Konkan News esakal
कोकण

Konkan News : दौलतदादाच्या आयुष्याचं चीज झाल्यासारखं वाटलं आणि नकळत डोळे पाणावले!

सकाळ डिजिटल टीम

-राजा बर्वे, परशुराम

काही माणसांचे जन्माला येणे, जगणे, आयुष्य (life) जगून निघून जाणे हेच एक मला कायम पडलेले कोडे आहे. आजच्या आत्मकेंद्रित जगातली नवी पिढी बघताना मला दौलतदादा सतत आठवत राहतो. जन्माला कधी, कसा, कुठे, कशासाठी या प्रश्नांची उत्तरे माहीत नसलेला दौलत एकाच घराशी, त्यातल्या माणसांशी इतकी घट्ट नाळ आयुष्यभर जोडून राहिला, एका मर्यादित परिघात फिरत राहिला.. आणि हे करत असताना जगाच्या परिघात स्वतःला सामावून घेत आपल्या परिघात जगाला ओढण्याचा प्रयत्नदेखील त्याने कधी केला नाही.. आणि म्हणूनच दौलतदादा, आयुष्यात फार काही भरीव न करता निघून गेला तरीही कायमचा लक्षात राहिला.

१९७६-७७चा काळ. आमचं बिऱ्हाडं तेव्हा चिपळूणला (Chiplun) होतं आणि मी कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात शिकत होतो. चिपळूणच्याच दक्षिणेला एका मळा या छोट्या वसाहतीत आमचं भाड्याचं घर होतं. अगदी तुरळक जुनी घरे. प्रत्येक घरामागे खूप जुनी आंबा, कोकम, रिंगी, काजू आणि सागाची झाडे आणि त्या पलीकडून वहाणारी शिवनदी. प्रत्येकाच्या परड्यात विहीर आणि नदीचा प्रवाह जवळ असल्याने खूप पाणी.. परीक्षा जवळ आली की, आम्ही दुपारी उन्हाळा असह्य झाला की, मागच्या गर्दझाडी आणि नदीवरून येणाऱ्या थंड वाऱ्यात अभ्यासाला जायचो.

नेसूला आखूड पंचा, वर वकिलांचीच जुनी बंडी किंवा कबजा, डोक्याला कायम मुंडासे, कानात कधीकाळी घातलेले नवसाचे चांदीच्या तारेतले दोन दोन कसलेतरी रंगीत मणी आणि मध्ये एक केशरी पोवळे असलेले डूल, कपाळाला शुभ्र टिळा, गळ्यात तुळशीची माळ असा दौलतदादा मनाचादेखील तसाच शुभ्र आणि निर्मळ.. रोज झोपायला गोठ्यात आला की, अर्धा तास न चुकता त्याच्या घोगऱ्या तरीही गोड आवाजात कसलीतरी अगम्य भजने म्हणत असे.. त्याचा जन्म, जग, जीवन आणि दिनक्रम हा चितळेवकील आणि त्यांचे घर या परिघाबाहेर कधी गेला नाही. गोठ्यात डास, माश्या, चिलटे, गोचिड असे अनेक प्राणी गुरांच्या पाठीवर आणि अंगावर सुखेनैव संचार करत तसे ते दौलतच्या अंगावर, अंथरूणावर आणि बाजल्यावरदेखील करत; पण दौलत झोपताना रोज गोमूत्र अंगावर चोपडून झोपत असे. त्यामुळे हे असले प्राणी त्याला एकतर त्रास देत नसत किंवा दिवसभराच्या दमणुकीने तो त्रास त्याला कळत नसावा.

दौलतदादाचं प्रेम आणि आकर्षण मला का वाटे याला अनेक कारणे होती. त्यात त्याचा कायम हसतमुख आणि निरागस चेहरा, सतत काम करण्याची प्रवृत्ती, गोड आवाजातली त्याची रात्रीची भजने, बोलण्यातलं आर्जव या गोष्टी त्या वयात जाणवत होत्या नव्हत्या; पण दौलतच्या काही गोष्टी मात्र मला खूप आकर्षित करत. दौलत गुरे घेऊन रानात जाई तेव्हा येताना प्रत्येक सीझनमध्ये येणारी वेगवेगळी करवंदे, तोरणे, आटके, चिंचा, आवळे, चारोळी, बिब्ब्याची बोंडे, हसोळी, उंबर, पेंडखळी असा मेवा मला न चुकता आणून देत असे. इतका निर्व्याज माणूस मी आजतागायत पाहिला नाही. एकदा खेळताना माझ्या पायात कळकीचा काटा घुसला तर दौलतने माझ्या जखमेवर बिब्ब्याचे तेल भरून शेकवला आणि दोन दिवसात मला खडखडीत बरे केले.

एक दिवस असाच अचानक वकिलांच्या मुलाचा फोन आला, ‘राजाभाऊ, आज सकाळी आपला दौलत गेला. तडक चितळे वकिलांचे घर गाठले. दौलतचे रक्ताचं असं कोणीच नव्हतं; पण तरीही ते घर आणि शेजारची पाच-सहा घरं दुःखात बुडाली होती. जणू त्यांच्या घरातलाच कर्तासवरता पुरुष निघून गेला होता. वकिलांच्या कुटुंबाने दौलतचा मायेने सांभाळ केला होता. सगळे अंत्यसंस्कारदेखील रितसर केले. दशक्रिया विधीला गेलो तर गोठा लख्ख केलेला, दौलतची सुंभाची बाज परत विणून नीट ठेवलेली, त्याला एक छानसा हार घातलेला आणि गोठ्यावर दौलत अशी नावाची पाटी झळकत होती.. खरंच होतं ते, दौलत साठ-पासष्ठ वर्षे त्या गोठ्यात होता तोवर ती पशुधनाची दौलत कायम ओसंडून वाहात होती..मला दौलतदादाच्या आयुष्याचं चीज झाल्यासारखं वाटलं आणि नकळत डोळे पाणावले.

(लेखक कोकणवर मनस्वी प्रेम करणारा व कोकण टिपणारा आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT