स्वातंत्र्योत्तर कालखंडातील गेल्या आठ दशकात मागासलेपणाचे बिरुद लागलेला मंडणगड तालुका शेती, पर्यटन व सेवा उद्योगांचे विकास आधारे पर्यावरण स्नेही विकासाकडे आश्वासक गतीने वाटचाल करीत आहे. शेती आधारीत आर्थिक क्रियांचा भार हळूहळू सेवा व अन्य आर्थिक क्रियांकडे वळू लागला आहे.
शासन, प्रशासन यांच्याकडून रोजगार निर्मितीचे कृतिशील प्रयत्न झाले नाहीत. मात्र तालुकावासीयांनी आता लाल मातीतच स्वयंरोजगाराची वाट निवडली आहे. कर्म सिद्धांत डोळ्यासमोर ठेवून शेती, प्रक्रिया, शेतीपुरक उद्योग, पर्यटन व सेवा उद्योगात येथील उद्योजक आपले पाय रोवू पहात आहेत.
यामध्ये दुग्ध व्यवसाय, चिरेखाण, आंबा, काजू, नारळ, सुपारी, मासळी, बांधकाम, फळ प्रक्रिया उद्योग, भाजीपाला, कृषी पर्यटन, कुक्कुटपालन, दुबार शेती, ट्रान्सपोर्ट ही क्षेत्र फायदेशीर ठरत आहेत.
त्याला सार्वत्रिक प्रयत्नांची काही प्रमाणात जोड मिळू लागल्याने गेल्या दहा वर्षात आर्थिक उन्नतीच्यादृष्टीने तालुका आशादायी वाटचाल करीत आहे. त्यातच औद्योगिक वसाहत निर्मितीची राज्य शासनाने दिलेली धोरणात्मक हाक यामुळे आगामी काळात मंडणगड तालुका रोजगार निर्मितीचा केंद्रबिंदू ठरेल.
गेल्या दोन दशकात उमेदच्या माध्यमातून महिला बचत गटातून महिलांचे मोठे संघटन उभे राहीले आहे. संघटीत महिलांचे हातास काम मिळावे या उद्देशाने सुरू झालेले प्रयत्नही ठळकपणे दिसत आहेत. सुरवातीला शेती व गृह उद्योगात सक्रीय असणाऱ्या महिला आता मोठे प्रक्रिया उद्योग सुरू करु लागल्या आहेत.
त्यास प्रशासकीय पातळीवरुन सहकार्य मिळताना दिसून येत आहे. त्यामुळे महिला बचत गटांची चळवळ आश्वासकपणे प्रगतीचे एक एक टप्पे पार करीत आहे. आगामी काळात संघटीत महिलांचे प्रशिक्षण व त्यांना उद्योगांसाठी भांडवल या गरजा वाढणार असल्याने बँकिंगसारख्या सेवा उद्योगांचे जाळे येथे अधिक प्रभावीपणे विणले जाणार आहे.
याची प्रचिती तालुक्यात गेल्या दशकात अनेक नव्याने सुरू झालेल्या बँका, पतसंस्था, वित्तीय संस्था, खासगी वित्तीय संस्था यांच्यामुळे दिसू लागली आहे. मंडणगड तालुक्यातील देव्हारे-गणेशकोंड या गावातील महिला बचत गटाने काजू प्रक्रिया उद्योगातून लाखोंची उलाढाल केली आहे.
या गटातील दहा महिलांनी १९ फ्लेवरचे काजूगर तयार केले आहेत. या काजूची विक्री नालासोपारा, विरार, महाड, श्रीवर्धन येथे करतात. अशा पद्धतीने रोजगार मिळालेले अनेक गट आहेत.
एकूण बचत गट संख्या - ७०९
सहभागी महिलांची संख्या - ८५०८
वार्षिक आर्थिक बँक जोडणी - चालू वार्षिक २ कोटी ३० लाख ५० हजार
उत्पादने - मसाले, हळद, खाद्य पदार्थ (चिवडा लाडू चकली फरसाण इ ), काजू, कोकम, आंबा, भाजीपाला उत्पादन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, छोटी दुकाने, टेलरिंग.
सर्वसामान्यपणे शेती आधारित अर्थव्यवस्था व चाकरमन्यांचे मनीऑर्डरचे संस्कृतीतून तालुका बाहेर पडला आहे. विविध कारणांनी पारंपरिक शेती परवडत नसल्याने दुबार शेतीसाठी फायद्याच्या व व्यावसायिक शेतीचे प्रयोग तालुकावासीयांकडून यशस्वी केले जात आहेत.
शेती आधारित उत्पादनांवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाचे जाळे उभे राहण्यासाठी व्यक्तीगत पातळीवर अनेक प्रयोग यशस्वी झाले आहेत. त्यात आंबा, काजू, फणस, कोकम, करवंद या कोकणी फळांवर प्रक्रिया करण्यासाठी स्थानिक उद्योजक आज हरीरीने पुढे येत आहेत.
मंडणगड, भिंगलोळी, कळकवणे, शेनाळे, निघवणी, पालवणी, नायणे, वेळास अशा अनेक गावांतून काजू प्रक्रिया युनिट उभे राहिले आहेत. त्यातून स्थानिक महिलांच्या हाताला काम मिळत आहे.
दुग्ध उत्पादनात सहकार चळवळीने केलेल्या प्रवेशामुळे गेल्या दोन वर्षात तालुक्यात पशुधन अधिक विकसित झाले आहे. डेअरी फार्मिंगकडे येथील तरुण रोजगाराचे साधन म्हणून प्रामुख्याने वळू लागला आहे.
दुधाच्या नैमित्तीक वापरासाठी पश्चिम महाराष्ट्रावर अवलंबून असणाऱ्या मंडणगड तालुक्यात मोठ्या दुध उत्पादन कंपन्यानी आपली संकलन केंद्रे भिंगलोळी, शेनाळे, कुंबळे येथे उभारण्यात आल्याने तालुक्यात दुभते पशुधन वाढले आहे.
यातून दुग्ध व्यवसायाला चालना मिळाली आहे. एकेकाळी पिशवीच्या दुधावर अवलंबून असणाऱ्या तालुक्यातून आज दिवसाला हजारो लिटर दुध परजिल्ह्यात केले जात आहे, हे चित्र खुपच आशादायी आहे असे म्हणावे लागेल.
दुग्ध उत्पादनाला कुक्कुटपालन व शेळी पालनाची तितकीच समर्थ साथ मिळू लागली आहे. या क्षेत्रातील स्थानिकांची रुची लक्षात घेता आगामी काळात या क्षेत्राचा जलद गतीने विस्तार होणार आहे.
पर्यावरण व निसर्गाचे मंडणगडला वरदान लाभले आहे. २१ चिरेखाणीतून उत्पन्न होणाऱ्या लाल रंगाच्या चिऱ्यांनी या तालुक्यास राज्यात नवी ओळख निर्माण करून दिली आहे. स्थानिक अर्थकारणास चिरेखाण उद्योग मोठ्या प्रमाणावर गतिमान करीत असून यातून कोट्यावधींची उलाढाल होत आहे.
मंडणगड तालुक्यात विस्तारणारा दुसरा उद्योग म्हणजे कंन्स्ट्रक्शन व्यवसाय आहे. आज येथील बांधकामाचे दर पनवेल मुंबई सारख्या नगराशी स्पर्धा करत आहेत. शासकीय योजनांच्या माध्यमातून घरकुले, नव्या घरांची कन्ट्रक्शन उभी राहत आहेत. अनेक तरुण सामूहिक पद्धतीने घर बांधणीचे कॉन्ट्रॅक्ट घेत असून त्यातून आर्थिक सोर्स उभा राहिला आहे.
शेती पर्यटन व सेवा उद्योगाचे माध्यमातून आश्वासक विकासात्मक वाटचाल सुरु आहे. नदी किनाऱ्यावरील गावे, धरण परिसर, खोऱ्यातून, खलाटी शेतात कृषी पर्यटन बहरत आहे. या संदर्भातील वाटचाल अधिक प्रशस्त करण्यासाठी रोडमँप मात्र तयार करणे गरजेचे आहे. पर्यटन विकासाचे अनेक आयाम तालुक्यास लाभले आहेत.
तालुक्यातील दहाहून अधिक नैसर्गिक पर्यटन स्थळे, कोकणी जीवन शैलीचे सादरीकरण व कृषी पर्यटनाचे विकसित होत असलेले आयाम या संदर्भातील विकासाची चर्चा आता प्रत्यक्ष कृतीत उतरु लागली आहे. येऊ घातलेले अनेक शासकीय उपक्रम या प्रयत्नांना अधिक बळकट करणारे ठरणार आहेत. एकंदरीत पर्यावरण स्नेही सम्यक विकासाचे आधारे तालुका आगामी दशकातील वाटचाल करणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
विकासाची प्रक्रिया सुलभ होत असताना मोठ्या व प्रदुषणकारी प्रकल्पांची तालुक्यास आवश्यकता नाही, तशी मागणी अथवा जनरेटा नाही. सुदैवाने सध्याचे राज्यकर्तेही पर्यावरणाच्या ऱ्हासास कारणीभूत ठरतील असे प्रकल्प येथील जनतेच्या माथी मारण्याच्या मनस्थितीत सध्यातरी दिसत नाहीत. त्यामुळे विकास कसा साधायचा याचे मॉडेल करण्याची संधी तालुक्यास आजही उपलब्ध आहे. निसर्गाने दिलेल्या गोष्टींचा उपयोग करून येथील लोकांचा उदरनिर्वाह चाललेला आहे.
कोकणात दरवर्षी आयोजित केला जाणारा ‘कासव महोत्सव’ पर्यटक व अभ्यासक यांच्यासाठी आकर्षणाचे केंद्र आहे. कासव संरक्षण मोहिमेचे श्रेय प्रामुख्याने भाऊ काटदरे यांच्या ‘सह्याद्री निसर्ग मित्र’ संस्थेला दिले जाते.
या मोहिमेला सुरुवात ‘कासवांचे गाव’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मंडणगड तालुक्यातील वेळास गावी झाली. समुद्रकिनारी येणाऱ्या कासवांचे मोठ्याप्रमाणात संवर्धन केले जाते. ही कासवे किनाऱ्यालगत प्रजननासाठी येतात.
कासवांच्या विणीचा हंगाम सर्वसाधारणपणे, नोव्हेंबर ते एप्रिल हा असतो. मादी कासवे अंडी घातल्यावर त्या खड्ड्यांत वाळू भरून समुद्रात निघून जातात. त्या अंड्यांची उबवण, त्यातून पिलांची निर्मिती आणि जन्मलेली पिले समुद्रात जाणे ही सर्व प्रक्रिया नैसर्गिक आहे. ती अंडी संरक्षित करून पिल्ले समुद्रात सोडेपर्यंत वेळासमधील स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने कार्य करण्यात आले.
त्याला पर्यटनाची जोड देण्यासाठी २००६ साली वेळास येथे कासव महोत्सवाचे आयोजन केले. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. पर्यटकांची राहण्याची सोय ग्रामस्थांनी दिलेल्या सहकार्यातून त्यांची घरे, अंगणे येथे करण्यात आली होती.
वन विभागाच्या सहकार्याने त्याला मोठे स्वरूप प्राप्त झाले. आता या वेळास गावातील ऐंशी टक्के लोक कासव महोत्सवावर अवलंबून आहेत. या गावाचे अर्थकारण महोत्सवावर अवलंबून आहे. देशातीलच नव्हे तर परदेशतील लोकही येथे येतात.
रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा आंबेत पूल हा महत्वाचा दुवा आहे. आंबेत म्हाप्रळ पूलावरील वाहतूक सुरळीत झाली तर दळणवळणाचा मोठा प्रश्न सुटणार आहे. मंडणगड तालुक्यातील (जि. रत्नागिरी) म्हाप्रळ, पंदेरी, बाणकोट आदी शेजारील गावांमधील लोकांना बाजारहाट, वैद्यकीय सेवा, शिक्षण सुविधा घेण्यासाठी माणगाव, गोरेगाव, महाड, अलिबाग (जि. रायगड) ठिकाणी जावे लागते.
शेतीचा हंगामातही अत्यावश्यक सेवा उपलब्ध करण्यासाठी दोन्ही जिल्ह्यातील लोकांना आंबेत पूल मार्ग हा एकमेव महत्त्वाचा दुवा ठरतो. आंब्याच्या हंगामातही काढणी व खरेदी-विक्री सुरू झाली की आंबा बागायतदारांना आजुबाजूच्या गावांमध्ये जावे लागते.
त्यासाठी आंबेत हा मार्ग उपयुक्त आहे. हा मार्ग बंद झाला की त्याचा थेट परिणाम म्हाप्रळ येथील बाजारपेठेवर तसेच मुख्य शहरातील अत्यावश्यक सेवेवर होतो. पर्यटकांसाठीही हा मार्ग अत्यंत जवळचा आहे. या बाबी लक्षात घेता आंबेत पूलावरील वाहतुक सुरळीत राहणे मंडणगडसाठी उपयुक्त ठरणारी आहे.
तरुणांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन स्वयंरोजगाराकडे जास्तीत जास्त वळण्याची गरज आहे. स्थलांतरित होणाऱ्या तरुणांनी नोकरीवर उदरनिर्वाह होईल यात अडकून न राहता शासनाच्या विविध योजनांतून रोजगाराची वाट निवडावी. नैसर्गिक घटकांचा फायदा करून स्वतःला व कोकणाला आर्थिक दृष्टया सबळ करावे.
- अॅड. राकेश साळुंखे, चेअरमन, बहुद्देशीय सहकारी संस्था मंडणगड.
शेतीपूरक स्वयंरोजगार जास्त प्रमाणात विकसित झाल्यास मनुष्य बळ मुंबईकडून गावाकडे येईल. आंबा काजू कोकम करवंदे जांभळे फणस यापासून होणारी मूल्य वृद्धी तसेच टाकाऊ जळाऊ गवत पासून इंडस्ट्रियल कच्चा मालाची निर्मिती, लघु गृह उद्योगातून उभी राहिल्यास पर्यटन आणि रोजगार यांची तालुक्यात कमी भासणार नाही.
- कौस्तुभ जोशी, व्यावसायिक कृषी सेवा.
तालुक्यात काजूचे उत्पादन विक्रमी होते. त्यावर प्रक्रिया करून उत्पादित होणारा माल मोठ्या बाजारपेठेत पाठवून व्यवसाय करता येतो. यासाठी मेहनत करण्याची मानसिकता अंगिकारणे आवश्यक आहे.
- मिलिंद पवार, व्यावसायिक काजू युनिट.
आजकालची तरुण पिढी उच्च शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात मुंबई व इतर मोठ्या शहरांमध्ये जातात. पण त्याच शिक्षणाचा उपयोग करून आपण आपल्याच गावी रोजगाराची संधी उपलब्ध करून त्यातून चांगले उत्पन्न घेऊ शकतो.
-किरण तलार, गोविंद ऍग्रो फार्म कोंझर.
कासव महोत्सवामुळे पर्यटक वेळास गावामध्ये येऊ लागले आहेत. त्यामुळे पर्यटन व्यावसायाला चालना मिळाली असून रोजगार निर्मीतीही होत आहे. वेळास गावाचे नाव देशाच्याच नव्हे तर परदेशातही पोचले आहे. या महोत्सवामुळे गावातील अर्थकारण बदलले असून पर्यटनातून रोजगार मिळू शकतो याचे उदाहरण इतरांपुढे तयार झाले आहे.
- हेमंत सालदुरकर, वेळा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.