साखरपा, ता २५ : स्वातंत्र्यानंतर झालेल्या पाच युद्धात शत्रूच्या भूमीवर जाऊन लढण्याची संधी फार थोड्या सैनिकांना मिळाली; पण हातातोंडाशी आलेली ही संधी हुकलेले सैनिक म्हणजे नायब सुभेदार रवींद्र आठल्ये.
संगमेश्वर तालुक्यातील मेघी गावातील नायब सुभेदार आठल्ये हे ५ मराठा लाइट इनफन्ट्रीच्या रॉयल फलटणचे सैनिक. १९८५ ला प्रशिक्षण संपवून सैन्यात दाखल झाले आणि श्रीलंकेत अंतर्गत बंडाळी सुरू झाली. ती शमवण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी भारतातून शांतीसेना पाठवली. त्यात नायब सुभेदार आठल्ये हे होते.
श्रीलंकेत चावाकचेरी जिल्ह्यात त्यांनी सुमारे २७ महिने राहून शांती प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले. भरलेली बंदूक कडेला ठेवूनच झोपावं लागे, असे सांगत तिथल्या आठवणी आठल्येंनी जागवल्या.
एक दिवस एका धरणाच्या बांधावरून आठल्ये यांचे युनिट जात असताना श्रीलंकेतील तमिळ बंडखोरांनी फायरिंग केलं आणि त्यात आठल्ये यांच्या पुढे जात असलेले जवान आनंदा यादव यांचा बळी गेला. मृत्यू हा काही फुटांवर येऊन गेल्याची जाणीव तेव्हा झाल्याचे आठल्येंनी सांगितले.
कारगिल संघर्षाआधी आठल्ये यांचे युनिट पश्चिम बंगालच्या न्यू जलपाईगुडी इथे होतं. त्या पोस्टवर असताना नायब सुभेदार आठल्ये यांना प्रथमच राहण्यासाठी खोली मिळाली आणि कुटुंबाला आणण्याची परवानगीही. त्याप्रमाणे आठल्ये यांनी कोकणात येण्यासाठी तिकीट काढलं; पण अचानक एका रात्री त्यांना स्वप्न पडलं की, काहीतरी मोठी अडचण निर्माण झाली आहे तर कुटुंबाला आणू नका.
आठल्ये यांनी दुसऱ्याच दिवशी गावी येण्याचं रद्द केलं आणि त्याच दिवशी कारगिल युद्धावर जाण्याची ऑर्डर त्यांच्या युनिटला मिळाली.
कारगिल युद्धात काश्मीरचा धनसाल परिसर आठल्ये यांच्या युनिटच्या ताब्यात होता. तिथे असताना कारगिल युद्धाचा उत्तरार्ध सुरू झाला होता. आपली सगळी शिखरं ताब्यात आल्यावर पाकिस्तानात घुसायचं आणि पाकिस्तानी सैन्यावर त्यांच्याच भूमीत हल्ला करायचा, असं ठरलं होतं आणि त्याप्रमाणे ५ मराठा हे युनिट ते काम करणार हेही ठरलं होतं.
एकदा सीमा ओलांडली की, ७२ तास काहीही मिळणार नाही या वास्तवाची जाणीव ठेवून आठल्ये यांचं युनिट तयार होतं; पण त्याचवेळी, पंतप्रधानांनी अचानक तो हल्ला रद्द केला आणि हवाई हल्ले सुरू केले. त्यामुळे आठल्ये यांचं पाकिस्तानात घुसून शत्रूला मारण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकलेले नाही. अर्थात, सीमा ओलांडून हल्ला करण्याची संधी मिळाली असती तर जिवंत परत येण्याची शक्यता नगण्य होती, असेही आठल्येंनी सांगितले.
दोन्ही देशांदरम्यान असलेल्या नो मॅन्स लँडमध्ये पेरलेल्या भू-सुरूंगांची शिकार होण्याची शक्यता जास्त होती. युद्धादरम्यान पाकिस्तानवर हवाई हल्ले सुरू झाले. युद्धाचं सगळं चित्र बदललं. पाकिस्ताननं त्यांच्या सैनिकांचे मृतदेह ताब्यात घेण्यासही नकार दिला होता. बेवारस ३ मृतदेह मिळाले. अखेर त्या मृतदेहांवर आमच्या युनिटने अंत्यसंस्कार केल्याचे आठल्ये यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.