Konkan News esakal
कोकण

कृष्णाची जीवनगीता! 'मुंबादेवीने ती पोर माझ्या संगती पाठवली नसती, तर मी आज बी मुंबईतच असतो'

मुंबादेवीनेच ती पोर माझ्या संगती पाठवली नसती तर मी आज बी मुंबईतच असतो.

सकाळ डिजिटल टीम

-राजा बर्वे, चिपळूण

हलाखीच्या परिस्थितीत मोठा झालेला कृष्णा, पाच सहा भावंडांच्या पोरवड्यात वाढलेला कृष्णा (Krishna), शिक्षण जेमतेम सातवी झाल्यावर बुद्धिमान असून न शिकलेला कृष्णा, अन्नाला तरी लागावे म्हणून बापाने पुतण्यासोबत मुंबईत धाडलेला कृष्णा, ताडदेवच्या एका झोपडीत रहात तिथल्याच हॉटेल बरखामध्ये मोरीवर ५ वर्षे काम करणारा कृष्णा.

जवळच्या फोरास रोडवर अर्धवट वयात चहा, भजी वडे पार्सल घेऊन जाता येता घिरट्या घालणारा कृष्णा आणि अखेर मुंबई (Mumbai) आपली नाहीच, इथे आपल्याला भविष्य नाही अशी आयुष्याला एका प्रसंगातून अकस्मात मिळालेल्या कलाटणीने जाणीव झाल्यावर तशी मनाशी खूणगाठ बांधून परत गावाला आलेला आणि त्यानंतर पुढच्या २५-३० वर्षात मेहनतीने सधन झालेला कृष्णा अशी सारी कृष्णाची रूपे मला उलगडत गेली.

चिपळूणपासून सुमारे २०/२५ मैलावरचे गाव..काळ सुमारे १९९०-९२ चा. वाहतुकीची साधने म्हणजे फक्त रोज एक उलट सुलट धावणारी चिपळूण- मूर्तवडे ही बस. अनेक गावांत सकाळी वस्तीची गाडी शहराकडे जायची आणि संध्याकाळी शहरातून वस्तीला यायची अशी एकच फेरी. शहरात कामाला जाणारी माणसे सकाळी जाऊन कामे उरकून संध्याकाळी परत येत असत. एकदा ही गाडी चुकली तर दोनच पर्याय, एक चालत जाणे किंवा जाणे रद्द करणे. त्या गावातल्या शाखेत कधी डेप्युटेशनवर जायची वेळ आली तर मी देखील याच बसचा वापर करत असे. बसला थोडा उशीर आणि बँक (Bank) वेळेत सुरू नाही झाली तरी लोक देखील कुरकुर करत नसत.

एक दिवस असाच १५-२० मिनिटे उशीर झाला. मी तेव्हा कॅशियर असल्यामुळे कॅश सेफची एक किल्ली मॅनेजर आणि एक माझ्याकडे. गणपतीचा हंगाम त्यामुळे बँकेत आलेल्या ग्राहकांमध्ये दोन तीन मुंबईकर चाकरमानी हॉलमध्ये आले असावेत. ‘लोकांना वेळेची किंमत नाही, एका माणसामुळे पन्नास लोकांचा वेळ फुकट जातो याचं कोणाला किंमत पडलीच नाही’ अशा आशयाची त्यांची बडबड सुरू होती आणि ती अर्थात आमच्यासाठीच होती. ‘बारक्या, जमिनीतना वर आलास हितं, मोठा झालास हितं, काल परवा मुंबईत गेलास नि लगेच शानपती कराया लागू नको, उद्या तुम्ही चाकरमानी जाल मुंबईत भांडी घासाया निगून आनि आम्हाला हितं सालभर कामा करायची हायेत’.. तो जो कोणी बारक्या होता तो जरा वरमला आणि मग शांतता पसरली.

मी देखील सर्वानाच उद्देशुन हॉलमध्ये एक सॉरी सोडून दिलं आणि कामाला लागलो. पण तरीदेखील हा आमचा कैवार घेणारा नेमका माणूस कोण याचे कुतूहल मनात कायम होते आणि त्याचे उत्तर मात्र त्यानंतर मिळाले ते जवळजवळ वीस वर्षांनी जेव्हा मी त्याच शाखेत मॅनेजर म्हणून रुजू झालो, त्यानंतर महिन्याभरातच. ‘साहेब, आठवण हाय का, तुम्हाला एकदा आमच्या एका शाण्या चाकरमान्याने उशीर झाला म्हणून बोलाया लागल्यावर मी त्याला झापला होता, साले मुंबईत आयुष्यभर हाटेलात भांडी घासतात आणि हिकडं आलं की गमजा करतात’. आपली ओळखच अशी करून देत कृष्णा माझ्यासमोर बसला होता. आज तो शाखेचा चांगला ग्राहक होता. मलाही तो मागचा प्रसंग आठवला, नंतर थोड्याच गप्पानंतर आमची छान मैत्री झाली ती अगदी आजपर्यंत.

सावळा वर्ण, सहा फुटाला स्पर्श करणारी उंची, भव्य कपाळ, काळी पॅन्ट आणि सफेद बुशशर्ट, डोळ्यात हुशारी, व्यवहार चातुर्य आणि बुद्धीची चमक, चोख हिशोबी, सडेतोड स्वभाव, कुठल्याही व्यासपीठावर जाऊन आत्मविश्वासाने बोलण्याची, आपले मत ठामपणे मांडण्याची हातोटी हे सारे कृष्णाचे गुण मी नंतरच्या तीन चार वर्षात अनुभवले आणि शिक्षणानेच माणूस शहाणा, सुसंस्कृत आणि यशस्वी होऊ शकतो या माझ्या धारणेला कृष्णाने खोटं ठरवलं. "साहेब, लहानपणी लै गरिबी बघितली, बापाचा मार खाल्ला, मोरीवर पाच वर्षे काम करून हात पाय कुजवून घेतले, म्हेनत केली, मुंबईची चव पण घेतली पन कधी तिथं रमलो नाय..आयुष्यात कोणताच व्यसन नाय केला..फक्त एक पैसा कमवायचा व्यसन धरला. गावात परत आलो. कातभट्टी घातली. पार आसामात जाऊन काथ विकला. लै संकटात गेलो, परत उभा रहालो आणि आज सहा काताच्या भट्ट्या लावतो. अजून मी हॉटेलातली मोरी सोडली नसती आणि गरिबीने मला सोडली नसती.

‘कृष्णा शेठच्या घरी एक दोनदा गेलो. गावात छोटेसे पण देखणे घर बांधलंय. समोर एक गणपती, शारदा देवी आणि एक अनोळखी असा देवीचा असे तीन मोठे फोटो लावलेले त्याला ताजे हार घातलेले. ‘शेठ, हा तिसरा फोटो कोणाचा आहे?’ मी सहज विचारलं. "साहेब, ती एक लै मोठी स्टोरी आहे. मुंबईत बरखा मध्ये मोरीवर होतो तेव्हाची. रोज रातच्याला ९ वाजता जरा मोकळा व्हायचो. कधी सुटी मिळाली तर जवळ मुंबादेवीच्या मंदिरात जायचो. लय रडायला यायचं. ''काय सालं नशीब आपलं'' असं म्हणून लै रडायचो.

एकदा असाच मंदिरात बसलो होतो. फोरास रोडवरची एक बंगाली बाई, मूनमून तिथं आली होती. सोबत तिची चौदा पंधरा वर्साची मुलगी सबा पण होती. मी चहा नाश्ता घेऊन जायचो तिच्याकडे म्हणून माझी बी वळख होती तिच्याशी. मला तिथं बघितल्यावर, काय वाटलं माहीत नाही पण मूनमून माझ्याजवळ आली. तिला नुकत्याच वयात येणाऱ्या पोरीच्या भविष्याची काळजी भेडसावत असावी. मला बोलली, ‘किशन, तू गाव कब जायेगा रे, साथ मे बच्ची को लेके जायेगा क्या कुछ दिन के लिये? तेरे घरमे रख , मै बादमे वहिंसे इसकू मेरे गाव भेजनेका इंतजाम करूंगी’. मूनमूनने माझ्या खिशात शंभरची नोट कोंबली. त्या मुंबादेवीच्या देवळात दोन असहाय्य माणसांची भेट झाली होती. मूनमून त्या गलिच्छ चिखलात रुतली होती आणि मी गरिबी आणि लाचारीच्या विळख्यात सापडलो होतो. माझं वय तेव्हा १५-१६ वर्षाचं. अकलेचा पत्ता नव्हता. पण पोरगी पण मस्त दिसत होती.

त्याही परिस्थितीत माझ्या मनात काहीतरी मस्त वाटलं. मी नाही तर नाही पण या पोरीला आपण वाचवूया असं मनात ठरवून मी तिला घेऊन गावी आलो. घरी एकच बोंबाबोंब. मला काठीने बापाने बदडला.‘कुटना ही पोर आणलीस.अजून मिसरूड धड नाई फुटली तुला आणि ही थेरं?’.मला काही कळेनासं झालं. ती अजाण पोर पण रडायला लागली.‘किशन ने कुछ नई किया है मेरे साथ, मेरी मा ने इस्के साथ भेजा है मेरेकू’. काय नंतर झालं म्हायती नाय, पर थोड्या दिवसांनी मूनमून एका बाप्यासोबत आली आणि पोरीला घेऊन गेली, तिथना माझी मुंबई जी बंद झाली ती कायमची. पन मुंबादेवीनेच ती पोर माझ्या संगती पाठवली नसती तर मी आज बी मुंबईतच असतो. म्हणून मग नंतर मी मुंबईत गेलो, मुंबादेवीचा फोटो फ्रेम करून आणला आणि तिनेच मला आयुष्य जिंकून दिलन म्हणून रोज आता हार घालतो तिला. असे असंख्य किस्से कृष्णा मला सांगत असे.

(लेखक कोकणवर मनस्वी प्रेम करणारा व कोकण टिपणारा आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT