१८ (टूडे ३ साठी)
१४ जुलै टुडे ४
सागरमंथन
- rat२७p१०.jpg ः
२३M१९२३१
डॉ. स्वप्नजा मोहिते
समुद्रातील माशांची उत्क्रांती
समुद्रकिनाऱ्यावरील लगून्स आणि खाड्यांसारख्या भागात पृष्ठवंशीयांची उत्क्रांती होत गेली, हे आपण वाचलंच. म्हणूनच आजही ते तितकेच महत्वाचे आहेत. सुरवातीस तप्त अशा वायू आणि धूळ यांच्यापासून बनलेली आपली पृथ्वी सुमारे ४.५ अब्ज वर्षांपूर्वी थंड होऊ लागली. धूमकेतू आणि लघुग्रहांच्या आघातांमुळे आणि थंड होत गेल्याने पृथ्वीवर द्रव म्हणजे पाणी अस्तित्वात आले आणि महासागर आकार घेऊ लागले. यानंतर सुमारे एक अब्ज वर्षांनंतर पहिले जीव जन्माला आले आणि वातावरण ऑक्सिजनने भरून गेले. पुढील काही अब्ज वर्षांमध्ये एकपेशीय जीव एकत्र येऊन बहुपेशीय जीव बनले. शरीर योजनांमधील वैविध्यपूर्ण बदल घडत गेले आणि यातून असंख्य अपृष्ठवंशीय जीव विकसित झाले. तरीही हे सर्व जैववैविध्य आणि जीवन समुद्रापुरते मर्यादित होते.
-----
समुद्रापलीकडे विपुल जमीन वापराविना पडून होती; पण सुमारे ५३० दशलक्ष वर्षांपूर्वी सेंटिपिड सदृश प्राण्यांनी पाण्याच्या वरच्या जगाचा शोध सुरू केला. सुमारे ४३० दशलक्ष वर्षांपूर्वी वनस्पतींनी जमिनीवर वसाहत केली आणि अन्न आणि संसाधनांनी समृद्ध जमीन तयार केली तर मासे समुद्रातील अपृष्ठवंशीय पूर्वजांपासून विकसित झाले. ते प्रागैतिहासिक मासे ३० दशलक्ष वर्षांपूर्वी पाण्यातून बाहेर आले आणि त्यांनी जमिनीवर राहण्यासाठी स्वतःला विकसित केले. अपृष्ठवंशीय पूर्वजांपासून विकसित झालेले हे मासे agnatha म्हणजे जबडे नसलेले होते; पण सुरवातीच्या जबडाविरहित माशांमध्ये ही वेगवेगळे गट उदयास येत गेले. यांमध्ये अनेक शरीरावर चिलखतासारखे कवच असलेल्या माशांचे गट सिलुरियन कालखंडात (सुमारे ४२० दशलक्ष वर्षांपूर्वी) दिसू लागले. या माशांच्या शरीरावर कडक कवचासारख्या प्लेट्स होत्या. हे मासे उत्तरगोलार्ध खंडांच्या उथळ अंतर्देशीय समुद्रांमध्ये राहत होते. जबडाविरहित माशांचा सर्वात जुना जीवाश्म ऑस्ट्रेलियात आढळून आला आहे. यामध्ये टॉर्पेडो-आकाराच्या अॅरंडाप्सिस या सुमारे ४७० दशलक्ष वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियातील उथळ लॅरापिंटाइन समुद्रमार्गात वास्तव्य करणाऱ्या माशाचा उल्लेख करावा लागेल. जबडे असलेले म्हणजे gnathostom माशांचा उदय सुमारे ४४० दशलक्ष वर्षांपूर्वी चीनच्या समुद्रामध्ये झाला. डेव्होनियन कालखंडाच्या सुरवातीस (४१९ दशलक्ष वर्षांपूर्वी) जबडे असलेले माशांचे सर्व प्रमुख गट दिसू लागले आणि हे मासे जगाच्या सर्व भागात पसरले. इतर मासे पूर्व गोंडवाना प्रांत (ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका) आणि युरेमेरिका (उत्तर अमेरिका आणि युरोपचा बराचसा भाग एकत्रित करणारा भूभाग) या महाखंडात विकसित झाले. जबडा नसलेल्या माशांपासून ते जबडा असलेले मासे असा मत्स्यवर्गीय जीवांचा