72533
मडुरा ः संमेलनाचे उद्घाटन करताना संजू परब. बाजूस डॉ. मिलिंद तोरसकर, हनुमंत चोपडेकर आदी. (छायाचित्रे ः नीलेश मोरजकर)
72532
मडुरा ः मडुरा तिठा ते हायस्कूलपर्यंत काढण्यात आलेली भव्य दिंडी यात्रा.
साहित्य संमेलनातून साहित्यिक घडावेत
संजू परब ः मडुरा येथे कुमार साहित्य संमेलन उत्साहात, ग्रंथदिंडी शोभायात्रेने रंगत
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १ ः विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून मेहनतीने ते साध्य करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. बांदा नवभारत संस्थेच्या शाळांमधील विद्यार्थी भविष्यात साहित्यिक व्हावेत, अशी दूरदृष्टी ठेवून कार्याध्यक्ष (कै.) आबासाहेब तोरसकर यांनी कुमार साहित्य संमेलन सुरू केले. त्यांनी विद्यार्थ्यांना लिहिण्यासाठी प्रेरित केले. कुमार साहित्य संमेलनातून निश्चितपणे दर्जेदार साहित्यिक निर्माण होतील, असा विश्वास सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त केला.
दी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई आयोजित न्यू इंग्लिश स्कूल, मडुरा हायस्कूल येथे १४ वे ‘नवा विद्यार्थी’ कुमार साहित्य संमेलनावेळी परब बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्था कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरसकर, सचिव कल्पना तोरसकर, संस्था प्रशासकीय अधिकारी मकरंद तोरसकर, गोवा विश्वविद्यालय कोकणी भाषा विभाग प्रमुख तथा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. हनुमंत चोपडेकर, भारतीय सैन्य दलाचे माजी कॅप्टन शंकर भाई, जिल्हा परिषद माजी सदस्य उन्नती धुरी, श्वेता कोरगावकर, सावंतवाडी पंचायत समिती माजी सभापती निकिता सावंत, कास सरपंच प्रवीण पंडित, मडुरा पंचक्रोशी विकास समिती अध्यक्ष भिकाजी वालावलकर, सचिव तुकाराम शेटकर, ज्येष्ठ साहित्यिका वृंदा कांबळी, ज्येष्ठ कवित्री चारुता प्रभूदेसाई, विजय सावंत, बाबू घाडीगावकर, गीतांजली सातार्डेकर, अर्चना परब, भिकाजी धुरी, अन्वर खान, माजी मुख्याध्यापक दशरथ घाडी, सदाशिव गवस, रोणापाल पोलिसपाटील निर्जरा परब आदी उपस्थित होते.
संमेलनाध्यक्ष डॉ. तोरसकर यांनी, कुमार साहित्य संमेलन सुरू करण्यामागे आबासाहेबांचा व्यापक दृष्टीकोन होता. विद्यार्थी दशेपासूनच स्वयंस्फूर्तीने लिहिण्याची गोडी लागावी, असा उद्देश आहे. विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा, असे आवाहन केले. दरम्यान, सकाळी मडुरा तिठा ते न्यू इंग्लिश स्कूल मडुरापर्यंत ग्रंथ दिंडी शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह विद्यार्थी, शिक्षक व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा मोठा सहभाग होता. राजेंद्र सावंत-भोसले यांनी सूत्रसंचालन केले. असनिये हायस्कूल मुख्याध्यापक कैलास जाधव यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. हनुमंत चोपडेकर यांच्या हस्तलिखित भाषणाचे प्रकाशन माजी नगराध्यक्ष रब यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला मडुरा सरपंच उदय चिंदरकर, उपसरपंच बाळू गावडे, मडुरा सोसायटी चेअरमन संतोष परब, संचालक उल्हास परब, प्रकाश गावडे, पाडलोस कृषी तंत्रनिकेतन प्रा. समीर कोलते तसेच श्रीकृष्ण भोगले, आनंद परब, प्रकाश वालावलकर, पिंटो परब, गजानन पंडित, विजय वालावलकर, जीवबा वीर, गौरांग शेलेकर, सुरेश गावडे, बी. बी. देसाई, नितीन नाईक, साक्षी तोरसकर, वैभव नाईक आदी उपस्थित होते. दुपारच्या सत्रानंतर कवी संमेलन कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सायंकाळी उशिरा कार्यक्रमाचा समारोप समारंभ थाटात करण्यात आला.
--
उपक्रमांतूनच साहित्य यात्रेला नवचैतन्य
डॉ. चोपडेकर म्हणाले, ‘‘कुमार साहित्य संमेलन ही संकल्पना कौतुकास्पद आहे. संस्थेने सर्जनशील साहित्याचे लावलेले सात्विक रोपटे म्हणजे दिव्यत्वाचा साक्षात्कार घडविणारे साहित्यिक अधिष्ठान आहे. कुमार साहित्यकारांनी वाचन, निरीक्षण व आकलन, सखोल अभ्यास, सुलभ भाषाशैली व स्वानुभवाची कलात्मक अभिव्यक्ती ही पंचसूत्रे लक्षात घेतली पाहिजेत. संमेलनातील काव्यवाचन, कथाकथन, ग्रंथप्रदर्शन यासारख्या उपक्रमांतून साहित्य यात्रेला नवचैतन्य देईल.’’
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.