या मंदिराला लागणारा काळा दगड कुठून आणला, असा प्रश्न उपस्थित होतो कारण, हा दगड तिथे आजूबाजूला कुठेच नाही. बहुतेक तो कोकणच्या सह्याद्री पट्ट्यातून नेला असावा, असा संशोधक अंदाज वर्तवतात.
-पराग वडके, चिपळूण parag.vadake@gmail.com
खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराचे (Khidrapur Kopeshwar Temple) काम इ. स. पूर्व ६०० शतकात चालू झाले असावे, असे इथले ताम्रपट सांगतात. मग जसजशा राजवटी बदलत गेल्या तसतसे त्या मंदिरात संस्कार घडत गेले म्हणूनच कधी जैन, बौद्ध (Buddhist), हिंदू अशा तीनही धर्माच्या मूर्ती, व्यक्तिमत्त्वे इथे दिसतात. सातवाहन, राष्ट्रकूट, चालुक्य, शिलाहार, यादव, आदिलशहा अशा राजवटींनी या मंदिरावर संस्कार केलेले दिसून येतात. आज १६०० वर्षे झाली.
मंदिर सगळ्या राजवटींना पुरून उरलेले आहे. पूर्वी मुघल आक्रमणे ज्या वेळेला होत त्या वेळी एक मशीद बांधणारा आर्किटेक्ट बरोबर असे. तो मग मंदिराच्या रचनेनुसार काय पडायचे आणि हे ठरवत असे. त्यातील बऱ्याच खुणापण दिसतात. सगळ्या मूर्तींचे हात, हत्तींची सोंड तोडलेली दिसते.
खिद्रापूरला श्री शंकराचे कोपेश्वर मंदिरात जायचा योग आला. पुन्हा पुन्हा हे दगडी सौंदर्य पाहिलं तरी मन भरत नाही. सतत प्राचीन भारतसमोर नाचायला लागतो, हालचाली चालू होतात, लगबग दिसू लागते. पेहराव, आभूषणे चमकू लागतात. स्वर्ग म्हणजे हाच असे चित्र रंगू लागते. त्यात हजारो रंग मिसळले जातात. त्यात आपण कधी रंगून जातो ते कळत नाही. तुम्हालाही रंगायचे असेल तर एक दिवसाची हटके, भटकी सहल काढा. पहिल्यांदा श्री दत्तगुरू यांचे वास्तव्य असलेली नृसिंहवाडी गाठायची. तिथून सुटायचे आणि १५ किलोमीटरवरील खिद्रापूर गाठायचे गाव. एकदम साधी लोकं अजून पैशाची लूट कशी करतात, हे न समजलेली. प्रवेशद्वारावर तुम्ही गाडी लावता आणि मंदिर कुठे असेल असा विचार करू लागता कारण, अतिशय विटलेली एक कमान असते.
बाहेर दोन दगडी सिंह; पण अतिशय जीर्ण, मनात पाल चुकचुकते, आयला उगाच आलो वाटतो. कोणाचे तरी ऐकून असे भाव मनात येऊन जातात आणि उंबरठ्यावरून आत पाय टाकता आणि प्राचीन भारतीय ‘भानामतीत’ तुमची ‘मती’ मनावरचा ताबा गमावून बसते. फक्त समोरच्या चित्रात स्वतःला बसवण्याची धडपड चालू आहे. सर्वात प्रथम तुमचे स्वागत करतो तो सभामंडप. शंकराचे मंदिर (Shankar Temple) असून तिथे नंदी नाही. त्यामागे एक दंतकथा आहे. शंकराला दक्षराजाने वाजपेयी यज्ञात बोलावले नाही; पण शंकराची पत्नी मात्र आपल्या पित्याकडे म्हणजे दक्षाकडे गेली त्या वेळी सहकाराने सोबत नंदीला पाठवले म्हणून तिथे नंदी नाही. तिथून स्वर्गमंडपात आपण प्रवेश करतो. हा पूर्ण मंडप ४८ खांबावर उभा आहे आणि चार प्रमुख दिशांच्या दिशेने प्रवेशद्वार आहेत.
