उद्योजकाला खेळते भांडवल कच्चामाल घेण्यासाठी आणि वीज, पाणी व इंधनभारावर खर्च करावे लागते.
-प्रसाद अरविंद जोग theworldneedit@gmail.com
प्रकल्प अहवाल किंवा व्यवसाय आराखडा (Business Plan) म्हणजे प्रस्तावित प्रकल्पाचे संभाव्य प्रारूप. प्रत्येक उद्योगाचे प्रारूप हे सर्वात प्रथम उद्योजकाच्या मनात कोरले जाते. आपला उद्योग कसा असेल? त्याचे स्वरूप काय असेल? तो उद्योग चालवण्यासाठी लागणारे व्यवस्थापन कसे करावे लागेल? असे विविध प्रश्न उद्योजकाला प्रयत्नवादी बनवत असतात. उद्योजकाला बाजारपेठांचे सर्वेक्षण (Survey of Markets) करून, आपल्या क्षमतांचा योग्य अंदाज घेऊन आणि जवळच्या भौगोलिक भू भागात मिळणाऱ्या कच्च्या मालाचा व इतर संसाधनांचा अंदाज घेत उद्योगाचा लिखित आराखडा तयार करावा लागतो. खरे तर हे एक कौशल्याचे काम असते.
कारण त्यात दूरदर्शीपणा दाखवून सविस्तर प्रकल्प अहवाल निर्मिती ही उद्योजकाला करावी लागत असते. हा प्रकल्प अहवाल तज्ज्ञ माणसांच्या मार्गदर्शनाखाली बनवल्यास आणखीन स्पष्टता येऊ शकते. पण विकतचे किंवा आयते प्रकल्प अहवाल उद्योजकाने स्वीकारू नयेत. प्रकल्प अहवाल (Project Report) म्हणजे नेमके काय? त्यात कोणत्या गोष्टी ठळकपणे बघितल्या जातात हे उद्योजकांनी जाणून घ्यावे म्हणून आजच्या लेखात उद्योजकांना व्यवसाय आराखडा तयार करण्याची सोपी पद्धत येथे देत आहोत.
नवीन उद्योग सुरू करताना, बँकेकडून किंवा वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यासाठी अर्ज करताना, स्वतःचा उद्योग व्यवस्थित सादर करण्यासाठी किंवा त्याचे प्रारूप कागदावर लिखित स्वरूपात उतरवण्यासाठी पहिल्या पिढीतील उद्योजकाला प्रकल्प अहवालाची किंवा उद्योग - व्यवसाय आराखड्याची नितांत गरज असते. उद्योजक स्वतः हुन सुद्धा आपल्या व्यवसायाचे आरेखन चांगल्या पध्दतीने करू शकतात व आपल्या उद्योग व्यवसायात असणारे सामर्थ्य कर्ज पुरवठादाराला किंवा गुंतवणूकदाराला लक्षात आणून देऊ शकतात. व्यवसाय आराखडा जेवढा सोपा व सुस्पष्ट असेल किंवा वास्तववादी असेल तर तो अधिक पारदर्शक व व्यवहार्य वाटतो.
व्यवसाय आराखडा उद्योगाचे पुढील तीन किंवा पाच वर्षाचे उद्योग विस्तारीकरणाचे नियोजन बद्ध टप्पे समजावून देणारा किंवा उद्योजकाच्या दृष्टिकोनाचा ठाव घेणारा असल्यास उद्योजकाला उद्योग कर्ज मिळवण्यास सहाय्यभूत ठरत असल्याचे दिसून येते. व्यवसायाची पुढची दिशा किंवा एकंदरीत व्यवसायाचे स्वरूप व प्रारूप व त्या संबंधित व्यवस्थापन प्रणाली, अंमलबजावणी, यांच्यावर सुध्दा प्रकल्प अहवाल प्रकाश टाकणारा असल्यास तो उद्योजकाच्या अधिकच्या परिपक्वतेची जाणीव करून देतो.
व्यवसाय आराखडा तयार करताना सर्वात प्रथम येते ती उद्योजकाची वैयक्तिक माहिती - उद्योजकाचे पूर्ण नाव, उद्योजकाचा निवासी पूर्ण पत्ता, उद्योजकाची जन्मतारीख, उद्योजकाचे वय, उद्योग व्यवसायाचे किंवा प्रस्तावित प्रकल्पाचे नाव व पत्ता, उद्योग व्यवसायाचा प्रकार : उत्पादन/सेवा / व्यापार, उद्योग व्यवसायाचे स्वरूप : मालकी एकल / भागीदारी (असल्यास), उद्योगाच्या जागेची माहिती : स्वतःची/ भाडे तत्वावर असलेली, उद्योजकाचा शैक्षणिक पात्रतेचा तपशील, उद्योजकाच्या अन्य कौशल्य विषयक प्रशिक्षणाचा किंवा उद्योजकीय प्रशिक्षण घेतला असल्यास त्याचा तपशील, उद्योजकाला असलेला अनुभव उद्योजक थोडक्यात नोंदवू शकतो, १२ प्रकल्पाची गरज, प्रकल्पाची संकल्पना, प्रकल्पाची उपयुक्तता याविषयक थोडक्यात माहिती यानंतर एका दृष्टिक्षेपात प्रकल्प कसा असेल याचे संक्षिप्त काहीवेळा प्रकल्प आराखड्यात पहिल्यांदा घेतले जाते.
