ratvardha११.txt
फोटो-
१) ratvardha३१.jpg -KOP२३M००९१४ गोळवशीचे नागादेवी मंदिर
२) ratvardha३२.jpg -KOP२३M००९१५ सापड लोकनृत्य सादर करताना माचाळ ग्रामस्थ
३) ratvardha३३.jpg - KOP२३M००९१६ माचळ येथील मंदिरातील मूर्ती
इंट्रो
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिणेकडे व सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या लांजा तालुक्यातील अनेक गावांत वैशिष्ट्यपूर्ण कथा-दंतकथा आपल्याला पाहायला मिळतात. सह्याद्रीतील डोंगररांगेत उगम पावून लांजा तालुक्याला समृद्ध करणाऱ्या नद्या म्हणजे काजळी व मुचकुंदी होय. यातील मुचकुंदी नदीच्या काठावर वसलेल्या अनेक गावात फेरफटका मारताना तिथल्या गावकऱ्यांशी चर्चा केल्यास रंजक, गूढ, अगम्य अशा कथा-दंतकथा आपल्यापुढे उलगडल्या जातात. या दंतकथा आपल्याला चकितही करतात. मानवी श्रद्धेशी घट्ट जोडलेल्या या कथा विचाराला प्रवृत्त करतात. मुचकुंदीच्या काठावर वसलेल्या गावातील ग्रामस्थांच्या धार्मिक, सांस्कृतिक जीवनावर या कथांचा प्रभाव आपल्याला जाणवतो.
- विजय हटकर, लांजा
मुचकुंदीच्या काठावरच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरा
कोकणातील थंड हवेचे रमणीय गिरीस्थान म्हणजे लांजा तालुक्यातील सुंदर माचाळ गाव! समुद्रसपाटीपासून सुमारे ३५०० फूट उंचावर वसलेले ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले गाव! कोकणात आज मातीची कौलारू कोकणी बाजाची घरे दिसत नाहीत; मात्र माचाळला ती पाहायला मिळतात म्हणूनच माचाळ म्हणजे मातीच्या घरांचे गाव! मुचकुंद ऋषी व भगवान श्रीकृष्णाच्या पावनस्पर्शाने पुनित झालेले गाव! लांजाची जीवनवाहिनी मुचकुंदी नदीचे उगमस्थान याच गावात! थंड हवेचे ठिकाण असलेल्या माचाळ गावात गणेशोत्सवाच्या काळात सद्यःस्थितीत कोकणात दुर्मिळ होत चाललेले सापड लोकनृत्य सादर केले जाते. ग्रामदेवतेला प्रसन्न करणारी सापडनृत्य परंपरा गावकऱ्यांनी आजवर जपली आहे; मात्र हे नृत्य वर्षभरात अन्यवेळी सादर केले जात नाही, हे विशेष !
पूर्वी कोकणात ८०च्या दशकापर्यंत नाचणीची शेती केली जात असे. त्याच जागेवर पुढील वर्षी वरी, त्याच्यापुढे बरग व त्यानंतर हरिकाचे पीक घेऊन ती जागा सोडली जायची. हरिकाला गोड तांदूळ म्हटले जात असे. हरिकाच्या शेतीवेळी शेत भांगलण्यासाठी अर्थात शेतातले गवत/तण काढण्यासाठी शेतीची कामं झाली की, अख्ख्या गावातली गडीमाणसं एकत्र येऊन एखाद्या शेतात भांगलण करायचे. शेतात उपड्या मांड्या घालून कमरेत नाचून हातवारे करत गाणी म्हणत ढोलताशाच्या गजरात व अन्य वाद्यांच्या ठेक्यावर शेतातले गवत काढत. चारी बाजूने भांगलण करत कमी रिंगणात गर्दी होऊ लागली की, एकेकाला रेटून हाताच्या कोपराने ढुशी देत गवत बाहेर काढायचे. अगदीच जवळ आले की, मध्यभागी छोटा खड्डा करून नारळ ठेवत व समोरासमोर एकमेकाला मुसुंडी मारत, चकवा देत ताकदीने नारळ बाहेर काढण्याचा खेळ करीत. तो खेळ बघण्यासाठी सारा गाव त्या शेताजवळ जमत असे. एका अर्थाने, तिथे जत्रेचे स्वरूप यायचे. पारंपरिक वाद्याच्या तालावर शेतातले तण काढायच्या या कलेला सापड लोककला म्हणत असत. आता हरिक शेती संपली आता सापडही लुप्त झाला. माचाळ गावात मात्र हरकाच्या शेतात नाही तर गणपतीच्या दिवसातून ही लोककला पाहायला मिळते.
रोजगाराच्या शोधात महानगरात गेलेली माचाळ गावातील तरुण मंडळी गणेशोत्सव, शिमग्याच्या सणाला गावात हमखास येतात. याचे कारण परंपरा जोपासणारी वैशिष्ट्यपूर्ण सापड नृत्यकला. खरेतर, उंचच उंच गिरीशिखरांवरच्या एकाकी वाड्या-वस्त्यांवरच्या मंदिरांची एक संस्कृती असते. त्यांचे काही नीतिनियम असतात. माचाळ गावात आपल्याला ते पाहायला मिळतात. गावात ब्राह्मणदेव, वडलोबा, विठ्ठलाई, भैरी, वाघजाई, जुगाई, उदगिरीदेवी आणि मालक देव असे ८ देवांचे एकत्रित मंदिर असून, गावच्या दगडीचौकात एका चौथऱ्यावर त्यांची प्रतिष्ठापना केलेली आहे. गणेशोत्सवात गावातील गावकर पांडुरंग धोंडू पाटील यांच्या मोठ्याशा मध्यवर्ती घरातील ओट्यावर सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन तीन दिवसांचा उत्सव भक्तिभावाने साजरा करतात. या उत्सवासाठी स्थानिक गावकरी पाटील यांच्या घरातील ओटीमागील मोठ्या भिंतीवर रंगीत खडूंनी सुबक पौराणिक चित्रे काढतात. आजच्या डिजिटल जमान्यातील डिजिटल बॅनरही फिका पडेल इतकी ही चित्रे उठावदार असतात. या भिंतीला लागून गावातील आठ देवतांची रूपे (चांदीचे मुखवटे) लावली जातात आणि मग सुरू होते वैशिष्ट्यपूर्ण जाखडी लोकनृत्य.
या कार्यक्रमाची सुरवात ‘सापड’ नृत्याने होते. या वैशिष्ट्यपूर्ण लोकनृत्यात सहभागी होऊन वर्षभराच्या कामासाठी बळ मिळवण्यासाठीच महानगरात गेलेल्या तरुणांची पावले माचाळला वळतात. या कलेच्या सादरीकरणामुळे ग्रामदेवता प्रसन्न होऊन गावकऱ्यांना आशीर्वाद देते, अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. अन्यवेळी सापडनृत्य साजरे केल्यास देवाचा कोप होईल, अशी भोळी समजूत ग्रामस्थांची आजवर होती; मात्र नुकत्याच माचाळ गावात पार पडलेल्या सापड लोककला महोत्सवात ही कला गावातील मांडावर गावकऱ्यांनी सादर केली. ज्ञानविज्ञानात्मक जाणिवा विकसित झालेल्या नव्या तरुणाईने देवाचा कोप तिच्याच लेकरांवर होत नसतो, याचा विश्वास गावकऱ्यांना देत वर्षातून एकदाच सादर केल्या जाणाऱ्या सापड नृत्यामागील आख्यायिकेला छेद दिला आहे. चैन, सुख व सोयीस्कर पर्यटनाबरोबर आज शाश्वत अर्थात् इको टुरिझमला जागतिक पर्यटनात महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. या दृष्टिने कोकणातील लांजा तालुक्यात येणाऱ्या पर्यटकाला थंड हवेचे ठिकाण म्हणून माचाळ दाखवताना माचाळची सापड लोककला दाखवायला हवी.
जगातील सर्व मानवी संस्कृतीचा विकास व उदय नदीच्याच काठावर झाला आहे. आदिम काळापासून माणूस नदीलाच माय मानून तिचे पूजन करत आला आहे. तिच्या काठावरच्या त्याने आपली वसतिस्थाने अर्थात् गावे निर्माण केली. आज नद्यांचे सर्वत्र झालेले प्रदूषण लक्षात घेऊन ''चला जाणूया नदीला'' ही महत्वाकांक्षी योजना सरकार राबवत आहे. यात मुचकुंदी नदीचाही समावेश आहे.
