कोकण

दशावतारातील वैविध्यपूर्ण पद्यावली

CD

प्रवास दशावताराचा

swt613.jpg
3M14290
प्रा. वैभव खानोलकर
swt614.jpg
M14291
दशावतार पद्यावली सादर करताना वादक.

दशावतारातील वैविध्यपूर्ण पद्यावली

लीड
दशावतार कोकणच्या मातीतून उगवलेला समृद्ध लोककला प्रकार. दशावतारात अभिनयापासून ते सादरीकरणापर्यंत प्रत्येक बाबतीत वैविध्यता आढळते आणि याच वैविध्यामुळे दशावतार लोककला नेहमी एका उंचीवर गेल्याचे दिसते. दशावताराच्या अभिनय कौशल्यासोबतच विशेष लोकआवड असते ती दशावतारातून सादर होणारी गाणी. दशावतार लोककला प्रकार हा सफेद चार या स्वरातच सादर केला जातो आणि या विविध पद्यावलीचे सफेद चार स्वरात वादकांरवी होणारे सादरीकरण लोककलेत रंग भरते.
- प्रा. वैभव खानोलकर
.................
रंगमंचावर असणाऱ्या हार्मोनियमच्या पांढरी चार स्वराला पखवाज किंवा तबला लागला आहे की नाही, त्याप्रमाणे वाद्याची वादकाकरवी चाचपणी करण्यासाठी दशावतार नाटकाच्या सुरुवातीला एक धून (म्युझिक) वाजवली जाते. यामुळे वाद्याची चाचपणी तर होतेच, त्याचबरोबर वातावरण निर्मितीसाठी हे संगीत महत्त्वपूर्ण ठरते. यानंतर गणेशस्तवन होते.
हार्मोनियम वादक आपल्या कौशल्याने वेगवेगळ्या रागांत महागणपतीची आळवणी करणाऱ्या पद्यावलीला ''स्तवन'' म्हणतात. हे स्तवन वेगवेगळ्या रागांत, वेगवेगळ्या तालांत वाजविले जाते. यात प्रामुख्याने त्रिताल, एकताल, दुर्गा राग वापरला जातो.
धयकाल्यातील गणपती वगळता बहुतांश नाट्यप्रयोगांतील गणपती हा बोलका असतो. एक कलाकार गणपतीचे मुखवटे धारण करून रंगमंचावर प्रवेश करतो आणि मग जणू काही आपण साक्षात गणेशाची बोलत आहोत, या श्रध्देने आणि भक्तिभावाने रंगमंचावर वादक गणेशाशी पद्यावलीतून संवाद साधताना,
विघ्ने बहु येती नाटके
ऐशा खेळा रंग भरूदे !
वर द्यावा मज प्रति
नाटके विघ्ने बहु येती !!
अशी आळवणी करतो. यावर गणपती साकारणारा कलावंत गद्य स्वरुपात आशीर्वाद देत म्हणतो, "हे वत्सा सूत्रधारा, तुझ्या नाटकात येणारी विघ्ने मी माझ्या पाश आणि अंकुशाच्या योगेकरून समूळ नाश करीन, असा मंगल आशीर्वाद. अन्य काय इच्छा?" यानंतर वादक पद्यावलीतून परत
अज्ञ ही बाळे वदती कैसी
चिंता मज भारी !
यास्तव वर दे गणपती
आम्हा विघ्ने निवारुनी !!
अशी आळवणी करतो. यावर गणपती म्हणतो, "हे वत्सा सूत्रधारा, तुझ्या नाटकात काम करणारी अज्ञानमती बालके सुज्ञ होऊन देव गुरु बृहस्पतीप्रमाणे बोलू लागतील. गण-गंधर्वांप्रमाणे नृत्य आणि गायन करू लागतील, असा मंगल आशीर्वाद देतो." यानंतर गणपतीची पारंपरिक आरती होते आणि गणेश माघारी जाताना परंपरेनुसार
शिवसुता भजावे दिन रजनी !
पदकमली दास असे मी भावे
दिन रजनी भजावे दिन रजनी !!
