- संदेश देसाई
दोडामार्ग : बांदा-दोडामार्ग-आयी हा राज्यमार्ग खचलेल्या बाजूपट्टीमुळे धोकादायक बनला आहे. मोठ्या प्रमाणात वाहतूक असलेल्या या मार्गालगत गॅस पाईपलाईनसाठीच्या खोदकामामुळे पावसाच्या पहिल्याच टप्प्यात बाजूपट्टी अनेक ठिकाणी खचल्याने वाहने रुतण्याची मालिकाच सुरू आहे.
पावसाळ्यापूर्वी मजबुतीकरण करणे गरजेचे होते; मात्र रामभरोसे असलेल्या बांधकाम विभागामुळे लोकांचे जीव टांगणीला लागत आहेत. दोडामार्ग-बांदा जोडणारा महत्त्वाच्या राज्य मार्गावरील खोदकाम थांबता थांबत नाही.
गेली काही वर्षे नवनवीन प्रकल्प राबविण्याच्या अनुषंगाने हे खोदकाम केले जात आहे. काही वर्षापूर्वी जीवन प्राधिकरण तर आता एमनजीएल गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी खोदाई करण्यात आली आहे.
जीवन प्राधिकरणचे काम अद्यापही अपूर्ण आहे. दीर्घकाळ सुरू असलेल्या या खोदाईमुळे नागरिक व वाहनचालक हैराण झाले आहेत. कधी एकदा हे प्रकल्प पूर्ण होतात आणि मार्ग निर्धोक बनेल, याची प्रतीक्षा वाहनचालकांना आहे.
या मार्गावर २०२१ पासून एमनजीएल गॅस पाईपलाईन टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली. गेली अडीच वर्षे हे काम धीम्या गतीने सुरू आहे. याचा त्रास नागरिक व वाहन चालक नाहक सोसत आहेत.
ज्या ठिकाणी खोदाई करून पाईपलाईन घालण्यात आली, तेथील बाजूपट्टीचे मजबुतीकरण झाले नाही. बांदा, दोडामार्ग ते आयी, अशी ही पाईपलाईन आहे. यावर्षी या कामाला जोर देऊन बहुतांश काम उरकून घेतले गेले तरीही काही ठिकाणचे काम अजून शिल्लक आहे.
उरकून घेतलेल्या कामात रस्त्याचेही काही ठिकाणी नुकसान झाले आहे. काही ठिकाणच्या मोऱ्या देखील बुजल्या आहेत. तर काही ठिकाणी भगदाड पडली आहेत. साधी माती ओढून राज्यमार्गावरील बाजूपट्टीवरील चर बुजविले गेले.
पहिल्याच पावसात ही माती भिजून चिखल झाला. काही भागात माती वाहून गेल्याने चर उघडे पडले. या राज्यामार्गने दिवसाला हजारोंच्या संख्येने वाहने धावत असतात. याचा देखील त्यांनी विचार केला नाही. काम उरकून घेण्याच्या नादात बाजूपट्टीचे मजबुतीकरण सोडून दिले.
खचलेल्या चरात अनेक वाहने फसत आहेत. कळणे येथे एसटीबससहित अन्य खासगी वाहने यात रुतल्याच्या घटना ताज्या आहेत. आयी, सासोली, मणेरी येथेही तीच परिस्थिती आहे. त्यामुळे रात्रीच प्रवास करीत असताना वाहन जरा जरी रस्त्याबाहेर गेले तर दुर्घटना घडू शकते.
पहिल्या पावसात बाजूपट्टीची झालेली अवस्था पाहून बांधकाम विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढले जात आहे. हा राज्य मार्ग वाहतुकीस अत्यंत महत्वाचा असल्याचे लक्षात घेऊन बांधकाम विभागाने त्या पद्धतीने काम करणे गरजेचे होते.