मध्यभागी १३ फूट व्यासाचे मोकळे असे गवाक्ष आहे. वर बघितलात तर वाटेल, साक्षात ‘सूर्यनारायण’ तुम्हाला हॅलो करत आहेत आणि बरोबर तेवढ्याच वासाची एक सपाट शीला जमिनीवर आहे. सर्व वर्तुळ एक इंचाचाही फरक न होता वरील मोकळ्या भागाशी मिळतेजुळते आहे. कोणी म्हणते ते वरील छप्पर आहे लावायचे राहिले आहे; पण हा जो प्रकार आणि चमत्कार इथे बघायला मिळतो तो फक्त भारतात फक्त याच मंदिरात आहे. तिथून गाभारा अंतराळगृह अशी रचना आहे. आतमध्ये शंकराची दोन लिंगे आहेत. एक कोपेश्वर आणि एक धोपेश्वर. त्यामागे पण आख्यायिका आहे. संपूर्ण मंदिरात ९२ हत्ती कोरलेले आहेत. तिथे ज्या ललना कोरलेल्या आहेत त्यांच्या पायाची नखे आणि नखाला पॉलिश करतानाची दृश्ये सध्याच्या आधुनिक कला दिग्दर्शकाला लाजवेल, अशी आहेत.
स्त्रियांची प्रत्येक आभूषणे आपल्याला बघायला मिळतात. इसापनीतीतील दंतकथा, नग्नसौंदर्य प्रगत करणाऱ्या ललना, द्वारपाल, राजा, जैन मुनी, योगी अशा विविध दगडी कोरलेल्या मूर्तींचा खजिना इथे उलगडत जातो. हे मंदिर बघताना एक प्रश्न पडतो. अस्तित्वात नसताना प्रचंड मजले कसे बांधले जात असतील, त्याचे उत्तर तेथील एका तरुणाने दिले. पूर्वी पाया घातल्यावर तिथे भराव करत. जसजसा एकेक मजल होत असे तसतसा भराव मंदिराच्या बाजूने वाढवला जात असे. त्यामुळे वरचे खांब, छप्पर उचलावे लागत नसे तर फक्त ढकलून साच्यात बसवावे लागे आणि पूर्ण मंदिर झाल्यावर नंतर हा भराव काढला जात असे. ज्या वेळी तो भराव हातात असे त्या वेळी एक दगडी सौंदर्य प्रगत होत असे. कधी कधी हा भराव ५०-५० वर्ष तसाच असे म्हणूनच आपल्याला कधी कधी उत्खनन करताना मंदिरे सापडतात.
या मंदिराला लागणारा काळा दगड कुठून आणला, असा प्रश्न उपस्थित होतो कारण, हा दगड तिथे आजूबाजूला कुठेच नाही. बहुतेक तो कोकणच्या सह्याद्री पट्ट्यातून नेला असावा, असा संशोधक अंदाज वर्तवतात. या मंदिराच्या बाजूला एक जैन मंदिर आहे. ते मुद्दामहून चौकशी करून बघायला जा. तेथील मूर्ती १५ ते १६ फूट आहे. त्याचा दगड सकाळ, दुपार, संध्याकाळ आपला रंग बदलतो. आजूबाजूला धर्मांतरित मुस्लिम, जैन, बुद्ध आणि मुळ हिंदू अशी लोकसंख्या बघायला मिळते. अजून, एक निसर्गाचा चमत्कार इथे आहे.
देवळाच्या आजूबाजूला वडाची झाडे आहेत आणि त्यावर शेकडो वटवाघाळे राहतात आणि या झाडांना एकाच वेळेला फळधारणा होत नाही तर एकामागोमाग फळे येतात. त्यामुळे कुठे पालवी फुटत असते तर कुठे पानगळ बघायला मिळते. मंदिर बघायला तुम्हाला कमीत कमी ३ तास हवेत. दिवस उजेडी जा तर सौंदर्य समजून घेता येतील. कोल्हापूरपासून ७२ किलोमीटर आहे. नृसिंहवाडीपासून तिथे जायला बस मिळतात आणि माझे एक चॅलेंज आहे. तुम्ही ही दगडी कविता वाचलीत तर ती पुन्हा पुन्हा वाचायला नक्की जाता.
(लेखक दऱ्याखोऱ्यांतून भटकंती करणारा सामाजिक कार्यकर्ता आहे.)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.