विकास होत असताना मध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मासे विकसित झाले आणि सर्वायव्हल ऑफ फिटेस्ट या नियमानुसार काही जगले. काही नामशेष झाले. यात डेव्होनियन कालखंडात उदयास आलेले लंगफिश यांचा उल्लेख करावा लागेल. अन्ननलिकेशी जोडलेल्या एक किंवा दोन हवेच्या पिशव्या (एअरब्लॅडर) असलेले हे मासे काहीसे चपट्या शरीराचे आणि फ्लिपरसारखे किंवा निमुळते पर असलेले होते. स्वम्प्स किंवा चिखलमय पाण्यात, दलदलीच्या प्रदेशात, खाड्यांजवळ हे मासे राहू शकत असत. यासाठी त्यांच्या हवेच्या पिशव्या फुफ्फुसासारखे काम करत. दक्षिण अमेरिका, आफ्रिका येथे आढळणारे हे मासे मृदुकाय प्राणी कवचधारी प्राणी आणि कीटक खात असत. उन्हाळ्यामध्ये हे मासे स्वतःला चिखलात पुरून घेऊन २-३ महिने निद्रिस्त राहत असत. यांपासूनच फ्लेशी फिन्ड म्हणजे मांसलपर असलेले मासे विकसित झाले. यात लॅटिमेरिया चालुम्ने म्हणजेच कोलाकॅन्थ्स या माशाचा उल्लेख करावा लागेल. हे मासे जिवंत जीवाश्म म्हणून ओळखले जातात. दक्षिण आफ्रिकेतील कोमोरोस बेटावर १९३८ मध्ये हा मासा सापडला आणि तेव्हा जगाला या माशांच्या उत्क्रांतीच्या टप्प्यातील एका महत्वाच्या दुव्याची ओळख झाली. आजवर दक्षिण आफ्रिका, मोझांबिक आणि मादागास्करमधून कोलाकॅन्थ्स पकडले गेले आहेत. या माशांच्या प्रत्येक पराखाली मांसल भाग असतो. डीप मेटॅलिक ब्लू रंगाच्या या माशांच्या अंगावर पांढरे ठिपके असतात. हे मासे खडकाळ भागांमध्ये ४९० फूट ते २ हजार ३०० फूट खोलीवर राहतात. हे जरायूज मासे आहेत आणि पिल्लांना जन्म देतात. मादीच्या पोटात एकावेळी २० ते ६५ (३.५ इंच व्यासापर्यंत) अंडी असू शकतात. वाढणाऱ्या पिल्लांना अंड्यातील पिवळा बलक तसेच नाळेसारख्या अवयवातून पोषक द्रव्ये मिळतात. १३ महिन्यांच्या गर्भधारणेनंतर साधारणपणे ५-२६ पिल्ले जन्माला येतात. यानंतर रे फिन्ड म्हणजे आजच्या पर असलेल्या माशांचे पूर्वज उत्क्रांत झाले. यांमध्ये अनेक छोटे छोटे पृष्ठपर म्हणजे फिन्लेट्स असलेले बिचिर किंवा रीडफिश विकसित झालेले दिसतात. याही माशांमध्ये हवेच्या पिशव्या म्हणजे एअरब्लॅडर होतेच. या शिवाय या माशांमध्ये ग्युएनाईनने बनलेले खवले ही होते. उंच गवत वाढलेल्या किनारी प्रदेशात राहणे ते पसंत करत. याचबरोबर तोंडाकडचा भाग चपट असलेले आणि अंगावर कडक अशा खवल्यांच्या रांगा असलेले स्टर्जन मासे ही याच काळात उदयास आले. आजही हे मासे उपोष्णकटिबंधीय, समशीतोष्ण आणि उपआर्क्टिक नद्या, तलाव आणि युरेशिया आणि उत्तर अमेरिकेची किनारपट्टी येथे आढळतात. बेलुगा नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्टर्जन माशाची खारवलेली अंडी कॅव्हिअर म्हणून आजही अतिशय लोकप्रिय आहेत.
(लेखिका मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी येथे मत्स्यजीव शास्त्र विभागात प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.