हीच पद्यावलीत आळवली जाते. दशावतारात परंपरा महत्त्वाच्या असतात आणि त्या आहे तशाच संभाळून तशाच स्वीकारल्या जातात. मुख्य कथानकाला सुरुवात होताना ठुमरी म्हटली जाते.
ठुमरी हा मुळात शास्त्रीय गायनातील प्रकार; पण दशावतारात याचा सुरेख संगम साधल्या गेल्याचे दिसते. शक्यतो ठुमरीत हिंदीतील श्रीकृष्णावरील गीतांचा वापर केला जातो.
खेलत नंदकुमार कुमारा
मुशकरत बलजोरी कन्हैया !
माता यशोदा घरत बुलावे
नही मनातहा बात कन्हैया !!
पण हिंदीच ठुमरी असली पाहिजे, असा कोणताही नियम नाही; मात्र कथानकाला अनुसरून ठुमरी गीत वाजवण्याचा कल बहुतेक हार्मोनियम वादक करताना दिसतात. नंतर ''धमार'' हा ताल वाजवला जातो; मात्र हे वादन करताना नेमके कोणते पात्र रंगमंचावर येणार, यानुसार हे ताल वाजवले जातात. यातही दशावताराच्या मूळ परंपरेला धक्का लागता नये, याची खबरदारी आजही वादक आणि कलावंतांकरवी घेतली जाते.
जेव्हा दोन योद्धे आमनेसामने येतात आणि त्यांच्यामध्ये संघर्ष होतो, त्यावेळी युद्धापूर्वी योध्दे पद्यावली सादर करतात,
याला दशावतारात ''झंपा'' असे म्हणतात.
त्यजुनी नगरी दडसी जरी तू !
सप्तपाताळी दडला जरी तू !
ओढून रगडीन भुवरी !
तुझा मी घात करीन !!
तुझा मी संहार करीन
ओढून रगडीन भुवरी !!
अशा प्रकारची पद्यावली सादर करताना दशावतार रंगकर्मी आक्रमक हावभाव करताना दिसतात. मग वादकाकरवी लंगार गीत सादर होते. त्यावर हे आमनेसामने आलेले दोन योध्दे पदन्यास करतात. काही वेळा दशावतार लोककलेत कीर्तनातून सादर केली जाणारी ''साकी'' सादर केली जाते.
''हरिश्चंद्र तारामती'' या नाट्यप्रयोगात
सुजन जनानो या दीनावरी
कुणीतरी दया करा !
एक भार मज सुवर्ण देऊनी
पुनित करा पामरा !!
हरिश्चंद्रः या विप्राच्याकडे तुला मी, आज गडे दिधले.
तारामतीः येते आता लोभ असावा.
दासी तुमची या चरणाची सेवे अंतरली
येते आता लोभ असावा, पूर्वीपरी तुमचा !!
अशा प्रकारे पद्यावलीतून संवाद साधला जातो. साकी हे धावते वृत्त आहे. कथनासाठी किंवा एखादा प्रसंग थोडक्यात सांगण्यासाठी उत्तम पर्याय म्हणून लोककलेत साकीचा प्रसंगानुरूप वापर केला जातो. राजा हरिश्चंद्र-तारामती, संगीत सौभद्र, संगीत मत्स्यगंधा आदी नाटकांत मोठ्या प्रमाणात साकी म्हटली जाते.
दशावतार लोककलेत जितके अभिनय, संवाद, नृत्य याला महत्त्व असते, तितकेच संगीतासह या पद्यावलीला असते.
आपल्या बावन्नकशी अभिनयाने रसिकमनाचा वेध घेताना एक प्रभावी आयुध म्हणून दशावतारी कलावंतांच्या सोबतीला पद्यावलीही तितकीच महत्त्वाची मानली जाते. या पद्यावलीची लज्जत सफेद चारमध्ये चाखायची असेल, तर दशावतार नाट्य बघा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT