-राजा बर्वे, परशुराम, चिपळूण
कोकणी (Konkan) माणसाकडे एक विचित्र अलिप्तता आहे. थोडा अति वाटावा असा आत्मविश्वास आहे. तो त्याच्या मर्यादित परिघात जगत राहतो तरीही साऱ्या जगाबद्दलची, जगात घडणाऱ्या कोणत्याही घटनेवर आपले मत मांडत राहतो. कदाचित यामुळे त्याच्या मोठ्या होण्याचा प्रवास खडतर बनतो; परंतु यातून जशी त्यांच्यात बुद्धिमत्ता जाणवते तशी विनोदनिर्मितीही होते.
कधी आपण त्यांच्या सान्निध्यात भारावून जातो तर कधी अंतर्मुख होतो. कोकणातल्या या लाल मातीतल्या खाणीत सुप्तावस्थेत राहून गेलेली सामान्यातही असामान्यत्व असलेली माणसे आजही आपल्याला भेटत राहतात. अशा संपर्कात आलेल्या कोकणी अर्कांचा आणि अर्थातच काही अर्कटांना भेटूया दर आठवड्याला.
माझा जन्म आणि शिक्षणदेखील रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात झाले. पुढे १९८१ पासून मार्च २०२० पर्यंत बँकेत विविध पदांवर नोकरी करत असताना या साऱ्या प्रवासात अनेक माणसे ग्राहकांच्या स्वरूपात सतत संपर्कात येत राहिली. माझी नोकरी ही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाल्यामुळे अनेक अस्सल कोकणी नमुने मला या साऱ्या प्रवासात भेटत राहिले. त्यातील अनेक प्रथम ग्राहक नंतर मित्र आणि जिवलगदेखील झाले. काही धुमकेतूसारखे काही काळ संपर्कात राहिले. या साऱ्या अस्सल कोकणी लोकांचे गुणावगुण जवळून अनुभवता आले. हे सारं नकळत अनुभवाच्या गाठोड्यात साठत गेलं.
कधी फुरसतीच्या क्षणांत यातील अनेक पात्रे, त्यांचे स्वभावविशेष, दिलदारी, बेफिकिरी, सहनशीलता, राग, लोभ, प्रेम, माया आणि एकंदर त्यांची व्यक्तिचित्रे डोळ्यांसमोर तरळून जात राहतात. यातील अनेक व्यक्तिमत्त्वे कलंदर आहेत काही बिलंदर आहेत, सोशिक आहेत, खवचट आहेत, खवय्ये आहेत, अनेकवेळा मनात येत राहिलं की, या साऱ्यांना लेखणीतून शब्दबद्ध करावं आणि कुठेतरी आयुष्याच्या प्रवासातील या साऱ्या सहप्रवाशांचे डॉक्युमेन्टेशन करावं. कोकणातल्या लाल मातीत जन्म घेऊन जगण्याची विलक्षण धडपड करणाऱ्या या साऱ्या सुहृदांची अर्कचित्रे रेखाटावीत.
योगायोगाने ही सारी अस्सल कोकणी पात्रे शब्दबद्ध करण्याची साद आल्यावर अशी अनेक पात्रे चक्क हातात हात घालून माझ्या डोळ्यांसमोर फेर धरू लागली. आगामी वर्षात प्रत्येक आठवड्याच्या गुरुवारी लाल मातीतील अस्सल कोकणी पाती भेटत राहतील. कोकणात जन्म घेऊन विविध क्षेत्रांत दिगंत यश आणि कीर्ती मिळालेल्या लोकांची यादी करायला गेलं तर ती भली मोठी होईल. शतकापूर्वीच्या कोकणातील विपरित परिस्थितीशी झगडत या विभूती आपल्या बुद्धिमत्ता, द्रष्टेपणा, संघटनकौशल्य आणि देशप्रेम या जोरावर अनेक क्षेत्रे गाजवून गेल्या आहेत. एकट्या कोकणानेच देशाला चार महामहोपाध्याय दिले आहेत.
रँगलर परांजपे, महर्षी कर्वे, साने गुरुजी, पां. वा. काणे अशी ही यादी. रँगलर परांजपे यांच्या मुर्डी आणि पंचक्रोशीत आजही अनेक बुद्धिमान लोक आहेत. आजच्या काळातही कोकणात अशी अनेक मंडळी आजही आपल्याला भेटत राहतात. त्यांना अनुभवणे हा एक अतीव आनंदाचा गाभा आहे. हरहुन्नरी आणि बुद्धिमान माणसे डोळसपणे पाहिली तर दिसतात. अशा अनेक मंडळींना भेटताना, वाचताना आपल्यालादेखील भेटलेली अशी अनेक माणसे आपल्यासमोर येतील.
(लेखक कोकणवर मनस्वी प्रेम करणारा व कोकण टिपणारा आहे.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.