angry child sakal
कोकण

बालक-पालक : हट्टी, रागीट मूल व शिस्त

सहा वर्षाच्या वैभवचे आई-वडील सांगत होते तो कुटुंबावर सध्या सत्ता गाजवत होता. वैभवच्या रागीट व हट्टी वागण्यामुळे त्याचे आई-वडील मेटाकुटीला आले होते.

सकाळ वृत्तसेवा

- श्रुतिका कोतकुंडे, सजग स्वास्थ्य क्लिनिक, चिपळूण sajagclinic@gmail.com

सहा वर्षाच्या वैभवचे आई-वडील सांगत होते तो कुटुंबावर सध्या सत्ता गाजवत होता. वैभवच्या रागीट व हट्टी वागण्यामुळे त्याचे आई-वडील मेटाकुटीला आले होते. त्याला हवं ते न मिळाल्यास तो ओरडे, किंचाळे कधी कधी बोचकारे. यामुळे शाळेतूनही त्याच्या तक्रारी यायला लागल्या होत्या. काय होती त्याची समस्या ....

लहान मुलांमध्ये हट्ट करणे ही सर्वसामान्य वर्तन समस्या आहे. काही मुलांमध्ये घरातील मोठ्यांचे न ऐकणे, रागावणे, ओरडणे, किंचाळणे, तोडफोड करणे हेही दिसून येते. हे बऱ्याचदा अपुऱ्या शिस्तीमुळे, असमतोल पालकत्वामुळे घडू शकते. पालक घरातील नियमांबद्दल ठाम नसल्यास किंवा सातत्य नसल्यास मुलांना त्यांच्याकडून काय वागणे अपेक्षित आहे ते कळत नाही तसेच आई-वडिलांमधले नैराश्य असल्यास किंवा पालक तापट, नकारात्मक असल्यास, पालकत्वाबद्दल एकमत नसल्यास, पालक योग्य प्रकाराने प्रेम दाखवू न शकल्यास मूल गोंधळून जाते व हा गोंधळ त्याच्या वागण्यातून दिसतो.

प्रमाण : १२ वर्षाखालील मुलांमध्ये बघितल्यास दहात एका मुलांमध्ये ही समस्या आढळून येते तसेच मुलांमध्ये मुलींपेक्षा हट्टी वागणे जास्त प्रमाणात आढळते. क्वचित हट्टीपणासोबत इतर गंभीर वर्तन समस्याही आढळू शकतात, जसे श्वास कोंडणे, आत्महिंसा व अतिचंचलता. त्यामुळे या समस्येवर लवकर हस्तक्षेप करणं मुलाच्या पुढच्या आयुष्यासाठी अतिशय महत्वाचे आहे कारण, दुर्लक्ष केल्यास हट्टपणा वाढत जातो व प्रौढपणी त्याचा वाईट परिणाम मुलाच्या नात्यांवर, आजीविकेवर, व जीवनस्तरावर होऊ शकतो.

लक्षणे - बऱ्याचदा हट्टीपणा मूल शाळेत गेल्यावर आढळून येतो जिथे नियमांचे पालन अनिवार्य असते. असे असले तरीही तीन वर्षाच्या मुलांमध्ये ही लक्षणे दिसू शकतात. यात प्रामुख्याने मुलाला पटकन राग येणे, मुलाचा रागावर नियंत्रण न राहणे, मूल किंचाळणे, आदळआपट करणे, मारणे बोचकारणे, मोठ्यांशी वाद घालणे, मोठ्यांचा अनादर करणे, नियम न पाळणे, मुद्दाम इतरांना चिडवणे अशी लक्षणे आढळतात. वास्तविक अशा मुलांची स्वप्रतिमा कमकुवत असते, त्यांची मनस्थिती पटकन बदलते, ते लवकर नाराज होतात. योग्य उपायाअभावी मोठेपणी या मुलांमध्ये गुन्हेगार प्रवृत्ती संभवते जसे खोटे बोलणे, प्राण्यांशी-माणसांशी हिंसक वागणे, इतरांचे शारीरिक व लैंगिक शोषण करणे, कायद्याचे उल्लंघन, तोडफोड करणे, चोरी करणे इत्यादी.

पारिवारिक पार्श्वभूमी - मूल हट्टी बनण्यामागे काही महत्वाची कारणे म्हणजे

१) अपुरे पालकत्व - ज्या मुलांवर पुरेशी देखरेख नाही, पालक अतिकडक अथवा अतिसूट देणारे, वागणुकीत सातत्य नसणे, खूप नकारात्मक असणे, प्रेमाचा अभाव इ. मुळे मूल हट्टी, रागीट, बंडखोर बनू शकते.

२) आई-वडिलांमध्ये/ घरातील मोठ्यांमध्ये विसंवाद - घरात ताण, वाद असल्यास, मुलाला सुरक्षित वातावरण न मिळाल्यास मुलामध्ये वर्तनसमस्या उद्भवू शकते

३) कौटुंबिक हिंसाचार - शारीरिक अथवा लैंगिक छळ होत असल्यास मूल स्वरक्षणासाठी हट्टी वागू शकते.

४) घरात टोकाची गरिबी असल्यास, मुलाच्या प्राथमिक गरजा पूर्ण होत नसल्यास, आई-वडील व्यसनी असल्यास असे दुर्लक्षित मूल हिंसक वागू शकते.

निदान : पालकांशी, शिक्षकांशी चर्चा व मुलाखतीतून मूल असे का वागते, कधी वागते, त्याचे ट्रिगर काय आहेत, त्याच्या विस्फोटाची पूर्व लक्षणे, आई-वडिलांचे पालकत्व कसे आहे, मुलाचे वागणे बदलावे म्हणून आई-वडील काय प्रयत्न करत आहेत तसेच परिवारातील मोठ्यांमध्ये एकवाक्यता आहे का या सर्व बाबी महत्वाच्या ठरतात.

उपाय - पालकत्व कौशल्य शिक्षण

१) पालकांनी मुलांशी योग्य संवाद करावा. मुलाचा राग शिगेपर्यंत जाण्यापासून रोखावा, चांगल्या वागण्यास प्रोत्साहन द्यावे व चुकीचे वागणे नकळत रोखावे, मुलाचे लक्ष हुशारीने वळवावे.

२) विस्फोट होणार असेल तर त्या परिस्थितीतून लवकरात लवकर बाहेर पडावे.

३) मुलाशी रागाचा विस्फोट झाल्यास शांत स्वरात संवाद साधावा व आपल्या भूमिकेवर ठाम राहावे.

४) विस्फोटानंतर पुन्हा नंतर विस्फोट झाला तरी आपली भूमिका तीच राहील हे पालकांनी मुलाला प्रेमाने पण ठामपणे समजवावे.

५) मुलांच्या चांगल्या वागण्याकडे लक्ष द्यावे व कौतुक करावे.

६) मुलांनी घरातील इतर नियम मोडल्यास ठाम राहून नियम राबवावे.

७) संपूर्ण परिवाराचे एकत्रित प्रयत्न महत्वाचे. घरातील मोठ्यांनी मुलांशी वागण्यात सातत्य ठेवावे, घरातील सर्वांमध्ये जेव्हा सुसंवाद असेल तेव्हा मुलाला नियमांची चौकट पाळणे सोपे जाते. मुलांना जिथे सहृदय पोषक वातावरण मिळते तिथे मुलाला भावानांचे नियमन सोपे जाते. वैभवच्या संपूर्ण कुटुंबाचे समुपदेशन केल्यावर हळूहळू त्याची वर्तणूक सुधारू लागली व शाळेतही तो सर्वांना आवडू लागला.

(लेखिका मनोविकार व मानसोपचारतज्ज्ञ आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT