Kokan News esakal
कोकण

Kokan News : मुरली आणि सालींदरांचे काटे

मुरलीने दोन वर्षात दोन-सव्वादोन लाखएवढी रक्कम जमा केली होती.

सकाळ डिजिटल टीम

-राजा बर्वे, चिपळूण

कोकणातल्या समुद्र किनाऱ्यावरच्या त्या छोट्याशा खेडेगावात त्या काळी सकाळ लवकर उगवत असे आणि सायंकाळ मात्र रात्रीत पटकन बदलत असे. सुमारे १९८४-८५ चा काळ. तिन्हीसांजा होऊन तास-दीड तासात गाव समुद्राच्या गाजेच्या तालावर गपकन झोपी जात असे. रात्री दहानंतर मात्र लोक झोपलेले. विजेचा वापर कमी झाला की, मग उजेड वाढत जाई आणि मग गावातल्या त्या शांततेला मुरली डोळसाच्या शिलाई मशिनच्या आवाजाचे पार्श्वसंगीत लाभत असे. रात्री उशिरापर्यंत मुरली बायकांचे ब्लाउज, चोळ्या, परकर, गाऊन शिवत बसे. बंदरावर जायच्या पाखडीला लागून मुरलीचं जुनं घर होतं. रस्ता आणि जमिनीच्या पातळीवर गजांची लांबलचक पडवी, पुढे ओटी, माजघर, स्वयंपाकघर असं जुनं असले तरी प्रशस्त घर. मुरली कायम पडवीत गजाला टांगलेल्या अंधुक फिलामेंटच्या उजेडात शिवत बसलेला असे.

माझ्या घरापासून बँकेच्या वाटेवरच मुरलीचं घर होतं. जाता-येता नजरभेट तर कधी ‘काय, कसं काय?’ इतपत संवाद होई. मी अधूनमधून कधी जातही असे. गेलो की, चहा होई..‘ साहेब, निशिकांतला मुलाला SNDT मधून जेन्ट्स टेलरिंग कोर्सला घातलाय. यावर्षी पुरा होईल. ठाकरद्वारला मेहुण्याचे मोठे दुकान आहे. दहा-दहा मशिन तीन पाळ्यांमध्ये चालतात. शिकला की, तिथे दोन-चार वर्षे तिथे करील उमेदवारी. मग बघूया. आता दिवाळीत आला की, एक खाते उघडायला सांगतो तुमच्याकडे बँकेत.’ ‘मी त्याला म्हणतोय, मुंबईतच एखादे छोटे दुकान सुरू कर. इथे मुतात माशा मारत बसून आता काही व्हायचं नाही आणि त्याला जरा छानछोकीची आवड आहे,’ असे आमचे संवाद होत. राधा आणि मुरलीमध्ये मात्र फार सुसंवाद नाहीच; पण संवादही फारसा कधी होताना दिसत नसे. पुढे म्हटल्याप्रमाणे निशा बँकेत आला आणि खाते उघडून गेला.

मुरलीला एकच निशिकांत हा मुलगा. त्याच्या पाठीवर निशिगंधा म्हणून मुलगी झाली होती. चार वर्षांची असताना ताप डोक्यात गेल्याचं निमित्त झालं आणि दोन-चार दिवसात सगळा खेळ संपला. मुरलीचं हसरे घर अचानक मूक झालं. राधा मुरलीला दोष देत असे. मुरलीचं वय ५०च्या अलीकडे; पण मुरली किमान दहा वर्षांनी मोठा दिसे. जाड उलट्या भिंगाचा चष्मा, कानावर एक दीड इंचाचा घेरा सोडला तर बाकी वरचे केसांचे अस्तर विरळ झालेले, जुना लेंगा शर्ट, गळ्यात कायम टेप टाकलेली, बोटात अंगुस्तान, कानावर किंवा स्वतःच्या कॉलरला एखादी सुई अडकवलेली. मुरलीचं मोठं गिऱ्हाईक म्हणजे पाजपंढरीतल्या कोळणी. त्या काळी ब्लाउजपेक्षा पुढच्या गाठीच्या चोळ्या जास्त शिवत. हुक, बटणे काही नाही. चिटाचे, लाल-पिवळ्या सटीनचे कापड मुरली ठेवत असे. शिलाई कमी, पटकन शिवून होणाऱ्या या चोळ्यांना मागणी जास्त असे.
हळूहळू बँकेत येऊन मुरली रोख हजार, दोन हजार असे पैसे वरचेवर भरू लागला.

ही गोष्ट १९८६/८७ ची असावी. त्या काळी हजार-दोन हजार रोखीत भरणारी मंडळी कमीच. इतके पैसे मुरली वरचेवर कसे भरतो, हा कधीतरी मलाही प्रश्न पडत असे. एक दिवस बँकेत आला, हजार रुपये भरले आणि मला म्हणाला, ‘साहेब आता खात्यात रक्कम जास्त झाली. एक लाखाच्या दोन पावत्या करूया. मी देखील खाते नोंदी बघितल्या. मुरलीने दोन वर्षात दोन-सव्वादोन लाखएवढी रक्कम जमा केली होती. मुरलीच्या उत्पन्नाशी हा ताळमेळ जुळत नव्हता. मनातल्या मनात काहीतरी गडबड आहे, हे लक्षात येत होतं; पण मी काही बोललो नाही. एकेक लाखाच्या २ पावत्या करून दिल्या आणि मुरली गेला.


