देवराईत अंदाजे पाचशे ते सहाशे वर्ष जुने उभे वाढलेले आंब्याचे झाड गेली शेकडो वर्ष देववृक्ष बनून तिथल्या निसर्गावर कमांड मिळवून आहे.
-पराग वडके, चिपळूण (parag.vadake@gmail.com)
१२ वी शिकलेला तरुण नंदू तांबे, पुढे कुठल्यातरी नावाजलेल्या विद्यापीठात प्रवेश घेऊन डॉलर कमवायचे सोडून स्वतःच्या शिरवली गावातील जंगल विद्यापीठात गेला. सध्या तो त्यातील पीएच.डी. (Ph.D. Degree) लेवलपर्यंत पोहोचलाय. वडिलोपार्जित जागा होतीच; पण या जंगलवेड्याने जंगल वाढवायचे ठरवले आणि स्वतःच्या जागेत असलेली देवराई तशीच ठेवून बाजूचे जंगल (Forest) वाचवू लागला.
ते जंगलपण ''सैराट'' होऊन या वेड्या परश्यावर प्रेम करू लागले. आज संबंध कोकणात स्वतःचे खासगी जंगल जपत असलेला नंदू एकमेव तरुण आहे. तो दरवर्षी त्याची कमाई नवीन जंगल विकत घेण्यात घालवतो. आज त्याचे खासगी जंगल ४२ एकरवर पोहोचले आहे.
चिपळूणपासून गुहागरच्या (Chiplun Guhagar) दिशेने निघायचे. १५ किलोमीटरवर डाव्या बाजूला हॉटेल चैतन्यपासून ८०० मीटरवर एक वाय आकाराचा कोकणी रस्त्याचा फाटा फुटतो. एक रस्ता मिरवणे गावात जातो. आपण डावा फाटा पकडायचा तो थेट शिरवली गावात जातो. तिथून दोन, पावणेदोन किलोमीटरवर (कै.) अण्णा तांबे खासगी रस्ता अशी कोकणी लालमातीने धूळकटलेली पाटी लागते. रस्त्याचा लाल रंग स्वागत करतो आणि अर्धा किलोमीटरवर एक कोकणी घर आणि एक कोकणी तरुण हसत स्वागत करतो, हा नंदू तांबे.
आम्ही त्याच्या घरात पोहचलो अन् एका सर्पिल गरूडाने स्वागत केले. मस्त पंख पसरल्यावर सहज तीन मीटर लांब जातील असे. तो रानराजा आम्हाला एका नजरेत जंगलाची नियामवली सांगत होता. एका नजरेत हजार सूचना. आम्ही गप्प. मागे एक फोटोग्राफर पटापट कॅमेरा काढतो आणि धडाधड त्या राजाचे फोटो काढायला लागतो. नंदू थांबवतो आणि त्या शहरी अतुल कसबेकरला मागे बोलावतो आणि बर्ड फोटोग्राफी काय अव्वल दर्जाची असते, याचे प्रात्यक्षिक दाखवत कॅमेरा कसा हॅण्डल करायचा, ते लेन्स सेट कशी करायची याचे जंगलबूकमधील काही चाप्टर उभ्या उभ्या पूर्ण करतो.
आम्ही देवराईमध्ये घुसलो आणि आणि जंगल म्हणजे काय, ते अनुभवले. नंदू त्याचे स्वानुभवाचे डिस्कव्हरी चॅनेल चालू करतो. देवराईमध्ये एक देववृक्ष असतो तो त्या तेथील सृष्टीचे प्रतिनिधित्व करतो. त्याच्या देवराईत अंदाजे पाचशे ते सहाशे वर्ष जुने उभे वाढलेले आंब्याचे झाड गेली शेकडो वर्ष देववृक्ष बनून तिथल्या निसर्गावर कमांड मिळवून आहे. नंदू सांगतो, त्याची आता जाण्याची वेळ आली आहे. दुसऱ्या झाडाकडे आमचे लक्ष वळवतो; ते पण आंब्याचे पण थोडे कमी परिघाचे. हा वृक्ष आता त्याची जागा घेईल. मूळ देववृक्ष तीन माणसांनी हाताचे वेटोळे घालून जेवढा परीघ होईल तेवढ्या परिघाचा आहे, अजस्त्र.
या जंगलात २१८ प्रकारचे पक्षी सापडतात. तो आम्हाला नुसत्या व्हिसलवरून झटकन पक्षी दाखवत होता आणि त्यांची इंग्लिश नावे सांगत होता. आम्ही त्याचे मराठी नाव काय याचा विचार करेपर्यंत नंदूचे कलाकार एन्ट्री मारत होते. एक घुबड तर तीन फुटाचे. कारगील युद्धावर गेलेल्या कमांडोसारखे एका झाडावर दडून बसले होते. जणू काही झाडाचा बुंधा वाटत होते; पण नंदू एका नजरेत ते कुठे आहे ते ओळखतो आणि आम्हाला पुढे हळू या, असे सांगत ते दाखवतो. तो म्हणतो पूर्ण वाढलेले झाड रोज २०० ते १ हजार लिटर पाणी जमिनीत सोडते. ही आकडेवारी ऐकल्यावर माझ्यासमोर बरड, पुसेगाव, उस्मानाबाद पट्टा आला.
इथे झाडेच नाहीत तर रोज जमिनीखालची पाण्याची ट्रेन येणार कुठून? त्या जंगलात नंदू झाडावरील पांढरे हिरवे स्पॉट दाखवतो. ती निशाणी म्हणजे ते जंगल किती नैसर्गिक आहे, याची खूण. एक प्रकारचे शेवाळे असते ते. विशिष्ट क्रायटेरिया पूर्ण केलेल्या जंगलातच आढळते. नंदूकडे वनखात्याचे सर्टिफिकेट आहे की, त्याचे जंगल कोयनेसारखे ''ए'' ग्रेड मध्ये येते.
काळे चित्ते नामशेष झाले, असे वनखाते म्हणते येथे दोन-तीन काळे चित्ते "आम्ही हाय बुवा इथं !" असे सांगायला मध्ये मध्ये येतात. नंदूचे तीन कुत्रे दोन दिवसात त्यांनी नेले. रानरेडे, नीलगाय, जंगली सोनेरी डुकरे ती पण चार फुट उंचीवाली, नंदूच्या जंगलात उठबस करतात. बाकी किरकोळ प्रजा आहेच. नंदूकडे आता परदेशी बर्ड फोटोग्राफर येतात. त्यांना तो हल्ली हल्ली आपल्या जंगलातील फोटो काढायला घेऊन जातो. पक्षी दिसणार हमखास, त्यामुळे लोक शोधत शोधत शिरवलीमध्ये येतात.
आदल्या दिवशी गावात कोणीतरी पकडलेला अजगर नंदूने जंगलात सोडायचा थांबवला होता. तो अस्सल अजगरएवढा चपळ असतो, हे पहिल्यांदाच बघत होतो. कुठलेही जंगल डेव्हलप व्हायला ७० वर्षे मानवरहित वनस्पती वाढायला लागतात, तर तिथे नवीन जंगल तयार होते आणि त्यात असे प्राणी सापडू लागतात. नंदूच्या खासगी जंगलाने केव्हाच तो टप्पा गाठलाय. त्याचवेळी शेजारच्या गावातून असा टप्पा गाठलेली हजारो एकर जमीन लाकूडतस्करांना लोक विकत आहेत निर्बुद्धपणे!
(लेखक दऱ्याखोऱ्यांतून भटकंती करणारा सामाजिक कार्यकर्ता आहे.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.