एमएनजीएलची पाईपलाईन टाकताना खोदाई करून ती पुनश्च भरताना कामाचा दर्जा राखला जाणे आवश्यक होते. चर भरताना जांभा किंवा काळ्या दगड भरून त्यावर रोलिंग करावयाचे होते; मात्र तसे झाले नाही. आता जबाबदारी झटकत आहेत.
तीन कोटी चार लाख वर्ग
संबंधित कंपनीने खोदकामाला २०२१ मध्ये सुरुवात केली. काम सुरू करण्याआधी कंपनीकडून तीन कोटी चार लाख एवढा निधी बांधकाम विभागाकडे वर्ग केला होता. ही रक्कम बाजूपट्टीच्या दुरुस्तीसाठी देण्यात आली होती. मात्र, ती रक्कम अद्याप अखर्चित आहे.
या राज्य मार्गाच्या बाजूने घालण्यात आलेल्या गॅस पाईपलाईनमुळे बाजूपट्टी कमकुवत झाली आहे. त्यामुळे बाजूपट्टी दुरुस्तीसाठी १ कोटी ७९ लाख एवढा निधी मंजूर आहे. त्यातून रस्त्याच्या बाजूपट्टीचे डांबरीकरण काही ठिकाणी खडीकरण व काही ठिकाणी सोलिंग करण्यात येणार आहे. हे काम पावसाळा संपल्यावरच चालू होणार आहे.
- विजय चव्हाण, शाखा अभियंता
बांदा-दोडामार्ग-आयी रस्त्याच्या एका बाजूने पाण्याच्या पाईपलाईनसाठी व दुसऱ्या बाजूने गॅस पाईपसाठी खोदण्यात आलेले आहे. त्यामुळे रस्त्याची बाजूपट्टी कमकुवत बनली आहे. काही ठिकाणी रस्ता खचण्याची दाट शक्यता आहे.
पावसामुळे बाजूपट्टी खचत चालली आहे. अशा रस्त्यावरून प्रवास करीत असताना सावधानता बाळगा. डांबरीकरण सोडून रस्त्याच्या खाली अजिबात वाहने उतरू नको. वाहने वेगात असल्यास अपघात होऊ शकतो.
- दया नाईक, शिक्षक
जेव्हा रस्त्यांची दुर्दशा झाली होती, तेव्हा जनतेने वेळोवेळी आवाज उठवून रस्ते सुरळीत करून घेतले; मात्र रस्तादुतर्फा बाजूपट्टीवर झालेल्या खोदाईमुळे पुन्हा धोका निर्माण झाला आहे. खोदाई करताना ठेकेदारांनी मर्जीने काम केले असून रस्त्याच्या बाजूपट्टी नेस्तनाबूत केली आहे.
याकडे बांधकामचे लक्ष हवे होते. जनतेला त्रासात घालणाऱ्या असल्या ठेकेदारांवर कारवाई होणे गरजेचे आहे. त्यांनी त्वरित उद्ध्वस्त झालेली बाजूपट्टी सुस्थितीत करून द्यावी; अन्यथा ‘बांधकाम’ने जन आक्रोशाला सामोरे जावे.
- एकनाथ नाडकर्णी, जिल्हाध्यक्ष, भाजप
तात्पुरती मलमपट्टी
राज्यमार्गाची बाजूपट्टी खचण्याआधी पावसाळ्यात पूर्वी मजबूत का केली नाही? अपघातांचे प्रकार होईपर्यंत ठेकेदार आणि आपण अधिकारी झोपा काढत होता का? राज्यमार्गावरील खचलेली बाजूपट्टी तत्काळ सुरळीत करा. याबाबत कोणताही सबब चालणार नाही.
या कामात कसूर झाल्यास आणि , नागरिकांचे तक्रार आल्यास ठेकेदारावर गुन्हा दाखल करून आपल्यालाही घरी पाठवू अशी तंबी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सावंतवाडी प्रभारी कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगौड यांनी शाखा अभियंतांना दिली होती. त्यामुळे सध्या तात्पुरती उपाययोजना बांधकाम विभागाकडून राबविली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.