दुसऱ्या दिवशी मुरली आणि राधा दोघेही बँकेत हजर. मुरली बोलू लागला, ‘साहेब, हल्ली निशाने ठाकूरद्वारला स्वतःचे टेलरिंग दुकान सुरू केलंय, चांगली कमाई होते शिवाय सकाळी पहाटे लवकर पेपरची लाईन करतो. मग महिन्या-दीड महिन्यातून आला की, देऊन जातो दहा-वीस हजार. थोडे थोडे भर सांगतो.’ परत एकदा माझ्या मनात काहीतरी कुठेतरी चुकतंय, असा विचार आला. ‘मुरलीदादा, मुंबईत जरा पोरग्यावर जरा लक्ष ठेव नीट. दिवस जात राहिले आणि मुरलीचं खातं अवाजवी वाढत राहिलं..


मुरली एक दिवस बँकेत आला. बोलता बोलता काळजीत वाटला, ‘ साहेब, लोकांना बरं बघवत नाही हो, परवा दापोली पोलिस स्टेशनमधून साध्या वेशात दोन माणसे येऊन गेली..निशाची चौकशी करत होते..मुंबईत कुठे राहतो, काय करतो? बँकेत कुठे कुठे खाती आहेत? लॉकर आहेत का? मी त्यांना सांगितली सगळी माहिती...लोकांना कुणाचं चांगलं झालेलं बघवत नाही हो. कोकणातली माणसंच साली सालींदरासारखी, अंगावर कायम काटे घेऊन फिरणारी.. साहेब. पोरगा चांगले पैसे मिळतोय तर लोकांना बघवत नाही हो’...माझ्या मनात असलेल्या शंकेला कुठेतरी दुजोरा मिळत होता; पण मी मात्र शांत राहिलो.

त्यानंतर जेमतेम महिना झाला असेल नसेल आणि ती मुरलीचं घर आणि गाव हलवून टाकणारी बातमी आली. निशाच्या ठाकूरद्वारच्या दुकानातल्या पोटमाळ्यावर गोणीत भरलेलं निशाचं प्रेत सापडलं होतं. मुंबईतून दापोली पोलिस स्टेशनला संपर्क झाला आणि मुरली राधा मुंबईत गाडी करून धावले...आठ दिवसांनी परत आले तेव्हा उलगडा झाला. निशिकांत बापासरखा पैसा कमवायच्या मोहाने ड्रग आणि सोने पेडलर झाला होता. मुंबई आणि उपनगरापासून नाशिकपर्यंत ''माल'' वाहतूक करी. खेपेचे दोन-पाच हजार मिळत, तेच पैसे इकडे जमा होत होते नंतर पुरेसा पैसा जमा झाला म्हणून किंवा त्यातले चटके बसू लागले म्हणून म्हणा निशा त्या रॅकेटमधून बाहेर पडायचा प्रयत्न करत होता. मुरलीजवळ एक-दोनदा बोललादेखील होता. एकदा गावात येऊन पंधरा-वीस दिवस दडी मारून राहिलादेखील होता; पण एक दिवस दोन-तीन माणसे निशाच्या पाठीवर शोध घेत गावात आली.

मुरलीजवळ गोड गोड बोलून निशाला घेऊन मुंबईत गेली. निशाचा घाबरलेला चेहरा मुरलीला काही सांगत होता; पण मुरलीनेच त्याची समजूत काढून त्या माणसांबरोबर त्याला मुंबईत पाठवला होता. त्यानंतर चार-आठ दिवसांत ही घटना घडली. शेजारच्या दुकानातील लोकांना निशाच्या दुकानातून दुर्गंधी येऊ लागली आणि मग सगळ्याला वाचा फुटली.. मुरली मुंबईतली सगळी आवराआवर करून आला. पोलिसांकडे ''आमचं काही म्हणणं नाही, आमचा कोणावर संशय नाही'', असा जबाब देऊन मुरली घरी परत आला. मुरलीचं घर निशिगंधाच्या अकाली जाण्याने मूक झालं होतं आणि आता निशाच्या घातपाती मृत्यूनंतर पूर्ण उद्ध्वस्त झालं होतं. थोडे दिवस गेल्यावर आणि मुंबईतले प्रकरण शांत झाल्यावर वर्षभराने मी मुरलीला बँकेत बोलावला. सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या.

निशाचे त्याच्यासोबत असलेले खाते बंद करून घेतले. जवळजवळ पाच-सहा लाख रुपये खात्यात जमले होते. सगळे पैसे वेगळे करून त्याच्या आणि त्याच्या बायकोच्या नावाने मुदतीत ठेवून दिले. दरमहा व्याज दोघांना मिळेल, अशी व्यवस्था करून दिली. माझी बदली दुसऱ्या शाखेत झाली आणि हळूहळू मुरली आणि राधा विस्मरणात गेली. कोणी ओळखीचं भेटलं तर चौकशीत कळे ते वाईट होतं. राधा हळूहळू वेडसर होत गेली. मुरलीला ‘माझी दोन्ही पोरं तुझ्यामुळे गेली’, असं म्हणून मारतसुद्धा असे. मुरलीसुद्धा स्वभावानुसार शिलाईची कामे करत पैसा जोडत राहिला. गावातल्या ''सालींदरांचे'' काटे सोसत राहिला.

(लेखक कोकणवर मनस्वी प्रेम करणारा व कोकण टिपणारा आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT