रत्नागिरी, सिंधूदुर्ग, रायगड, कर्नाटक (Karnataka Hapus Mango), तामिळनाडूसह केरळमधून आंबा विक्रीसाठी येत आहे.
रत्नागिरी : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Mumbai Krushi Utpanna Bazar Samiti) सोमवारी (ता. १५) आणि बुधवारी (ता. १७) आंब्याची विक्रमी आवक झाली. दोन्ही दिवशी एक लाखाहून अधिक पेट्या आंबा विक्रीसाठी मार्केटमध्ये दाखल झाल्या आहेत. त्यामध्ये कोकणातील हापूसच्या (Konkan Hapus) ८५ हजार ५६० आणि ६४ हजार ६५६ पेट्यांचा समावेश आहे. या आठवड्याच्या सुरवातीला कोकणातून पावणेतीन लाख पेट्या गेल्याचे वाशी येथील बाजार समितीमधून सांगण्यात आले.
बाजार समितीच्या फळमार्केटमध्ये आंब्याचे राज्य सुरू झाले आहे. रत्नागिरी, सिंधूदुर्ग, रायगड, कर्नाटक (Karnataka Hapus Mango), तामिळनाडूसह केरळमधून आंबा विक्रीसाठी येत आहे. या हंगामातील सर्वाधिक आवकची नोंद सोमवारी झाली. फेब्रुवारीपासून पहिल्यांदाच १ लाख पेट्यांचा टप्पा ओलांडला आहे.
सोमवारी मध्यरात्रीपासून ते सायंकाळपर्यंत कोकणातून ८५ हजार ५६० व इतर राज्यांतून ४२ हजार ८५० अशा एकूण १ लाख २८ हजार ४१० पेट्यांची आवक झाली. आवक वाढल्यामुळे बाजारभावही कमी झाले आहे. मंगळवारी (ता. १६) ८८ हजार पेटी तर पुन्हा बुधवारी १ लाख २ हजार ८१३ पेटी आली. त्यातील ६४ हजार ६५६ पेट्या हापूसच्या असून, ३८ हजार १५७ पेट्या इतर राज्यातील आहेत.
कोकणातील बागायतदारांकडून मोठ्या प्रमाणात आंबा विक्रीला पाठवला जात असला तरीही हा जोर मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात कमी राहील, असा अंदाज आहे. उष्मा वाढल्यामुळे आंबा लवकर तयार होत आहे. उन्हामुळे तयार झालेल्या फळाची तोड केली जात आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
नागरिकांना जूनअखेरपर्यंत आंबा उपलब्ध होणार आहे. आंब्याचे दरही नियंत्रणात असल्यामुळे आंबाखरेदीसाठी हीच योग्य वेळ असल्याचे मतही व्यक्त केले जात आहे. याबाबत बाजार समितीचे संचालक संजय पानसरे म्हणाले, आंब्याची आवक वाढल्यामुळे दर स्थिर ठेवण्याचे आव्हान आहे. त्यामुळे यंदा नवनवीन बाजारपेठा शोधत आहोत. पंजाब, राजस्थानसह, पश्चिम बंगालमधील काही भागांमध्ये आंबा विक्रीसाठी पाठवण्यात आला आहे.
कोकणच्या हापूसला बाजार समितीमध्ये २०० ते ८०० रुपये डझन दर मिळत आहे. किरकोळ मार्केटमध्ये हापूस ४०० ते १२०० रुपये डझन दराने विकला जात आहे. कर्नाटकमधील हापूससदृश आंबा ७० ते १३० रुपये किलो, बदामी ४० ते ६०, तोतापुरी २५ ते ३०, लालबाग ३० ते ६०, गोळा ३५ ते ४० रुपये किलो दराने विकला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.