कोकण

Dhanwantari OPD : धन्वंतरीची ओपीडी

सकाळ डिजिटल टीम

‘सायेब, गुरांकडं गेली पोरगी आणि फशी पडली, कधी वर मान करून कुटबी जायाची नाय, आता बघा पाळी चुकली त्याला चार म्हयन झालं, कसं करावा आता?’.

-राजा बर्वे, परशुराम

धनु आणि शनिवार मंडळ.. त्या छोट्याशा गावात दर शनिवारी एकत्र येणारे ते सगळे हौशी सवंगडी म्हणजे माहितीचे एकेक गूगल प्लॅटफॉर्म होते..एकादा नवीन अनोळखी माणूस माझ्याकडे कर्ज मागायला आला तर खुबीने मंडळातल्या दोन चार लोकांजवळ अप्रत्यक्ष त्या माणसाची विचारपूस आणि प्रस्तावना केली की त्याची संपुर्ण कुंडलीच माझ्यासमोर येत असे आणि मग माझे काम सोपे होई. माझ्या मार्केटमधील चौकशीत धन्वंतरीचा रिपोर्ट कायम बिनचूक यायचा. कर्ज द्यायचे की नाही हे ठरवणे मग माझ्यासाठी सोपे होऊन जाई.

गावातल्या त्या शनिवार मंडळात सुमारे पंधरा वीस मेंबर होते. दर शनिवारी रात्री साडेनऊ वाजले की त्यातल्या दहा बारा लोकांची तरी पावले आपोआपच ज्याची पाळी असेल त्याच्या घराकडे वळत असत. त्यात व्यापारी, पर्यटन व्यावसायिक, भिक्षुक, पत्रकार, नोकरदार, शेती बागायतदार, खाजगी नोकरदार असे सगळ्या थरातले लोक होते. गाव लहान आणि त्यात बँकेच्या नोकरीमुळे माझा सर्वांशी नेहमीच संबंध येत असे. मी देखील एकटाच रहात असल्याने माझी त्या मंडळाचा स्थायी नसलो तरी मानद सदस्य म्हणून नोंद होती. महिन्या दोन महिन्यातून केव्हा तरी मी देखील तिथे जात असे. रात्री साडेअकरा बारा पर्यंत ही मैफल रंगत असे.. मेंढीकोट, झब्बू, रमी असे पत्त्याचे डाव पडत पण तरीही खेळापेक्षा त्यात विड्याकाड्या, क्वचित चिलीम, दर अर्ध्या तासाला चहा, गप्पा आणि भंकस अधिक असायची. धन्वंतरी यातलाच एक. शनिवार मंडळाचा अगदी आधारस्तंभ.. त्याचे खरे नाव धनु अंतरकर आहे हे कळायला मला बराच वेळ लागला..धनु आणि अंतरकर याचा संकोच करत तो आधी मंडळाचा आणि मग सगळ्या गावाचाच धन्वंतरी झाला होता. एकेक इरसाल अशी नावे ठेवणाऱ्या आमच्या कोकणातल्या लोकांच्या बुद्धिमत्तेचे मला नेहमीच कौतुक वाटते.

गावात एक प्राथमिक आरोग्य केंद्र होते. तिथे गेली वीस बावीस वर्षे परिचर या पदावर काम करणारा धनु जवळजवळ आता डॉक्टरच झाला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर नियमित असणे ही त्या काळात चैनीची गोष्ट होती. माझ्या बँकेच्या शाखेसमोरच थोडं पुढे हे आरोग्य केंद्र होते. खरं तर हे आरोग्य केंद्र की अनारोग्य केंद्र होते असा प्रश्न पडावा अशी केंद्राची अवस्था. शाळेच्या एका जुन्या दगडी इमारतीत हे तात्पुरते केंद्र होते. कायम स्वरूपी इमारत लवकरच होणारे असे गेली अनेक वर्षे तिथले लोक सांगत. परंतु अगदी अलीकडे अलीकडे ही इमारत झाली आहे. या केंद्राच्या एका अंधाऱ्या खिडकीच्या आत धनु कायम बसलेला असे. कर्मचाऱ्यांची पगार खाती आमच्या शाखेत वळवावीत यासाठी मी एकदा दवाखान्यात गेलो. बाहेर व्हरांड्यात बाकड्यावर चार पाच रुग्ण डॉक्टरांची वाट बघत बसलेले, पलीकडे जननी माता संगोपन केंद्राबाहेर काही गर्भवती महिला त्रासलेल्या आणि ओढलेल्या चेहऱ्याने बसलेल्या. सगळीकडे औषधे, स्पिरिट आणि इतर गोष्टींचा संमिश्र आणि उग्र असा वास भरलेला.. स्वच्छतेची वानवा. ''डॉक्टर आहेत का?'' अशी मी एका नर्सकडे विचारणा केली. ‘साहेब, सर नाहीयेत, मिटींगला दापोलीला गेलेत. तुम्ही अंतरकर सरांना भेटा’.. आतल्या बाजूने मी त्या खिडकी असलेल्या खोलीत गेलो आणि मला एका अजब माणसाचे प्रथम दर्शन झाले. तो हा धन्वंतरी.


निमगोरा वर्ण, उंची साडेपाच फूट, पोटाचा घेर अत्त्युच्च वाढीच्या पातळीवर येऊन थांबलेला, कुरळे विरळ केस, केंद्राच्या भिंतीवर आरोग्यविषयक अनेक भित्तीपत्रे लटकवावी तसे नाक आणि कानातून बाहेर आलेले केसांचे अमर्याद पुंजके, कधीकाळी फॅशन असलेली जुनी बेलबॉटम पॅंट, रेघांचा जुना कॉलर वर फाटलेला बुशशर्ट, समोरचा एक दात गायब, तिथे जीभ लावत बोलण्याची सवय, वय पन्नाशीच्या आत बाहेर पण साठीचा वाटावा असा हा धनु. फक्त जमेची बाजू म्हणजे चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि औषधांची खडानखडा माहिती. केंद्राच्या औषध भांडाराचा हा प्रमुख.

गावात कोणी आजारी असले की केंद्रामध्ये जायच्या ऐवजी लोक ''अंतरकर डॉक्टरांकडे'' घरीच जात. धनुचा हातगुण चांगला. फी कमी, बरीचशी औषधे Not for sale चा स्टॅम्प असलेली. गावातल्या प्राथमिक आरोग्य गरजा हा धनूच भागवत असे आणि अगदीच काही सिरीयस वाटले तर मात्र आपणहून, ‘बाबा हे आता माझ्या आवाक्याबाहेरचे आहे, हलवा आता दापोली किंवा पुण्यात किंवा मुंबईत’ असे योग्य वेळी सांगत असे. दवाखान्यात गेलात तर हा अबोल आणि घुम्या आहे असे वाटेल पण या धन्वंतरीच्या जिभेवर सरस्वती शनिवार मंडळात मात्र नृत्य करत असे. धन्वंतरी असला की ही शनिवार मैफल रंगत असे. ब्रिस्टॉल सिगारेटचा एक खोल झुरका घेऊन धन्वंतरी सुरवात करी, ‘अरे भाल्या, अरे एक गंमतच झाली’ हे वाक्य आले की समजावे पुढची पंधरा मिनिटे बघायला नको’. साधारण एक वर्षापूर्वी सूकोंडीतल्या एका वाडीतून एक बाई आली दवाखान्यात, सोबत तिचा नवरा आणि साधरण अठरा वर्षाची मुलगी विलक्षण भेदरलेली. मध्येच शून्यात बघे तर मध्येच आईच्या कुशीत शिरून रडू लागे. बापाचा चेहरा पण काळजीने उभा झालेला. डॉक्टर नाहीत म्हटल्यावर प्रकरण माझ्याकडे आलं. कोणी काही सांगायच्या आधी प्रकार काय असावा हे मला कळलेच होते.

‘सायेब, गुरांकडं गेली पोरगी आणि फशी पडली, कधी वर मान करून कुटबी जायाची नाय, आता बघा पाळी चुकली त्याला चार म्हयन झालं, कसं करावा आता?’. बापाने कैफियत मांडली. ‘अरे, तुम्ही आता चुकीच्या जागी आलात, खूप उशीर झाला आता. पोरीचं सगळं आयुष्य पडलयं अजून, एक काम कर, पोरीलाच तिचा कोण मित्र ते विचार, इथल्या पेक्षा त्या शिरू बामणाकडे जा आणि दोघांच्या डोक्यावर अक्षता टाकून दे म्हणजे झालं’. ‘भाल्या, अरे, परवा तीच पोर नवऱ्याला घेऊन पोराला ताप आला म्हणून दवाखान्यात. माझ्याकडे ओळखीचं बघून हसली तेव्हा तिच्या डोळ्यात मी वर्षांपूर्वी दिलेल्या योग्य सल्ल्याची कृतज्ञता होती रे, सालं बरं वाटलं’
अलीकडेच केव्हातरी त्या भागात गेलो..‘धन्वंतरी कसा आहे रे?..वय झालं असेल ना आता..’ मंडळातल्या भाल्या गुडेकरकडे चौकशी केली.. ‘वय कसलं होतयं त्याचं? भंडारवाड्यात पलीकडे मस्त घर बांधलंय, रोज साला ताजे मासे खातो.. बरं भंडारवाडा त्याला लागून, तिथे माडीला तोटा नाही, ओपीडी अजून सुरूच आहे त्याची, चांगला पेन्शन खाऊन टुणटूणीत आहे..‘भाल्याने धन्वंतरीची खुशाली सांगितली.. परत येईन तेव्हा धन्वंतरीला नक्की भेटायचं ठरवून निघालो.

(लेखक कोकणवर मनस्वी प्रेम करणारा व कोकण टिपणारा आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT