मतः मतिमंद आहे. मग रेशनकार्ड वेगळे केले, त्यात मोठ्या मुलाला घेतले नाही. तेव्हा माऊलीला रडू कोसळले. ‘आस्था’ने तहसीलदारांकडे पाठपुरावा केला. अन्नधान्य मिळू लागले. पण त्या माउलीचे अश्रू पाहून अशा अनेक दिव्यांगांसाठी ‘सन्मानाने अन्न’ योजना सुचल्याचे पाथरे म्हणाल्या.
संपादन- अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.