माचाळात उगम पावून गावखडीजवळ सागराला मिळेपर्यंत मुचकुंदीनेही खोरनिनको, प्रभानवल्ली, भांबेड, वेरवली, वाघणगाव, विलवडे, वाकेड, बोरथडे, इंदवटी, गोळवशी, साटवली, इसवली, बेनी, भडे अशी अनेक गावे समृद्ध केली आहेत.
या नदीच्याही संदर्भात विविध गावात कथा, भयकथा, गुढकथा आहेत. तशाच तिच्या काठावर वाढलेल्या माणसाच्या धार्मिक, सांस्कृतिक जीवनातून कथा दंतकथा आपल्यापुढे उभ्या राहतात. या दंतकथा, आख्यायिका वा परंपरांचा सांभाळ जपणूक इथल्या ग्रामीण समुदायाने आजवर भक्तिभावाने केला आहे.
वाघणगावची गावपळण
सन २००५ मध्ये जरी या गावात ही परंपरा बंद पडली असली तरी दर तीन वर्षांनी होत असलेल्या गावपळणीमुळे महाराष्ट्रभर प्रसिद्ध पावलेले वाघणगांव हे वाटुळ-साखरपा-कोल्हापूर राज्य महामार्गावरील मुचकुंदी काठी वसलेले एक छोटेसे गाव. या गावात काही वर्षांपूर्वीपर्यंत सुरू असलेल्या गावपळण या वैशिष्ट्यपूर्ण परंपरेमागे दंतकथा आहेच.
राजापूर बंदर ते विशाळगड अशी सावकारी टपालची वाहतूक करणारे रेडीज नामक एक वैश्य विशाळगडातून घोड्यावरून राजापूर बंदराकडे येत होते. सध्या जिथे वाघणगांव वसले आहे या ठिकाणी ते आले असता या मार्गावरील लुटारूंनी त्यांचा खून करून त्यांचे कलेवर घोड्यावर टांगले. पतीशोधार्थ या गृहस्थाची पत्नी या वाघणगांवच्या हद्दीत आली असता तिला आपल्या पतीचे कलेवर घोड्यावर बांधलेल्या स्थितीत पाहावयास मिळाले. या धक्क्यामुळे तिने आजूबाजूला आक्रोश करून हाक मारली असता काही नागवंशीय तिच्या हाकेसरशी धावून आले. पतीचे अंत्यविधी त्या स्त्रीने स्वतःच करण्याचे ठरवले असता पाण्यासाठी तिने स्वतःच्या गुडघ्याने जमीन उरकली. त्या सात्विक स्त्रीच्या सत्त्वामुळेच त्या जागेवर जल निर्माण झाले व चिता पेटवून सहगमन करण्यापूर्वी तिने नागवंशीयांन गाववस्ता करून या गावाचे सर्वाधिकार दिले; पण जाताना या गावात मनुष्यवर वस्ती टिकत नसल्या कारणास्तव दर तीन वर्षांनी गावाची चतु:सीमा ओलांडून राहण्यास सांगितले. यालाच वाघणगावची गावपळण संबोधतात. सन २००५ पर्यंत ही ऐतिहासिक प्रथा निरंतर चालू होती; परंतु सन २००५ पासून अंनिस व विविध प्रसारमाध्यमांनी केलेल्या विचारपरिवर्तनामुळे ग्रामस्थांनी ऐतिहासिक गावपळण प्रथा बंद केली असली तरी या दंतकथेचे अस्तित्व सती मंदिर व सात्विक स्त्रीने खोदलेल्या तळीच्या रूपाने पाहावयास मिळते. आजही अनेक तज्ञमंडळी गावपळणीचा संबंध आध्यात्मिक व निसर्गविज्ञानाच्या पातळीवरचा असल्याचे मानतात. शिवाय या प्रथेसाठी कोणताही पशुबळी दिला जात नाही किंवा कुणाचेही शोषण केले जात नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.