उद्योग साकारताना चहुबाजूंनी व अष्टावधानाने विचार करून उद्योगाच्या रूपरेषेबद्दल विचार करावा लागतो.
-प्रसाद अरविंद जोग (theworldneedit@gmail.co)
निरीक्षण कौशल्य, चिकित्सा करण्याची वृत्ती आणि विश्लेषणात्मक विचार हे उद्योग साकारताना उपयुक्त ठरणारे महत्त्वाचे घटक आहेत. समस्या निराकरण करण्यासाठी कोणत्याही गोष्टीचे शास्त्रीय पद्धतीने विश्लेषण करून त्यातून निष्कर्षाप्रत येणे गरजेचे असते. विश्लेषणात्मक (Analytical) मानसिकता ही खरी निसर्गदत्त शक्ती आहे आणि ती आपल्यातील उद्योजकीय विश्लेषणात्मक क्षमता वाढवते.
उद्योग उभारणीच्या दिवसात एक उद्योजक विविध माहिती उपलब्ध स्रोतातून संकलित करत असतो. त्या माहितीचे पृथ्थकरण करण्याची क्षमता जर उद्योजकांत (Business) विकसित झाली नसेल तर त्या माहितीचे व्यावसायिक ध्येयधोरणे ठरवण्यात फारसा फायदा होत नाही. विश्लेषण करण्याची क्षमता कोणत्याही उद्योजकाला आवश्यक मूल्यमापनानुसार मानक कार्यप्रणाली शोधण्यात आणि अंमलात आणण्यास मदत करत असते.
विश्लेषण हा एक महत्त्वाचा व्यवस्थापकीय घटक आहे ज्याचा योग्य अभ्यास केला असता उद्योग व्यवसायातील जोखीम पातळी निश्चितच कमी होऊ शकते व योग्य निर्णय घेता येऊन निर्णयांची अंमलबजावणी करणे सुलभ होऊ शकते. प्रत्येक उद्योजकाला विश्लेषणाची किंवा विविध विश्लेषणात्मक पद्धतींची काही सूत्रे व्यवस्थापनाच्यादृष्टीने माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे. उद्योग साकारताना पहिल्या पिढीतील उद्योजकाकडे दूरदृष्टी व विश्लेषणात्मक विचार करण्याची क्षमता असेल तर, उद्योगाची दिशा अचूक ठरते.
गरजांचे विश्लेषण, शक्तीस्थाने, कमकुवत दुवे, भविष्यकालीन संधी व भविष्यात येऊ शकणारे संभाव्य धोके यांचे अचूक विश्लेषण शास्त्रीय पद्धतीने करणे गरजेचे असते. नवीन उद्योगांना किंवा प्रस्थापित उद्योगांनासुद्धा सातत्याने राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, तांत्रिक बदलांकडे लक्ष ठेवून विश्लेषण करणे गरजेचे ठरते. उद्योग विकासाच्या प्रक्रियेत निरीक्षण शक्ती व विश्लेषण शक्तीच उपयोगी पडते.
गरजांचे मूल्यमापन व विश्लेषण, शक्तीस्थाने, कच्चे दुवे किंवा कमतरता, संधी आणि धोके यांचे विश्लेषण, राजकीय, भौगोलिक, पर्यावरणीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, तांत्रिक घटकांचे अभ्यासपूर्ण विश्लेषण या तीन प्रकारच्या विश्लेषण प्रकारांबद्दल आजच्या लेखात आपण अधिक माहिती करून घेणार आहोत. उद्योग साकारताना चहुबाजूंनी व अष्टावधानाने विचार करून उद्योगाच्या रूपरेषेबद्दल विचार करावा लागतो. विश्लेषण म्हणजे मुख्य गोष्टींचे घटकांनुसार वर्गीकरण करून त्यांचे परीक्षण करणे होय.
चालू घडामोडी, आजूबाजूची परिस्थिती, सामाजिक, राजकीय, भौगोलिक वातावरण या सर्व घटकांचा उद्योगाच्यादृष्टीने अभ्यास करणे हे नेहमीच महत्वाचे ठरते. तथ्य, संकल्पना गृहितके यांचा अभ्यास करून उद्योजकांनी चाकोरीबाहेर विचार करून ग्राहकांच्या गरजा पुरवण्यासाठी उपलब्ध असलेल्या संसाधनात स्वतःची ध्येयधोरणे आखून उद्योगात नफा मिळवून सातत्य कसे राहील, ते पाहायचे असते. उद्योग साकारताना उद्योजकाचे निरीक्षण कौशल्य अचूक असेल तर ग्राहकांकडून कळत नकळतपणे उद्योजकांना उत्तररूपी संकेत मिळत असतात फक्त त्याचे योग्य विश्लेषण करता यायला हवे.
समस्या आणि गरजा ओळखणे, गरजांचे मूल्यांकन करून प्राधान्यक्रम ठरवणे, गरजांच्या मूल्यांकनाची रचना निश्चित करणे, अद्ययावत माहिती गोळा करणे, संकलित माहितीचे विश्लेषण करून निर्णय घेणे, विश्लेषणाचा उद्देश विशिष्ट गरजा, आव्हाने आणि संधी समजून घेऊन त्यानंतर प्रभावी कृती आराखडा कार्यान्वित करण्यासाठी किंवा उद्योगाची ध्येयधोरणे निश्चित करण्यासाठी होतो.
(लेखक उद्योगप्रेरणा प्रशिक्षक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.