मार्चच्या दुसऱ्याच पंधरवड्यात दररोज कोकणातून ३५ ते ४८ हजार पेटी वाशीत दाखल होत आहेत.
रत्नागिरी : मार्चच्या दुसऱ्या पंधरवड्यात मुंबईतील वाशी बाजारात (Vashi Bazaar) हापूसचे दर (Alphonso Mango) उतरल्यामुळे कोकणातील आंबा (Konkan Hapus Mango) बागायतदार धास्तावले आहेत. हे दर स्थिर ठेवा, असे साकडे रत्नागिरीतील आंबा बागायतदारांनी मुंबईत झालेल्या बैठकीत दलालांना घातले. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत सरासरी दर देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन दिले आहे.
रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक संघाचे (Ratnagiri Mango Growers Association) अध्यक्ष प्रदीप सावंत, बावा साळवी, राजेंद्र कदम, अजित शिंदे यांच्यासह उदय बने, परशुराम कदम अशा सुमारे पंधरा ते वीस बागायतदारांनी वाशीतील दलालांशी संवाद साधला. या वेळी आमदार नीतेश राणे यांनीही सिंधुदुर्गमधील आंबा बागायतदारांच्या समस्या मांडल्या. या बैठकीत वाशी बाजार समितीचे संचालक संजय पानसरे उपस्थित होते.
हंगामाच्या सुरुवातीला थ्रिप्सचा प्रादुर्भाव झाल्यामुळे फवारणीवर खर्च करावा लागल्याचे बागायतदारांनी बैठकीच्या सुरुवातीलाच सांगितले. सुरुवातीला दर चांगला होता; मात्र सध्या अपेक्षित दर मिळत नाही. मार्चच्या दुसऱ्याच पंधरवड्यात दररोज कोकणातून ३५ ते ४८ हजार पेटी वाशीत दाखल होत आहेत. दरवर्षीच्या तुलनेत कमी पेट्या असतानाही आठवडाभराच्या अंतराने पेट्यांचे दर कमी झाले आहेत. फेब्रुवारीत पाच डझनच्या पेटीचा दर साडेसहा हजार रुपयांवरून चार हजार रुपयांवर आला आहे. किमान दर दोन हजार रुपये इतका आहे.
भविष्यात हा दर आणखीन कमी होईल, अशी भीती बागायतदारांनी बैठाकीत व्यक्त केली. त्यामुळे वाशी बाजारातील व्यावसायिकांनी हे दर स्थिर ठेवा, अशी मागणी केली तसेच पाच ते आठ डझनाच्या पेट्यांच्या दरामध्ये पाचशे रुपयांचा फरक ठेवणे अपेक्षित आहे जेणेकरून त्यातील शंभर रुपये फायदा हा बागायतदाराला मिळेल. ही तफावत कमी-अधिक असल्यामुळे त्याचा फायदा होत नाही. या प्रसंगी सिंधुदुर्गतील आमदार नीतेश राणे यांनीही देवगडमधील बागायतदारांचे प्रश्न व्यावसायिकांसमोर मांडले.
सध्या बागायतदार अडचणीत आहेत. त्यावर तोडगा काढला जावा, अशी सूचना केली. बागायतदारांची मते ऐकून घेतल्यानंतर व्यावसायिकांनी वाशीतील परिस्थिती त्यांच्यापुढे मांडली. सध्या ग्राहकांकडून अपेक्षित उठाव होत नसल्याने माल तसाच राहतो. निर्यातीमध्ये काहीकाळ अडथळे येत होते. दर स्थिर ठेवणे हे व्यावसायिकांच्या हातामध्ये नाही. त्यामुळे सरासरी दर कसा चांगला देता येईल या दृष्टीने व्यावसायिक सहकार्य करतील, असे आश्वासन बागायतदारांना देण्यात आले.
हापूसच्या दराविषयी वाशीतील दलालांबरोबर बैठक झाली. त्यामध्ये बागायतदारांनी आपापली मते मांडली आहेत. तेथील व्यावसायिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे हापूसच्या दरातील घसरण थांबेल, अशी अपेक्षा आहे.
-प्रदीप सावंत, अध्यक्ष, जिल्हा आंबा उत्पादक संघ
हापूसचे दर कमी-अधिक होणे हे वाशीतील व्यावसायिकांवर अवलंबून नाही. त्यामुळे हंगामातील सरासरी दर बागायतदाराला कसा मिळवून देता येईल या दृष्टीन प्रयत्न करू.
-संजय पानसरे, संचालक, बाजार समिती, वाशी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.