कामगार कल्याणाचा, भल्याचा विचार करणारा उद्योजक जर असेल तर तो सर्वप्रथम कामगारांच्या हिताचाच विचार आधी करतो.
-प्रसाद अरविंद जोग theworldneedit@gmail.com
कृतज्ञ असणे, केलेल्याची जाण असणे, उपकृत असणे, एखाद्या प्रसंगी कुणाचे आभार मानायला, व्यक्त व्हायला कमीपणा न वाटणे ही सर्व लक्षणे चांगल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देतात. कृतज्ञ असणे किंवा कृतज्ञता हे गुण व्यक्तीचा नम्र व मनमिळाऊ स्वभाव दर्शवत असतात. उद्योग साकारताना, उद्योग नावारूपाला आणताना उद्योजकांची मानवी मूल्य, आंतरिक व्यक्ती संबंध प्रस्थापित करण्याची क्षमता व व्यवस्थापन कौशल्ये उपयोगी पडत असतात.
उद्योजकाला (Businessman) सर्व संसाधनांचा योग्य वापर करून आपल्या उद्योगाला आकार द्यायचा असतो. विविध घटकांच्या, मनुष्यबळाच्या उपलब्धतेबद्दलही उद्योजकांनी कृतज्ञ हे असायलाच हवे. उद्योग ज्या विविध घटकांनी नावारूपाला येतो त्यातील सर्वात महत्त्वाचा व उद्योग व्यवसाय अविरतपणे चालू राहण्यासाठी अत्यंत आवश्यक असणारा घटक म्हणजे उद्योजकाच्या आस्थापनेत असणारे कामगार (Labor) किंवा कर्मचारी.
आपल्या आस्थापनेत योग्य मनुष्यबळ दाखल करून घेणे, त्यांना तयार करणे, त्यांना प्रशिक्षित करणे, त्यांच्याकडून योग्य ते काम ठराविक काळात काढून घेणे, त्यांना सुखीसमाधानी, आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करणे, त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन योग्यवेळी त्यांना सन्मानित करणे, त्यांच्याविषयी मनात कृतज्ञता भाव ठेवून त्यांना ते किती महत्त्वाचे आहेत, हे दर्शवून देणे अशा गोष्टी उद्योजकाला आपल्या उद्योग व्यवसायासाठी यशस्वी मनुष्यबळ व्यवस्थापनाच्यादृष्टीने कराव्या लागतात.
सगळ्याच उद्योजकांना मनुष्यबळ व्यवस्थापनाची परिपूर्ण माहिती असतेच असे नाही. त्यांच्यादृष्टीने मनुष्यबळ म्हणजे उत्पादनपूर्ती करण्यासाठी आवश्यक असणारे संसाधन; पण कोणतेही कार्य करताना मनुष्यबळास प्रेरित, प्रोत्साहित व सन्मानित केले तर त्यांच्याकडून उत्पादनाची उद्दिष्टपूर्तता लवकर होऊ शकते, हे त्यांच्या लक्षात येत नाही. आपल्या आस्थापनेत एक कर्मचारी असो अथवा शंभर एक उद्योजक म्हणून आपल्या आस्थापनेत काम करणाऱ्या प्रत्येकाशी संवाद साधून त्यांच्या गरजा नक्की काय आहेत, त्यांची वैयक्तिक आयुष्यातील ध्येयं काय आहेत, हे जाणून घेऊन त्यांच्याविषयी आदर, कृतज्ञता, आपुलकी उद्योजकांनी व्यक्त करायला शिकायलाच हवे. कारण, समाधानी, प्रेरित कर्मचारी हेच उद्योजकाला उद्योग, व्यवसाय पुढे घेऊन जाण्यासाठी आत्मिक बळ देत असतात. एखादी कार्यपूर्ती कामगारांच्या सहकार्याने, कष्टाने वेळीच पूर्ण होऊ शकते.
याची उद्योजकाला योग्य जाण असणे अपेक्षित व आवश्यकही असते. कृतज्ञता भाव का हवा? अजूनही कोकणात ग्रामीण भागात, निमशहरी भागात आपण काही जुनी उपाहारगृहे, किरणामालाची दुकाने, छोटे कारखाने, कपड्याची दुकाने, बांधकाम व्यावसायिक यातील मालक-कामगार संबंध बघितले तर त्यांच्यात चांगले संबंध विकसित झालेले दिसून येतात. वीस-पंचवीस वर्षांहून सुद्धा जास्त वर्ष प्रामाणिकपणे काम करणारा एकनिष्ठ कामगार या व्यापाऱ्यांना, उद्योजकांना लाभला याचे कारण दोघांमध्ये असणारा समंजसपणा, कृतज्ञपणा, स्नेह व परस्परांविषयी असणारे ममत्व. उद्योजकतासुद्धा संक्रमण अवस्थेतून जात असते. बदलत्या काळात कामगार-मालक संबंध सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न उद्योजकांना करावे लागणार आहेत.
उद्योजकता विकास घडवून आणत असताना बदललेली जीवनशैली, बदलते कामाचे स्वरूप, शहरांविषयी असणारे आकर्षण, कामगारांना काम करण्यासाठी उपलब्ध असलेले विविध पर्याय यामुळे स्टार्टअप्स, छोटे उद्योग यांना आहे ते मनुष्यबळ टिकवून ठेवणे गरजेचे वाटते आहे. यासाठीच मालक म्हणून उद्योजकांनी आपल्या कामगारांविषयी कृतज्ञ असायलाच हवे. कामगार हे कोणत्याही संस्थेचे, आस्थापनेचे अविभाज्य अंग असतात त्यांची काळजी घेणे हे उद्योजकाचे कर्तव्यच ठरते. येणाऱ्या काळात कामगारांना आपल्या आस्थापनेशी एकनिष्ठ ठेवायचे असेल तर उद्योजकांनी आपली मानसिकता व कार्यशैली बदलण्याची गरज आहे.
या स्पर्धात्मक, आवाहनात्मक जगात नोकरीची, कामाची, पैशांची, पदाची, हुद्द्याची गरज जशी कर्मचारी, कामगार, नोकरी करण्यास इच्छुक नवउमेदवार यांना आहे तशीच कामगारांच्या कौशल्याची, हुशारीची, वेळेची, श्रमांची, सृजनशीलतेची, अनुभवाची गरज एक उत्पादनकर्ता किंवा सेवा पुरवठादार, विक्रेता, व्यापारी म्हणून स्वतः उद्योजकालाही आहेच आहे. कुशल, अर्धकुशल कामगार, सहाय्यक किंवा कोणताही छोटा-मोठा कर्मचारी पूर्णक्षमतेने व एकनिष्ठतेने उद्योगाच्या ठिकाणी कार्यरत राहिल्यास उद्योजकाला दैनंदिन कामकाजात विशेष अडचणी उद्भवत नाहीत. आपल्या उद्योग व्यवसायासाठी आवश्यक असणारी निर्धारित उद्दिष्ट पूर्ती करण्यासाठी कोणत्याही अडचणी येत नाहीत.
कामगार कल्याणाचा, भल्याचा विचार करणारा उद्योजक जर असेल तर तो सर्वप्रथम कामगारांच्या हिताचाच विचार आधी करतो. कर्मचाऱ्यांच्या मानवीहित संबंधांचे रक्षण व्हावे व त्यांना भावनिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असल्याचे वाटावे यासाठी उद्योजकाचे वर्तन हे सौहार्दपूर्ण व सहिष्णू असायलाच हवे. कोणत्याही उद्योगांत किंवा व्यवसायात विविध व्यक्ती एकत्र येऊन काम करत असतात. त्यांचे कामाच्या ठिकाणी एकमेकांशी संबंध येत असतात. त्यांच्यातून त्यांचे वर्तन, वागण्याची पद्धत मालक म्हणून उद्योजकाला समजून येत असते. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या आस्थापनेत क्रियाशील असतात.
कर्मचाऱ्यांचे वर्तन नियंत्रित ठेवण्यासाठी त्यांच्या भावभावनांचे योग्य व्यवस्थापन होणे गरजेचे असते. कधी कधी आपण कामगार आहोत, आपल्याला कामाच्या ठिकाणी योग्य भाव मिळत नाही किंवा आपण करत असलेल्या कामांची कोणी उचित दखल घेत नाही ही नकारात्मक भावना जर चुकून कामगारांच्या मनात वाढीस लागली तर ते आपले अस्तित्व व महत्व लक्षात आणून देण्यासाठी आक्रस्ताळेपणा करू शकतात किंवा आक्रमक होऊ शकतात. हे टाळण्यासाठी उद्योजकाने कामगारांच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर करावा.
कर्मचारी किंवा कामगार प्रशिक्षण... (कृतज्ञता भेट किंवा ज्ञानाचे अद्ययावतीकरण) आपल्या उद्योगात कार्यरत असणाऱ्या मनुष्यबळाला प्रोत्साहित करण्यासाठी, त्यांचे कार्यमान सुधारण्यासाठी, त्यांना तंत्रज्ञानात होणाऱ्या बदलांना अवगत करून देण्यासाठी तसेच उत्पादनक्षमता वाढावी म्हणून तसेच आपल्या आस्थापनेत काम करणाऱ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व्हावा व त्यांची कार्यक्षमता वाढावी म्हणून उद्योजक कृतज्ञतेपोटी किंवा आस्थापनेची बदलती गरज म्हणून आपल्या कामगारांसाठी प्रेरणा प्रशिक्षण व कौशल्याधिष्ठित प्रशिक्षण आयोजित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू शकतात. यामुळे उद्योजक व कर्मचारी स्नेहसंबंध अधिक बळकट, अधिक सक्षम बनू शकतात.
जसे, मालक म्हणून किंवा उद्योजक म्हणून ते आपल्याशी कृतज्ञ आहेत, तर आपणही उद्योगाचं, मालकाचं भलं चिंतलं पाहिजे, हा विचार कामगारांच्या मनात दृढ होत जातो. कारण, सातत्यपूर्ण प्रशिक्षणामुळे, कामगारांची वैचारिक पात्रता विकसित होण्यास वाव मिळत असतो. आज १ मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन, मे दिन, महाराष्ट्र दिन, मराठी राजभाषा दिन आहे. या दिनानिमित्ताने कृतज्ञता हा गुण अंगी बाणवायचं ठरवूया व कामगारांच्या सहकार्याने, साथीने यापुढील औद्योगिक विकास कसा साधता येईल याचा विचार करूया. मानवी व औद्योगिक असे दोन्ही हितसंबंध जोपासणाऱ्या उद्योजकांची या महाराष्ट्राला, कोकणाला नितांत गरज आहे.
(लेखक उद्योगप्रेरणा प्रशिक्षक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.