सड्यावर फुललेलं इंद्र धनुष्य आपल्या सात रंगांनी झळकत असताना अश्याच रंगांचा तीबोटी खंड्या आपल्या दाट झाडांच्या, हरित वनांच्या अधिवासाचा त्याग करून कोकणातले ओढे, नाले, पऱ्ये इथे अचानक दिसू लागतो.
-प्रतीक मोरे, देवरुख moreprateik@gmail.com
पाऊस ग्रीष्माच्या उष्ण झळीना थोपवणारा, जलाच्या थंडगार शिडकाव्याने तापलेल्या कातळ सड्यांना सचेतन बनवणारा, सागराला उधाण आणणारा आणि सह्याद्रीच्या खोऱ्यातून (Sahyadri Valley) धावणाऱ्या कोरड्या ठाक पडलेल्या ओढे नाले नद्या यात पाण्याचा साठा करणारा, तर जंगलात तृषार्त होऊन भटकणाऱ्या जीवांची तृष्णा भागविणारा. अरबी सागराच्या उसळणाऱ्या लाटा आणि सह्याद्रीची कड्यांची रांग यांच्यात अंग चोरून बसलेली कोकण भूमी पावसासाठी नैऋत्य मोसमी वाऱ्यांवर अवलंबून आहे.
दक्षिण दिशेकडून उत्तरेकडे वाहणारे हे वारे मे महिना संपत आला की वेगाने वाहू लागतात. दूर समुद्रावरून येणारे हे वारे कोकणात (Konkan) नवचैतन्य तर आणतानाच अनेक बदल घडवून आणतात. याच वाऱ्यांचे आणि वातावरणात होणारे बदल पाहून पावसाचे अनेक अंदाज बांधले जातात.
तापणाऱ्या आणि गडगडणाऱ्या रोहिणी लागल्या की विजा चमकू लागतात. गेंदाचे आणि कोचाचे चेंडू सड्यावर सैरावैरा धावू लागतात. टिटवीची अंडी आणि पिलं या गेंदात त्याच्याच आकाराची तशीच दिसणारी अलगद लपून बसतात. चंडोलाची गाणी आणि आभाळनृत्य आता शिगेला पोहचलेली असतात. एखादा लावा उंच दगडावर उभा राहून आकाशाकडे डोकं करून ओरडत असतो. मृगाचे किडे म्हणून ओळखले जाणारे रेड वेलवेट माईट जमिनीखालून अचानक सर्वत्र दिसू लागतात आणि पाऊस येणार अशी सर्वात प्रथम बातमी देणारी पावश्याची पेरते व्हा पेरते व्हा अशी साद आसमंतात घुमू लागते.
Common Hawk cuckoo म्हणजेच पावशा पक्षी तसा भारतीयच. दक्षिण भारतात ते उत्तर भारत असे स्थानिक स्थलांतर करणारे पावशा याच दरम्यान त्यांच्या आवाजामुळे जाणवू लागतात, तर याच वाऱ्यावर स्वार होऊन काळ्या-पांढऱ्या रंगाचा तुरेवाला चातक मधूनच उडताना दिसतो. अगदी सुरुवातीला आफ्रिकेतून मोसमी वाऱ्यांच्या लाटेवर आरुढ होऊन हे चातक भारतात येत असावेत, असा समज होता, परंतु अलीकडच्या संशोधनात दक्षिण भारतात यांची रहिवासी लोकसंख्या आढळली आहे. पावसाची नांदी देणारे आणि उत्तरेकडे स्थलांतर करणारे हे ककू कुळातले पक्षी इथल्या उष्ण हवामानात आपली पिढी वाढवतात. अंडी देण्यासाठी दुसऱ्या पक्ष्यांच्या घरट्याची आवश्यकता असल्याने पावसाचा कालावधी यांच्यासाठी अनुकूल ठरतो.
पाऊस पडल्यानंतर वाढणारे कीटक आणि इतर जीवांचे प्रमाण यांना भरपूर खाद्याची उपलब्धता मिळवून देते. किंबहुना याच कारणामुळे येथील अनेक पक्ष्यांचे विणीचे हंगाम हे पावसाच्या प्रमाणावर अवलंबून असल्याचे आढळून येते. पावसामुळे इथल्या ओढे, नाल्यांमध्ये पाणी येते. कातळावर बावळ, डबकी पाण्याने भरून जातात. साचलेल्या पाण्यात बेडकं, मासे आणि इतर कीटक बहुसंख्येने दिसू लागतात. फुलपाखरे पतंग त्यांच्या खाद्य वनस्पती उगवल्याने सर्वत्र अंडी देतात आणि त्यांचे सुरवंट मोठ्या प्रमाणात या पक्ष्यांना त्यांच्या पिलांना खाद्याची उपलब्धता मिळवून देतात. दयाळ, शमा, पिंगळे, मैना असे ढोलीत अंडी देणारे पक्षी पावसाचा काळ अचूक जाणतात. तर गायबगळे, वंचक आपला नेहमीचा छदमवर्णीय पेहराव झुगारून देऊन लालसर तपकिरी विणीचा परिवेश धारण करतात.
सड्यावर फुललेलं इंद्र धनुष्य आपल्या सात रंगांनी झळकत असताना अश्याच रंगांचा तीबोटी खंड्या आपल्या दाट झाडांच्या, हरित वनांच्या अधिवासाचा त्याग करून कोकणातले ओढे, नाले, पऱ्ये इथे अचानक दिसू लागतो. गोळीच्या वेगासारखे उड्डाण, आणि मागून ऐकू येणारा त्याचा आवाज थक्क करणारा असतो. माती ओलसर झाली की काठाने बीळ खोदून हे तीबोटी खंड्या आपली अंडी देतात आणि पिलांना पाली, खेकडे, कोळी, चोपई, मासे असे नानाविध खाद्य आणून भरवतात. पाऊस संपेपर्यंत यांच्या एकाहून अधिक विणीसुद्धा पार पडतात आणि पाण्याची उपलब्धता जशी कमी होईल तसे आपल्या हरित वनांच्या प्रदेशात, पाण्याच्या उगमाकडे यांचे गमन होते. अशीच नऊ रंगांची उधळण असणारा पिट्टा श्रीलंका आणि दक्षिण भारताच्या जंगलातून विणीसाठी उत्तरेकडे सरकू लागतो. आंब्याच्या बागेत मोठमोठ्याने उमटणारे याचे आवाज पावसाची नांदी करून देतानाच एखादा पाहुणा आल्याची भावना निर्माण करून देतात.
वाढत्या पावसाबरोबर काड्या, पानं आणि वेलीचे धागे भिजून मऊ झाले की पिट्टा त्यांच्यापासून एखाद्या झाडाच्या बेचक्यात घरटे बांधतो. पिल्लांना जन्म देऊन पावसाळी पर्यटन करून हिवाळ्याच्या सुरुवातीला दक्षिणेकडे पुन्हा वाटचाल करतो. अशा रीतीने पाण्याच्या आणि खाद्याच्या उपलब्धतेनुसार पक्ष्यांचे होणारे स्थलांतर हे पक्षी अभ्यासकांच्या अभ्यासाचा आणि आवडीचा विषय राहिलेला आहे. सड्यावरसुद्धा हळूहळू फुलोरा येऊ लागतो, डबकी पाण्याने आणि जीवनाने भरून जातात, मग टिटव्या, पलोवर, बगळे, अनेक प्रकारची बदके, इतर पाणपक्षी सहभोजनाचा आनंद घेण्यासाठी प्रकटतात. मोनार्क आणि इतर माशिमारसुद्धा याच काळात घरटी बांधतात. कावळ्यांच्या घरटी बांधण्याच्या शैलीवर तर अनेक ठिकाणी पर्जन्य मानाचे प्रमाण ठरवले जाते. एकंदरीत कोकणातील पावसाचे चार महिने इथलं जीवन फुलवतात, पुढच्या काळासाठी खाद्याची सोय करून देणारे ठरतात आणि इथल्या भन्नाट जैव विविधतच्या स्वरूपाला आकार देतात.
सुरूच्या बनात घरटी बांधणारे समुद्री गरुड तर यामुळे सर्वाधिक बाधित झाले असावे, अशी शंका आहे. घरटी बांधण्यासाठी मोठी झाडे न उरणे आणि असलेली घरटी, पिल्ले पडणे यामुळे यांच्या संख्येवर विपरीत परिणाम होऊ शकतो. वादळाने अनेक झुडुपातली घरटी पडून गेली, पक्ष्यांच्या अनेक खाद्य वनस्पती तुटून पडल्या, कीटक, सरीसृपसुद्धा वादळाचे बळी ठरले, एकंदरीत वादळाने केलेल्या या नुकसानाचा पंचनामा होताना कठीण आहे. (क्रमशः)
(लेखक निसर्ग अभ्यासक आणि सह्याद्री संकल्प सोसायटीचे कार्यकारी संचालक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.