प्रकल्पाचे पूर्ण शीर्षक, प्लँटची वार्षिक उत्पादन घेण्याची क्षमता, जागेची आणि जागा विकसनाची येणारी किंमत, इमला/ इमारत/शेड बांधायला येणारा खर्च, प्लँट आणि यंत्र सामुग्री खर्च, तंत्र सल्ला/ तांत्रिक मार्गदर्शन फी असल्यास, उद्योग उभारणीसाठी सुरुवातीस येणारे खर्च, खेळते भांडवल असल्यास त्याची माहिती, वर्षभरात येणारा विजेचा खर्च, ना नफा ना तोटा बिंदूची माहिती, व्यवसाय आराखडा तयार करताना विविध पैलूंचा विचार केला जातो त्यातील प्रामुख्याने लक्षात घ्यायचे घटक म्हणजे आर्थिक पैलू, तांत्रिक पैलू, अर्थसाहाय्यक विषयक पैलू, उत्पादकता आणि व्यवस्थापकीय पैलू.
उत्पादनक्षमतेविषयक उद्योजकाला प्रकल्पामध्ये जर आठ तास प्लँट वापरला तर किती उत्पादन निघेल याचीही माहिती द्यावी लागते. प्रकल्प नवीन असेल तर स्थापन क्षमतेच्या किती पट किंवा किती टक्के उपयोगिता क्षमता असणार आहे, हेही उद्योजकाला स्पष्ट करावे लागते. यामध्ये प्रति दिवस, साप्ताहिक, मासिक, त्रैमासिक वार्षिक उत्पादन क्षमतेचा अंदाज बांधता येतो. प्रकल्प अहवालामध्ये विक्री धोरण किंवा त्याचा गोषवारा देणे क्रमप्राप्त ठरते. व्यवसाय स्थापन होण्यापूर्वी जो खर्च उद्योगाला येतो, त्याची नोंद उद्योजकाने ठेवणे गरजेचे असते. प्रकल्पामध्ये ते व्यवसाय स्थापन करण्यापूर्वीच्या खर्चामध्ये दाखवता येऊ शकते. उद्योजकाकडे जर स्थिर मालमत्ता असेल तर त्याने त्याचा तपशील देणे गरजेचे असते.
उद्योगात वापरली जाणारी यंत्रसामुग्री व अन्य उपकरणे उद्योजक जर नवीन घेणार असेल तर पुरवठादाराचे नाव व पत्ता देणे क्रमप्राप्त असते. उद्योजक त्याची कोटेशन ही प्रकल्प अहवालामध्ये संदर्भासह देऊ शकतो. उद्योजकाला खेळते भांडवल कच्चामाल घेण्यासाठी आणि वीज, पाणी व इंधनभारावर खर्च करावे लागते. कधी-कधी कूशल अर्ध कूशल कर्मचाऱ्यांवरही खेळत्या भांडवलामधूनच खर्च केला जातो. त्याचा तपशील व भविष्यात येणाऱ्या प्रशासकीय खर्चाचा तपशील यांचा पूर्ण लेखाजोखा प्रकल्प अहवालात मांडला तर प्रकल्पाची पारदर्शी प्रतिमा तयार होण्यास निश्चितच मदत होते. विक्री करणे व त्यासाठी लागणारे सर्व प्रस्तावित खर्च उद्योजकाला तपशीलवार प्रकल्प अहवालात द्यावे लागतात. त्यामध्ये विपणन खर्च, जाहिरात खर्च, प्रवास खर्च, वाहतूक खर्च, विक्रीचे जाळे असल्यास द्यावे लागणारे कमिशन यांचा अंतर्भाव होतो.
प्रकल्पामध्ये आपण उद्योग कुठे सुरू करणार आहोत? कसा सुरू करणार आहोत? सुरुवातीच्या काळात लागणारे उद्योगासाठीचे खेळते भांडवल आपण कसे तयार करणार आहोत? उद्योगासाठी लागणारी यंत्रसामग्री मनुष्यबळ आपण कसे उभे करणार आहोत? जर कर्ज साह्य घ्यायचे असल्यास आपण ते कोणत्या वित्तीय संस्थेकडून किंवा बँकेकडून घेणार आहोत किंवा कोणत्या शासकीय योजनेंतर्गत घेणार आहोत याचे सूक्ष्म विश्लेषण प्रकल्प अहवालात आल्यास प्रकल्पाचे स्वरूप स्पष्ट होते. प्रकल्प अहवालात बँकेचे प्रस्तावित व्याजदर सुद्धा लक्षात घेणे गरजेचे असते.
प्रकल्प पुढील तीन वर्ष किंवा पाच वर्ष रोखीचा प्रवाह दाखवणारा असल्यास गुंतवणूकदारांना योग्य निर्णय घेण्यास सुलभता येते. काही उद्योजक सुरुवातीचा प्रकल्प अहवाल सादर करणे पसंत करतात तर काही उद्योजक समग्र प्रकल्प अहवाल तयार करतात. प्रकल्प अहवाल तयार करणे हा उद्योजकतेमधील गांभीर्यपूर्ण विषय असून या टप्प्यावर उद्योजकाची मानसिकता व व्यावसायिकता दिसून येते. उद्योजक म्हणून उद्योजकाकडे असणारे स्त्रोत, आर्थिक स्त्रोत, व त्यांचे भविष्यकालीन आरेखन यावर उद्योग व्यवहार्य आहे का नाही याचा बोध योग्य रीतीने जाणकार, बँकर्स, सल्लागार घेऊ शकतात व गरजेनुसार आवश्यक असल्यास नव उद्योजकांना मार्गदर्शन करू शकतात.
(लेखक उद्योगप्रेरणा प्रशिक्षक आहेत.)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.