जाळ्यात अडकून त्यात गुरफटल्याने पाण्यात बुडून या डॉल्फिनच्या मृत्यू झाल्याची दाट शक्यता आहे, अशी माहिती वन विभागाकडून देण्यात आहे.
हर्णै : दापोली (Dapoli) तालुक्यातील आंजर्ले किनाऱ्यावर डॉल्फिनचे (Dolphin) मृत पिलू (वासरू) रविवारी (ता. ७) आढळून आले. या पिलाच्या तोंडाला प्लास्टिकचे रीळ अडकलेले होते. शिवाय त्याच्या शरीरावर जाळ्यामध्ये गुरफटल्याच्या खुणाही होत्या. शवविच्छेदनामध्ये त्याच्या फुफ्फुसात पाणी साठल्याचे आढळले. त्यामुळे जाळ्यात अडकून बुडाल्याने या पिलाचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आंजर्ले किनाऱ्यावर कासव महोत्सवाची (Turtle Festival) रेलचेल सुरू आहे. या महोत्सवात सहभागी झालेल्या वन्यजीव निरीक्षक मानसी वर्दे यांना रविवारी पहाटे किनाऱ्यावर डॉल्फिनचे मृत शरीर आढळून आले. डॉल्फिनच्या चोचीसारख्या तोंडामध्ये प्लास्टिकचे रीळ अडकले होते. त्यांनी यासंबंधीची माहिती वन विभागाला कळवली.
दापोली वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर डॉल्फिनचे शवविच्छेदन केले. त्या अहवालामध्ये डॉल्फिनच्या फुफ्फुसामध्ये पाणी साठल्याचे आढळले आणि त्याच्या फुफ्फुसावर अनेक छिद्रंदेखील पडलेली होती, अशी माहिती वनपाल सावंत यांनी दिली. आंजर्ले किनाऱ्यावर वाहून आलेले मृत डॉल्फिन एक ते दोन महिन्यांचे पिलू असल्याचा अंदाज सागरी जीवशास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. त्याच्या तोंडात अडकलेले प्लास्टिकचे रिळ हे मासे पकडण्याच्या जाळीचा भाग असल्याचे पुढे आले आहे.
तसेच जाळ्यामध्ये गुरफटल्याच्या खुणा डॉल्फिनच्या शरीरावर पाहायला मिळाल्या. डॉल्फिन हा सस्तन प्राणी असल्यामुळे त्यांना हवेतून श्वास घ्यावा लागतो. जाळ्यात अडकून त्यात गुरफटल्याने पाण्यात बुडून या डॉल्फिनच्या मृत्यू झाल्याची दाट शक्यता आहे, अशी माहिती वन विभागाकडून देण्यात आहे. दरम्यान, महाराष्ट्राच्या सागरी परिक्षेत्रामध्ये 'इंडियन ओशन हम्पबॅक डॉल्फिन' ही प्रजाती प्रामुख्याने आढळते. त्यांच्या पिलांना वासरू असे म्हटले जाते. आंजर्ले किनारी सापडलेले ते पिलू वासरू असल्याचेही वन्यजीव संशोधकांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.