मांत्रिक श्रीपतीची विष उतरवण्याची विद्या sakal
कोकण

मांत्रिक श्रीपतीची विष उतरवण्याची विद्या

चंद्र किंवा सूर्यग्रहण असेल तेव्हा स्पर्श झाल्यापासून मोक्षापर्यंत पूर्ण ग्रहणकाळात श्रीपती नदीत छातीइतक्या पाण्यात उभा राहून काहीतरी साधना करी. घरात जेवण वाढताना बायकांना मज्जाव असे.

CD

- राजा बर्वे

चंद्र किंवा सूर्यग्रहण असेल तेव्हा स्पर्श झाल्यापासून मोक्षापर्यंत पूर्ण ग्रहणकाळात श्रीपती नदीत छातीइतक्या पाण्यात उभा राहून काहीतरी साधना करी. घरात जेवण वाढताना बायकांना मज्जाव असे. बांगडी वाजली तर अर्ध्या पानावरून उठे..बायका मुलींच्या मासिक धर्मात तो शेजारी बांधलेल्या छोट्या झोपडीत चार-पाच दिवस वेगळा राही. झाडपाल्याच्या औषधांची चांगली माहिती श्रीपतीला होती. आवळा, हरडा, बेहडा, रिंगी, बिब्बा अशी अनेक फळे गोळा करून तो मुंबईला पाठवत असे. त्या काळी खेडला एकच डॉ. जाकी म्हणून डॉक्टर होते. काही लोक त्यांच्याकडे जात. बरेचसे श्रीपतीकडेच येत आणि बरे होत. श्रीपती त्यांना म्हणत असे, ‘अरे शंभर रोगांवर एकच उपाय म्हणजे बिब्बा आहे. कलीला याच बिब्ब्याच्या झाडाला ब्रह्मदेवाने बांधला होता ना! आता कलियुगात माणसे म्हणून कलीसारखी झाली आहेत. त्या झाडाकडे गुण असून परत फिरकतदेखील नाहीत.’

- राजा बर्वे ,परशुराम

मांत्रिक श्रीपतीची विष उतरवण्याची विद्या

कोकणात शिक्षणाचे आणि साक्षरतेचे प्रमाण वाढू लागले. त्याला आता तीस-चाळीस वर्षे होत आली; परंतु एकेकाळी सरकारने प्रौढशिक्षा अभियानाअंतर्गत गावागावात शिक्षकांना रात्रीचे साक्षरता वर्ग घेण्यास सांगितले होते. तो काळ होता १९६८ ते ७०चा. शिक्षकांना गुंडाळफळे, खडू, लाकडाची बनवलेली मोठी अक्षरे, गावकऱ्यांना पाट्या, पेन्सिली आणि दोन प्रभाकर कंपनीचे कंदील मिळत. रॉकेलसाठी खर्चदेखील मिळत असे. त्याला सादील म्हणत असत. माझे वडील हेडमास्तर आणि संघाच्या मुशीतले.

साहजिकच जे काम करायचे ते प्रामाणिकपणे. आठवड्यातून चार दिवस हा रात्रीचा प्रौढ शिक्षणवर्ग चाले. त्यासाठी रात्री वाड्यावाड्यांमध्ये रात्री जावे लागत असे. गाव मोठा आणि वाड्या दूर दूर. जाताना सोबत फळे, खडू, मरणाच्या जड अक्षरांचे पोते आणि प्रभाकर कंदिलाचा मिणमिणता उजेड. साहजिकच मदतीला सोबत मी जात असे. त्या वेळी माझे वय दहा वर्षांच्या आतबाहेर. दिवसभर शाळा आणि खेळ यामुळे अनिवार झोप येई; परंतु वडिलांच्या पुढे बोलण्याची हिंमत नव्हती. कधीतरी बहिणीदेखील सोबत जात असत. माझी आणि श्रीपतीची इथेच पहिली ओळख झाली. तो पन्नाशीचा आणि मी दहा वर्षांचा. वर्ग सुरू झाला की, कंदिलाची वात बारीक करून मी समोर बसत असे आणि वडील शिकवण्यात तल्लीन झाले की, मी पेंगत बसे.

तेव्हा श्रीपती त्याच्या मांडीचा आधार मला देई. त्याच्या मांडीवर मी मस्त झोप काढत असे. झोपच इतकी अनावर व्हायची की, अनोळखी असला तरी श्रीपती त्या वेळी जवळचा वाटायचा.
श्रीपती दादा जात्याचं हुशार.. साक्षरता वर्गात बघता बघता लिहा, वाचायला शिकला. त्या काळी गावात शिक्षकांना मान होता. एक दिवस घरी आला ते एक पोते घेऊन. त्यात हातसडीचे लाल तांदूळ होते. ‘मास्तर, तुम्ही आमाला लिवाया वाचाया शिकवलाव, लै उपकार तुमचे, हा पोरांना खिमाट खाया वाईच तांदुल घेऊन आलो. तेवडा न्हाई म्हनू नका’...त्या चिकट मऊभाताची चव आजही आठवते..
श्रीपतीचा मुख्य उद्योग शेती; परंतु पंचक्रोशीत तो प्रसिद्ध होता तो मांत्रिक आणि झाडपाल्याची औषधे देणारा वैद्य म्हणून. मंत्रतंत्र, जादूटोणा तो करत नसे तर साप, विंचू चावलेल्या माणसाचे विष तो मंत्राने उतरवत असे. आम्हा मुलांना अख्खी वाडी खेळायला आंदण दिलेली असे आणि त्या काळी आम्ही १५/२० जण टोळीने खेळत असू. श्रीपतीकडे कोणी दंश झालेला माणूस आला की, आम्ही त्याच्या घराकडे धाव घेत असू. श्रीपतीकडे दूरदूरहून असे दंश झालेले लोक येत. त्या काळी वाहतूक साधने रस्ते नव्हतेच. त्यामुळे ज्याला सर्प किंवा विंचूदंश झाला असेल त्याला डालग्यातून (बाबूंच्या जाड बिळपटांपासून विणलेली मोठी टोपली) किंवा डोलीतून आणले जाई. दंश होऊन बराच काळ गेला असला तर रोगी अर्धमेलासुद्धा झालेला असे.
श्रीपतीच्या घरासोर अंगणाच्या टोकाला एक खांब पुरलेला होता. रोग्याला त्या खांबाला बांधले जाई.

खांबाच्या वर एक कालिमातेची तसबीर लटकवलेली होती. आम्हाला त्या जीभ बाहेर आलेल्या आणि उग्र डोळे असलेल्या देवीच्या फोटोचीच भीती वाटे. आम्ही दुरून एखाद्या आडोशाला उभे राहून पुढचे दृश्य पाहत असू. रोग्याला बांधून झाले की, श्रीपती अंगावर केवळ एका पंचा नेसून समोर उभा राही. बाजूला एक भस्माची दगडी द्रोण आणि एक पाण्याने भरलेली कळशी. स्वतःच्या सर्वांगाला भस्म चोळून झाले की, थोडे भस्म श्रीपती कालीमातेच्या तसबिरीला लावत असे. तोंडाने घुमल्यासारखं काहीतरी पुटपुटत मग कळशीभर पाणी रोग्याच्या डोक्यापासून उतरत घाली. नंतर रोग्याच्या दंश झालेल्या जागी आणि कपाळाला भस्म लावी. दंश झालेल्या जागी आपल्या उजव्या हाताची मधली तीन बोटे रूतवत तोंडाने मंत्र म्हणे...असे काहीवेळ चाले. हळूहळू रोगी जातोss जातोss, असे काहीतरी बोलू लागे. परत एकदा श्रीपती कळशीभर पाणी आणि भस्म दंश झालेल्या माणसाला लावी.

इतके होईपर्यंत तो रोगी नॉर्मल होऊ लागे आणि डोलीत घालून आणलेला तो रोगी आपल्या पायांनी चालत परत जाई. हा सगळा तासाभराचा कार्यक्रम आमच्यासाठी थोडा भीती, उत्सुकता आणि करमणुकीचा असे. श्रीपती नेमके काय मंत्र म्हणतो, याचा मात्र कधी उलगडा झाला नाही की, त्याने कोणाला शिकवलं नाही. अंधश्रद्धा मानणाऱ्या काही मानवांना ही गोष्ट कदाचित कपोलकल्पित वाटेल; पण हे मी स्वतः त्या वयात पाहिले आहे.
श्रीपतीदादाची कुडी छोटी, जेमतेम पाच फूट उंची, गळ्यात कसल्या कसल्या माळा, शेंडी, झुपकेदार मिशा, शहाण्णव कुळी मराठा त्यामुळे गळ्यात जानवे, उजव्या दंडात चांदीची कालीमातेची छोटी मूर्ती दोऱ्यात बांधलेली, तब्येतीने बेतास बात असा श्रीपतीदादा साक्षरता वर्गामुळे माझा आवडता होता. कोकणात अशी अनेक गुणी माणसे गावागावात आहेत, होऊन गेली आहेत आणि अप्रसिद्ध राहून काळाच्या प्रवाहात गडपदेखील झाली आहेत. फक्त आपल्या अंगी असलेल्या गुणांना प्रकाशात आणणे आणि असलेल्या विद्या पुढच्या पिढ्यांकडे संक्रमित करणे; मात्र त्यांना कधी जमले नाही. कदाचित कोकणातल्या माणसांना हा नियतीचा शापच असावा.

(लेखक कोकणवर मनस्वी प्रेम करणारा व कोकण टिपणारा आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT