कोकण

मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ः दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर

CD

सदर ः कोकण आयकॉन
---

72367
सतीश पाटणकर
72368
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर
---

मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ः
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर

साहित्यापासून राजकारणापर्यंत, उद्योगापासून क्रीडापर्यंत प्रत्येक क्षेत्रात कोकणाने देशाला नररत्ने दिली. कोकणच्या सुपुत्रांनी देशाचे नाव आपल्या कर्तृत्वाने उजळवले. त्यासाठी वाटेल तो संघर्ष त्यांनी केला. कोकणच्या कडेकपाऱ्या आणि दगड-मातीतून इथला इतिहास दरवळतो. आपल्‍या तलवारीच्या बळावर इतिहास घडविणारी पोलादी मनगटाची नररत्ने जशी या भूमीत जन्माला आली, तशीच आपल्या अनुभवविश्वाच्या आणि शिक‍वणुकीच्या बळावर पोलादी समाज मन घडवणाऱ्या संत विभूतींनीही या भूमीला आपल्या अस्तित्‍वाने पावन केले आहे. साहित्य, काव्यशास्त्र,संगीत आणि अष्टकलांची खाण असलेल्‍या या भूमीत तुम्ही-आम्ही जन्‍माला आलो. याचा निश्चितच सर्वांना अभिमान वाटणे साहजिकच आहे.
- सतीश पाटणकर
.............
कोकण म्हणजे नररत्नांची खाण. साहित्य, संगीत, कला, नाटक, राजकारण, पत्रकारिता, शिक्षण अशा अनेक क्षेत्राला या परिसराने हिरे-माणके बहाल केली. मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर हे असेच एक दिग्गज व्यक्तिमत्व कोकणच्या याच लाल मातीत जन्माला आले. ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ या पहिल्या मराठी वृत्तपत्राच्या रुपाने मराठी वृत्तपत्रसृष्टीची मुहूर्तमेढ रोवणारे बाळशास्त्री जन्मले तेव्हाच्या रत्नागिरी इलाख्यातील (आताचा सिंधुदुर्ग जिल्हा) देवगड तालुक्यातील पोंभुर्ले या गावात. मराठीतील ‘दर्पण’चा पहिला अंक ६ जानेवारी १८३२ रोजी प्रसिद्ध झाला. पेशवाईचा अस्त आणि भारताच्या स्वातंत्र्याचा उदय हा मोठा कालखंड आहे. तो ब्रिटिशांच्या प्रभावाचा काळ. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्रांतिकारी बदल त्या काळात घडून आले. अनेक विचारवंत, बुद्धिवादी समाजधुरीण जन्मास आले. त्यातील एक रत्न म्हणजे (कै.) बाळशास्त्री जांभेकर. आचार्य अत्रे यांनी त्यांना ‘राष्ट्रजागृतीचे अग्रदूत’ म्हटले आहे. पेशवाईचा अस्त १८१८ साली झाला आणि त्यानंतर केवळ चौदा वर्षांनी ते जन्मास आले व एका नव्या पर्वाचा आरंभ झाला. जांभेकर यांचा जन्म २० फेब्रुवारी १८१२ मध्ये पोंभुर्ले (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) येथे झाला. वैदिकशास्त्र पारंगत अशा पुराणिकाच्या पोटी ते जन्मले. त्यांचे शिक्षण घरीच वडील गंगाधरशास्त्री व मातोश्री सौ. सगुणाबाई यांच्यासारख्या धार्मिक व सदाचारसंपन्न पुराणिकांच्या सान्निध्यात झाले. प्राचीन वाङ्मयाचे बाळकडू व संस्कार घरातून मिळाल्यामुळे त्यांचे संस्कृत व मराठी विषयांचे अध्ययन वयाच्या तेराव्या वर्षी पूर्ण झाले. त्यामुळे ते मराठी लेखन, वाचन, व्यावहारिक गणित, तोंडी हिशोब, रामदास-तुकाराम इत्यादी चरित्र, वामन, मोरोपंत आदी प्रसिद्ध कवींच्या कविता व अमरकोश-पंचकाव्यामध्ये आठव्या वर्षी पारंगत झाले. त्यानंतर ते आंग्ल भाषेच्या अभ्यासासाठी मुंबईला आले. एल्फिन्स्टन यांनी २१ ऑगस्ट १८२२ ला मुंबई येथे ‘दी बॉम्बे नेटिव्ह स्कूल, बुक अँड स्कूल सोसायटी’ नावाची शिक्षण संस्था काढली. त्या संस्थेच्या शाळेत बाळशास्त्रींनी प्रवेश घेतला. इंग्रज प्राध्यापकाने हात टेकावे, असे नैपुण्य त्यांनी त्या परकीय भाषेत मिळविले. ते सर्व विद्यार्थ्यांमध्ये अग्रगण्य होते व शिक्षकांचे आवडतेही झाले. शिक्षणाशिवाय विशेषत: पाश्चात्य देशांतील आधुनिक ज्ञानाशिवाय तरणोपाय नाही, ही बाळशास्त्रींची भूमिका होती. सतराव्या वर्षी त्यांनी ‘नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’च्या सेक्रेटरीपदासाठी अर्ज केला. त्या वेळी त्यांना संस्कृत, इंग्रजी, मराठी, उच्च गणित, भूगोल, गुजराती, बंगाली, फारसी इतक्या विषयांत गती असल्याचे त्यांनी नमूद केले होते. त्यांची डेप्युटी सेक्रेटरीपदावर नेमणूक व अवघ्या दोन वर्षांत त्यांना सेक्रेटरीपदावर बढती मिळाली. गव्हर्नर लॉर्ड माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन १८२७ मध्ये निवृत्त होऊन विलायतेला परत गेल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ मुंबई शिक्षण मंडळी यांनी त्यांच्या नावाने एल्फिन्स्टन स्कूल सुरू केले. जांभेकर यांची प्रखर विद्वत्ता पाहून इंग्रज राज्यकर्त्यांनी एल्फिन्स्टन कॉलेजात त्यांची इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून नेमणूक केली. १७ इंग्रज प्राध्यापकांच्या ताफ्यात ते एकमेव भारतीय प्राध्यापक होते. राष्ट्रीय नेते दादाभाई नौरोजी व गणिताचे प्रकांड पंडित केरूनाना छत्रे हे त्यांचे विद्यार्थी होते. त्या काळात मुंबईबाहेर सरकारी इंग्रजी व मराठी शाळा फार थोड्या होत्या. सन १८४४ पर्यंत पुणे, ठाणे, सुरत या तीन ठिकाणी इंग्रजी शाळा सुरू झाल्या होत्या. उपरोक्त प्रत्येक विभागासाठी मुख्य शाळा तपासनीस (ज्यांना ‘सुपरिडेंटेंट’ संबोधित असत) नेमण्यात आले. त्या पदावर बाळशास्त्री जांभेकर यांनीही दक्षिण विभागातील मराठी व कानडी शाळा तपासणीचे काम वाहतुकीची साधने उपलब्ध नसतानादेखील चार वर्षे केले. म्हणून ते पहिले
मराठी शिक्षण अधिकारी होते. ‘बोर्ड ऑफ एज्युकेशन’ने चांगले प्रशिक्षित अध्यापक तयार करावेत, अशी बाळशास्त्रींची कल्पना होती. युरोपीयन अधिकाऱ्यांनी ती कल्पना स्वीकारली आणि आचार्य बाळशास्त्रींच्या शिफारसीने १८४५ मध्ये ‘अध्यापक वर्ग’ (डी.एड., बी.एड. कॉलेज) सुरू केले गेले. त्यांचे पहिले संचालक म्हणून आचार्यांनीच काम पाहिले. मुंबईसारख्या दाट वस्तीत मोहनगरीत शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे, त्यांचे शीलसंवर्धन व्हावे, या उद्देशाने आचार्यांनी मुंबईत त्यांच्या घराशेजारी वाडा भाड्याने घेऊन पहिले विद्यार्थी वसतिगृह सुरू केले. तेथे ते विद्यार्थ्यांच्या शिस्त, आरोग्य, संस्कार व शिक्षण यांकडे जातीने लक्ष देत. केवळ शिक्षणाचा प्रसार करून चालणार नाही, तर सनातनी आणि प्रतिगामी लोकांच्या मनावर बेगडी श्रद्धांचा जो कालबाह्य पगडा आहे तो हटवला पाहिजे, लोकांच्या भावना संवेदना विशाल-उदार झाल्या पाहिजेत, यासाठी जांभेकर हिरीरीने काम करत. त्या विषयावर त्यांचा ‘Liberty of Sentiments’ हा लेख प्रसिद्ध आहे. त्यासाठी देशी भाषेत वृत्तपत्र असणे अत्यावश्यक आहे, हे जाणून त्यांनी मराठीत पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ सुरू केले. बाळशास्त्री यांनी ‘दर्पण’ प्रकाशित करण्यामागील आपली भूमिका १२ नोव्हेंबर १८३१ ला प्रॉस्पेक्ट (प्रस्ताव) या नावाने प्रकाशित केली. ‘दर्पण’चा पहिला अंक ६ जानेवारी १८३२ ला प्रसिद्ध झाला. ते द्विभा‍षिक वर्तमानपत्र होते. एकच वेळी इंग्रजी व मराठीत निघणाऱ्या त्‍या पत्राच्‍या पानातील दोन स्तंभात डावीकडचा स्तंभ इंग्रजी व उजवीकडच्या स्तंभात भाषांतर असे. त्‍यास एकूण आठ पाने असत. जांभेकर यांनी वाचकांची मागणी वाढू लागल्यानी ‘दर्पण साप्ताहिक’ ४ मे १८३२ पासून सुरू केले. जांभेकर यांची संपादकीये विचारप्रवर्तक असत. ते सभ्य प्रतिष्ठित भाषेत सरकारवर सडेतोड टीका करत. ‘दर्पण’ वृत्तपत्र सुरू झाले, तेव्हा ब्रिटिशांचे शासन होते आणि वृत्तपत्र नियंत्रण कडक होते. ते १८३५ नंतर थोडे शिथील झाले. त्यावेळी साक्षर वर्ग कमी होता. त्यामुळे वाचकांची संख्याही कमी होती. तरीही ''दर्पण''चे त्या काळात तीनशे वर्गणीदार होते. तत्कालीन असा एकही विषय नाही की, ज्यास बाळशास्त्री जांभेकर यांनी स्पर्श केला नाही! बाळशास्त्री जांभेकर यांचा ज्योतिष व गणित या विषयांतील अधिकार फार मोठा होता. बाळशास्त्री जांभेकर हे मराठीतील पहिल्या वृत्तपत्राचे संस्थापक तर होतेच, सोबत ते मराठीतील पहिले मासिक ‘दिग्दर्शन’चे संस्थापक संपादक (१ मे १८४०) देखील होते. त्याचबरोबर पहिले मराठी असिस्टंट प्रोफेसर (नोव्हेंबर १८३४), ‘बॉम्बे नेटिव्ह लायब्ररी’, या मुंबईतील पहिल्या सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक (१८४५), नेटिव्ह इंप्रुव्हमेंट सोसायटी या ‘लोकसुधारणा’ व्यासपीठाचे संस्थापक, पहिले मराठी शाळा तपासनीस (१८४४ ते १८५५), पहिल्या विद्यार्थी वसतिगृहाचे संस्थापक (१८४५), कुलाबा वेधशाळेचे पहिले मराठी संचालक (१८४५), ज्ञानेश्वरीची पहिली शिळाप्रतही (छापील प्रत) त्यांनीच १८४६ मध्ये प्रसिद्ध केली. याशिवाय पहिले दूरदृष्टीचे समाजसुधारक, महाराष्ट्राचे आद्यशिक्षण तज्ज्ञ, इतिहास संशोधक म्हणूनही त्यांचा उल्लेख अभिमानाने केला जातो. त्यांच्या फ्रेंच भाषेतील प्राविण्याबद्दल फ्रान्सच्या बादशहाकडून त्यांचा गौरव करण्यात आला होता. बाळशास्त्रींची ग्रंथसंपदा मोठी आहे. अशा अफाट, अचाट कर्तृत्वाच्या बाळशास्त्रींवर ते उच्च शिखरावर असताना वयाच्या अवघ्या चौतीसाव्या वर्षी काळाने झडप घातली. त्यांचा विषमज्वराने १७ मे १८४६ मध्ये मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर मुंबईच्या सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती सर अस्थिकन पेरी यांनी म्हटले की, ‘‘बाळशास्त्री यांच्या दु:खद मृत्यूने पश्चिम भारतावर जेवढी महान आपत्ती ओढवली आहे, तेवढी आपत्ती मुंबईतील कोणाही पुरुषाच्या मृत्यूने मग तो युरोपीयन असो की एतद्देशीय असो अथवा तो कितीही मोठ्या दर्जाचा असो ओढवणार नाही.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आशिष शेलार आघाडीवर

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT