यंदा समुद्रीकिनारी अंडी सापडण्याच्या कालावधीत मोठी गडबड झाली व जानेवारीत अंड्यांचे पहिले घरटे संरक्षित झाले.
मंडणगड : कासव (Turtle) विणीचा हंगाम लांबल्याने तसेच वनविभाग व स्थानिकांनी या संदर्भात गुप्तता पाळल्याने यंदाच्या वेळास येथील कासव महोत्सवाचे (Turtle Festival) भवितव्य अंधारात गेले आहे. संरक्षित केलेल्या घरट्यातील पिल्लांच्या जन्मोत्सवाबाबत कोणतीही आकडेवारी प्राप्त न झाल्याने वेळास येथील कासवांच्या जन्मोत्सवाचा नैसर्गिक सोहळा पाहण्यासाठी येणारे स्थानिक पर्यटक, निसर्गप्रेमी यापासून वंचित राहिले. याला कारणीभूत वनविभागाची कार्यपद्धती असल्याची चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे.
ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांच्या (Olive Ridley Turtle) संरक्षण मोहिमेमुळे वेळास हे गाव गेल्या १६ वर्षांपासून जगाच्या नकाशावर आहे. कासवे समुद्रीकिनारी अंडी घालून जात असत. त्यामुळे महोत्सवाचे वेळापत्रक जाहीर होत असे. यंदा समुद्रीकिनारी अंडी सापडण्याच्या कालावधीत मोठी गडबड झाली व जानेवारीत अंड्यांचे पहिले घरटे संरक्षित झाले. त्यामुळे कासवांचा जन्मसोहळा लांबणार हे पक्के होते; मात्र तो कधी असेल, या संदर्भात वनविभागाने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही किंवा तसे वेळापत्रक जाहीर केलेले नाही.
या संदर्भात सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर दापोली येथील वनपरिक्षेत्र अधिकारी पाटील यांच्याकडे प्राप्त झालेल्या जाहीर माहितीनुसार, वेळास किनारी एकूण ३६ घरट्यांमध्ये ३६८३ अंडी १ नोव्हेंबर २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत संरक्षित केली आहेत. यातील ८२० पिल्लांना समुद्रात सुरक्षितपणे सोडण्यात आले; मात्र ही पिल्ले कोणत्या दिवशी किती संख्येने समुद्रात सोडली. याविषयी अधिकचे तपशील प्राप्त झालेले नाहीत.
वेळास येथे सुरुवातीचा काही काळ सोडला तर स्थानिक ग्रामस्थ, ग्रामपंचायत व वनविभाग संयुक्तपणे या मोहिमेचे संचालन करत आहे. कासव जन्मोत्सवाची माहिती कासवमित्रांना विचारली असता, कासवमित्र हे वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे बोट दाखवतात. अधिकाऱ्यांना विचारले असता ते त्यांच्या वरिष्ठकांडे बोट दाखवतात व वरिष्ठांना विचारले असता ते पुन्हा स्थानिक वनपालांकडे माहिती घेऊन सांगतो, असे सांगतात. त्यामुळे माहिती लपवून नेमके काय साधले जात आहे ? स्थानिक तालुकावासीय कासव महोत्सव पाहण्यासाठी येऊच नयेत, अशी यामागची धारणा आहे का ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
कासव महोत्सवाने वेळास या गावाकडे संपूर्ण जगाचे लक्ष असल्याने वनविभागाने आपली कार्यपद्धती लोकाभिमुख करत ही ओळख अधिक सशक्त करण्यासाठी वेळोवेळी माहिती जाहीर करून पारदर्शकता आणण्याची गरज आहे.
-रघुनाथ पोस्टुरे, सामाजिक कार्यकर्ते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.