हंगामाच्या आरंभीला हापूसचा पेटीचा दर साडेसहा ते सात हजार रुपये होता. मात्र आवक वाढत गेली तसा दर कमी झाला.
रत्नागिरी : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कोकणचा हापूस (Konkan Hapus) बाजारात पाठविण्याची परंपरा यंदाही अनेक बागायतदारांनी जपली आहे. त्यामुळे सलग दोन दिवस वाशी बाजारात हापूसच्या ६७ हजार आणि ६५ हजार पेट्या दाखल झाल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट पेट्या आल्याचे वाशीतील व्यावसायिकांनी सांगितले. हापूसचा दर ३०० ते ८०० रुपये डझन विकला जात असून तुलनेत पाचशे रुपयांनी कमी आहे. मात्र, मागील आठवड्यातील घसरण काहीअंशी थांबल्यामुळे बागायतदारांना दिलासा मिळाला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातून गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला हापूस बाजारात विक्रीसाठी पाठविण्याची परंपरा आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने हंगाम सुरू होतो. परंतु यंदा फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यात रत्नागिरी, सिंधुदुर्गमधून तुलनेत सर्वाधिक हापूस वाशीसह (Vashi Market) पुणे, अहमदाबाद, पश्चिम महाराष्ट्रातील विविध बाजारात दाखल झाला. लवकर आणि मुबलक आंबा विक्रीसाठी आला होता.
५० टक्क्यांहून अधिक बागायतदारांनी पाडव्याला विक्रीचा मुहूर्त केला आहे. त्यांच्याबरोबर इतर बागायतदारांच्या मिळून सोमवारी (ता. ८) वाशी बाजारात दाखल झालेल्या ९२ हजार पेटींपैकी हापूसच्या ६७ हजार पेट्या आहेत. तर उर्वरित अन्य आंबे आहेत. मंगळवारी (ता. ९) ६५ हजार पेटी आंबा कोकणातून दाखल झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
पाडव्याला एक लाख पेटी कोकणातून पाठवली जाते, ही परंपरा यंदाही कायम असल्याचे आकडेवारी पाहता दिसून येते. गतवर्षी याच कालवधीत २९ हजार आणि ४० हजार पेट्या आल्या होत्या. मात्र कर्नाटकसह अन्य आंब्यांची आवक कमी होती. यंदा हापूसची दुप्पट आवक आहे. दरम्यान, हंगामाच्या आरंभीला हापूसचा पेटीचा दर साडेसहा ते सात हजार रुपये होता. मात्र आवक वाढत गेली तसा दर कमी झाला. मार्चच्या पहिल्या आठवड्यात पन्नास टक्क्यावर दर आले. त्यामुळे आंबा बागायतदार हादरले होते.
आवक वाढण्याबरोबरच निर्यात करण्यातील अडथळेही कारणीभूत असल्याची कारणे वाशीतील व्यावसायिकांनी पुढे केली होती. रत्नागिरीतील बागायतदारांनी व्यावसयिकांशी संवाद साधत दर स्थिर ठेवण्याची मागणी केली होती. त्यानंतर काही कालावधीसाठी पेटीचा दर ३७०० रुपयांपर्यंत राहिला. सध्या दर्जेदार आंब्याला डझनला ८०० रुपये दर मिळत असून सर्वात कमी वजनाच्या फळाला ३०० रुपये दर मिळत आहे. गतवर्षी पाचशे रुपये अधिक दर होता. मात्र तेव्हा आवक कमी होती, असे व्यावसायिकांनी सांगितले.
वाशी बाजारातील हापूसची आवक यंदा तुलनेत अधिक आहे. गतवर्षी याच कालावधीत कोकण वगळता अन्य भागातील आंबे अधिक होते. बाजारातील स्थिती पाहता दर गतवर्षीपेक्षा कमी असले तरीही स्थिर आहेत. आखाती देशातील निर्यात चार दिवसांनी पुन्हा सुरू झाली आहे.
-संजय पानसरे, संचालक, वाशी बाजार समिती
मागील आठवड्यात हापूसची आवक कमी राहिल्यामुळे आणि ग्राहक अधिक असल्याने हापूसचा पेटीचा दर स्थिर राहिला. सध्या साठ टक्क्यांहून अधिक बागायतदारांकडील आंबा काढणी पूर्ण होत आली आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये दर स्थिर राहील, अशी अपेक्षा आहे. हा दर असाचा राहिला तर हंगामातील खर्च भरून निघेल.
-राजेंद्र कदम, आंबा बागायतदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.