रत्नागिरी : चोराचोरी, पळवापळवी कशाला एकदाच्या निवडणुका घ्या म्हणजे गद्दारांना त्यांची जागा दाखवून देऊ. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी भर सभेमध्ये सांगितले होते की, माझ्या उद्धव आणि आदित्यला सांभाळा; पण तुम्ही काय केले? त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. पक्षाशी गद्दारी केली.
आता तर पक्षच गिळायला निघाला. गद्दार आणि कटकारस्थान करणाऱ्यांना अद्दल घडवण्याची, सूड घेण्याची वेळ आली आहे. सेनेचे गतवैभव, ऐश्वर्य परत मिळत नाही तोवर पेटून उठलेला हा निष्ठावंत शिवसैनिक शांत बसणार नाही, असा इशारा ठाकरे शिवसेनेचे नेते आणि माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिला.
येथील स्वयंवर मंगल कार्यालयात शिवगर्जना अभियानांतर्गत आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्यानिमित्त ठाकरे सेनेने आणि युवासेनेने शक्तिप्रदर्शन केले. सुभाष देसाई म्हणाले, ‘‘निष्ठावंत शिवसैनिकांचा हा मेळावा आहे. सर्वांच्या भावना काय आहेत, हे लक्षात आले आहे. ज्याने काही खोटेपणा केला तो सर्वांना माहिती आहे. याला सर्वांनी मतदानातून उत्तर द्या.
सर्व यंत्रणा भाजपच्या मुठीत आहेत. निवडणूक आयोगाने काय केले, हे सर्वांनी उघड उघड पाहिले आहे. ठाकरे सेनेने २० लाख सदस्य, प्रतिज्ञापत्र करून दिली; परंतु आयोगाने आमदार किती आणि मतदान किती, यावर निकाल दिला. मग आयोगाने आमच्याकडे सदस्यसंख्या आणि प्रतिज्ञापत्र कशाला मागितली. त्याकडे त्यांनी पाहिलेही नाही.
एका आमदाराच्या नावावर नाही तर सर्व आमदारांच्या एबी फॉर्मवर माझ्या सह्या आहेत. ते मतदान मला नाही तर पक्षाला झाले आहे. आता पालिका, महापालिकेच्या निवडणुका घेतल्या तर धुळधाण होईल. म्हणून निवडणुका टाळल्या जात आहेत.
भाजपच्या एकूणच हुकूमशाही राजकारणावर जनता प्रचंड नाराज आहे. केंद्रात सत्ता आहे ना मग गप्प बसा. देशासाठी चांगला कारभार करा; परंतु सर्व पक्ष संपवण्याचा त्यांचा घाट आहे; मात्र भाजपची ही स्वप्ने सर्वपक्ष एकत्र येऊन उद्ध्वस्त करून टाकतील. नितीश कुमार, ममता बॅनर्जी, चेन्नईसह सर्वच पक्षांची एकत्र येण्याची भूमिका आहे.’’
ते म्हणाले, ‘‘कोरोनात ठाकरे सरकारने केलेल्या कामाचे कौतुक झाले. तेव्हा सर्व बंद होते; परंतु जबाबदार सरकारने मार्ग काढला. तेव्हा उद्योगांसाठी ६ लाख कोटींची गुंतवणूक होती. सत्तेच्या लोभापोटी भाजपबरोबर सत्तेत बसले; पण आमचे गेलेले सर्व आमदार अल्पबुद्धीचे. त्यांना माहीत नाही भाजप जोवर तुमची गरज आहे, तोवर तुमचा वापर करेल आणि गरज संपली की बाजूला करेल. गरज संपली की, फेकून द्या, हे भाजपचे धोरण आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुका किती पुढे ढकलाल तरी एकदातरी निवडणूक घ्यावी लागेलच. भाजपने आतापर्यंत ३७ पक्षांना सोडले. आता सेना गिळायला निघाले, हे लक्षात आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी युती तोडली. आता महाविकास आघाडीला राज्यात ७९ टक्क्यांपेक्षा जास्त पसंती आहे. आता आमच्या रागाला तोंड देऊन दाखवा, असे आव्हान शिंदे गट आणि भाजपला दिले.’’
सेनेच्या उपनेत्या उमा कांबळे, वीणा, प्रवीण बोरकर, जिल्हाप्रमुख विलास चाळके, जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, प्रमोद शेरे, महिला आघाडीप्रमुख, युवा पदाधिकारी उपस्थित होते.
...तर उदय सामंतांच्या पळपुटेपणाला जास्त मते
रत्नागिरीतील आमदारकीसाठी आता मतदान घ्या. मंत्री उदय सामंत यांनी शिवसेना सोडली हे तुम्हाला मान्य आहे का? यावर मतदान घ्या; पण आमदार सामंत यांनी पळपुटेपणा केला, अशा मतांनी पेटी भरेल आणि या कृत्याची पेटी रिकामी राहील. मग होऊद्यात निवडणुका म्हणजे दूध का दूध आणि पानी का पानी होऊन प्रत्येकाला मतदार जागा दाखवून देतील, असे देसाई यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.