मत्स्यसंपदा योजनेत चार प्रस्ताव मंजूर
नौका बांधणीला सुरुवात; खोल समुद्रात करता येईल मासेमारी
रत्नागिरी, ता.२२ : प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या अंतर्गत खोल समुद्रात मासेमारीसाठी ४ नौका मालकांचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. जिल्ह्यातील ४ कोटी ८० लाख रुपयांचे प्रस्ताव मार्गी लागल्याची माहिती मत्स्य व्यवसाय विभागाचे प्रभारी सहायक आयुक्त आनंद पालव यांनी दिली.
यांत्रिक नौकेद्वारे मच्छीमारी करण्यासमोर अनेक आव्हाने उभी आहेत. मच्छीमारांनी धाडस दाखवून खोल समुद्रातील मच्छीमारीसाठी प्रस्ताव करावेत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहेत. त्यासाठी प्रत्येक प्रस्तावाकरिता १ कोटी २० लाखांची योजना आहे. यापैकी ७२ लाख रुपये अनुदान, तर बाकी लाभार्थी गटाने गुंतवणूक करावी, अशी अपेक्षा आहे. रत्नागिरी जिल्ह्यात चार नौकांचे खोल समुद्रातील मच्छीमारीचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. रत्नागिरी तालुक्यातील ३ आणि राजापूर तालुक्यातील १ असे चार प्रस्ताव आहेत. या नौकांची बांधणी सुरू झाली आहे. चालू हंगामात २ ते ३ नौका खोल समुद्रात प्रत्यक्ष मासेमारी करू शकतील, असा अंदाज आहे. अधिकाधिक मच्छीमारांनी या योजनेसाठी पुढे यावे, असे सरकारचे धोरण आहे. प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा एक भाग म्हणून पारंपरिक मच्छीमारांसाठी खोल समुद्रातील मासेमारी जहाजे संपादन करण्यासाठी समर्थन, निर्यात क्षमतेसाठी विद्यमान मासेमारी जहाजांचे अपग्रेडेशन आणि यांत्रिकी मासेमारी जहाजांमध्ये विशेष यंत्रणांची स्थापना करण्यास प्रस्तावित केले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पारंपरिक किंवा कारागीर मच्छीमार आणि त्यांच्या सोसायट्या, संघटना पात्र ठरू शकतात. लाभार्थ्यांकडे वैध मालकी प्रमाणपत्र, अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्र, मासेमारीचा परवाना आणि बायोमेट्रिक ओळखपत्र असणे आवश्यक आहे, तरच संबंधित लाभार्थ्याचा प्रस्ताव मंजूर होऊ शकतो, असे पालव यांनी सांगितले.
---------
चौकट
ट्यूना मासे पकडण्यास उपयुक्त
खोल समुद्रातील मच्छीमारीसाठी या क्षेत्रातील संशोधकांनी अनेक शिफारशी केल्या आहेत. अलीकडच्या वर्षांत ट्यूना जातीच्या मत्स्य प्रजाती प्रामुख्याने अल्बाकोर, बिगये, ब्लूफिन, स्किपजॅक आणि यलोफिन अशा आढळून आल्या आहेत. या प्रजातींच्या एकूण जागतिक पकडीत जवळपास अनेक पटींनी वाढ झाली आहे. ट्यूना प्रजाती अनेक देशांमध्ये अन्नाचा एक महत्त्वपूर्ण स्रोत आहे. नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट बोर्डद्वारे मत्स्योत्पादनात वाढ करण्यासाठी ओळखल्या गेलेल्या अनेक क्षेत्रांपैकी ट्यूना व तत्सम प्रजातीचे मासे पकडण्यास उपयुक्त आहेत, असे मत्स्य व्यवसाय विकास मंडळाने म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.