पाली : राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत दोन गणवेश मोफत दिले जातात. जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या शाळांतील जवळपास ४४ लाख ६० हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळतो. मात्र शैक्षणिक वर्ष सुरू होऊन तीन महिने उलटली तरी राज्यभरातील निम्म्याहून अधिक विद्यार्थी गणवेशाविना शाळेत जात आहेत.
यामुळे बहुजन विद्यार्थी संघटना आक्रमक झाली असून आठ दिवसांत सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नाही तर संघटनेच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाणी यांनी सांगितले. शैक्षणिक वर्ष २०२४ - २५ करिता महाराष्ट्र सरकारने एक राज्य, एक गणवेश योजना आणून इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना एक स्काऊट, गाईड गणवेश व एक नियमित गणवेश देण्याचे ठरवले आहे.
त्यासाठी गुजरातमधील एका कंपनीला कापड खरेदीचे कंत्राट दिले असून गणवेश शिवण्याचे काम महिला आर्थिक विकास महामंडळाला देण्यात आले आहे. परंतु राज्यातील निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांना अद्याप एकही गणवेश मिळालेला नाही. त्यामुळे दुसरा गणवेश मेच्या सुटीतच मिळतो की काय, असा प्रश्न वाणी यांनी उपस्थित केला आहे.
गुजरातमध्ये कपड्याचा ठेका
यापूर्वी शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर शिक्षण विभागाकडून पैसे वर्ग केले जायचे. शाळा व्यवस्थापन समिती नजीकच्या बचत गटाकडून किंवा व्यापाऱ्यांकडून गणवेश खरेदी करायचे. शाळा सुरू व्हायच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना दोन जोड गणवेश दिले जात होते. परंतु यंदाच्या शैक्षणिक वर्षांमध्ये राज्य सरकारने शाळा व्यवस्थापन समितीचे अधिकार काढून गुजरातमधील एका ठेकेदाराला संपूर्ण महाराष्ट्राला कपडा पुरवण्याचे कंत्राट दिले आहे. परिणामी ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या विद्यार्थ्यांना अजूनही गणवेश मिळाले नाहीत.
सर्व विद्यार्थ्यांपर्यंत गणवेश कसे पोहचणार?
महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या बऱ्याच शाळा दुर्गम भागात असून एक व्यक्ती विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी गणवेश पुरवू शकत नाही. त्यामुळे वंचित आणि आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी हे गणवेशाच्या प्रतीक्षेत असून राज्य सरकार ठेकेदाराला का पाठीशी घालत आहे, असा प्रश्न अनिल वाणी यांनी केला आहे.
गणवेशाचे माप चुकीचे
महिला आर्थिक विकास महामंडळाने काही शाळांना गणवेश शिवून दिले आहेत, परंतु विद्यार्थ्यांची मापे न घेताच ढोबळपणाने गणवेश शिवले गेले असून बऱ्याच विद्यार्थ्यांना हे गणवेश घट्ट किंवा सैल होत आहेत त्यामुळे वंचित आणि आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची चेष्टा करण्याचे काम राज्य सरकार करीत आहे, असा आरोप बहुजन विद्यार्थी संघटनेने केला आहे.
रायगड जिल्ह्यातील १९३८३ विद्यार्थ्यांना अजूनही गणवेश नाही. आतापर्यंत ८१,००६ विद्यार्थ्यांना गणेश वाटप करण्यात आले आहे. मात्र अजूनही १९,३८३ विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत. त्यामध्ये सर्वाधिक विद्यार्थी पनवेल तालुक्यातील असून तब्बल १४, ४५९ विद्यार्थ्यांना अजून गणवेश मिळालेले नाही. तर त्या खालोखाल पेण तालुक्यातील विद्यार्थी असून तब्बल ३,९६४ विद्यार्थ्यांना अजूनही गणवेश मिळालेले नाहीत.
आठ दिवसांमध्ये महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या ४४ लाख ६० हजार विद्यार्थ्यांना मोजे आणि बुटासहित दोन जोड गणवेश नाही मिळाले तर बहुजन विद्यार्थी संघटना राज्यभर आंदोलन करेल.
- अनिल वाणी, प्रदेशाध्यक्ष, बहुजन विद्यार्थी संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.