कोयनेतील पाण्यावर पिण्याच्या आणि सिंचन योजनाही अवलंबून आहेत. त्यामुळे मागील तीन महिन्यांत सिंचनासाठी वारंवार पाणी सोडण्यात आले आहे.
चिपळूण : कोयना धरणातील (Koyna Dam) वीजनिर्मितीसाठी राखीव असलेल्या पाणीसाठ्यातून तब्बल ८. ६७ टीएमसी पाणी सिंचनासाठी दिल्यामुळे वीजनिर्मितीवर (Power Generation) मर्यादा आली आहे. कोयना प्रकल्पातून सद्यःस्थितीत सहाशे मेगावॅटपर्यंत वीजनिर्मिती केली जात आहे.
सातारा (Satara) जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोयना धरण आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी इतकी आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात पर्जन्यमान कमी झाले होते तसेच कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस कमी राहिला. त्यामुळे धरणातील पाणीसाठा ९५ टीएमसीच्या उंबरठ्यावरच पोहोचला होता. परिणामी, सातारा, सांगली जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने कोयनेतील पाण्याला मागणी वाढणार अशी चिन्हे होती.
त्याप्रमाणे गेल्या वर्षी नोव्हेंबरपासूनच कोयनेतून पाणी विसर्ग सुरू झाला. एकूण ६७.५ टीएमसी पाणी वीजनिर्मितीसाठी राखीव आहे. यातील ८.६७ पाणी कपात करून ते सिंचन आणि पिण्यासाठी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. वीजनिर्मितीच्या राखीव पाण्यावर संकट आल्यानंतर त्याचे दुष्परिणाम चिपळूण परिसरातही जाणवू लागले आहेत. वाशिष्ठीचे पात्र कोरडे पडल्यामुळे चिपळूण शहर, उपनगरातील काही गावे आणि खेर्डी, खडपोली, लोटे एमआयडीसीला पाणीटंचाई जाणवू लागली आहे. २ हजार मेगावॅट वीजनिर्मितीची क्षमता असलेल्या या प्रकल्पातून सध्या ६०० मेगावॅटपर्यंत वीजनिर्मिती सुरू आहे.
कोयनेतील पाण्यावर पिण्याच्या आणि सिंचन योजनाही अवलंबून आहेत. त्यामुळे मागील तीन महिन्यांत सिंचनासाठी वारंवार पाणी सोडण्यात आले आहे. मागील महिन्यात तर सांगलीच्या पाटबंधारे विभागाकडून सिंचन मागणीत वाढ झाली. त्यामुळे कोयना धरणाच्या आपत्कालीन द्वारमधूनही एक हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला. या कारणाने पायथा वीजगृह आणि आपत्कालीन द्वार असे दोन्हीकडील मिळून ३१०० क्युसेक पाणी विसर्ग सुरू होता; मात्र आता धरणाचे आपत्कालीन द्वार बंद केले आहे. यामुळे सध्या पायथा वीजगृहाची दोन्ही युनिट सुरू आहेत. त्यातूनच २१०० क्युसेक वेगाने पाणी कोयना नदीपात्रात सोडले जात आहे.
यंदा वीजनिर्मितीसाठी कोयना धरणातून कमी प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध होणार आहे, याचा विचार करून जलविद्युत प्रकल्पातून वीजनिर्मितीचे आणि पाणी वापराचे काटेकोरपणे नियोजन केले जात आहे. आवश्यक त्या वेळेला कोयना प्रकल्पातून वीजनिर्मिती केली जात आहे.
- संजय चोपडे, मुख्य अभियंता, महानिर्मिती कंपनी, पोफळी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.