उमेदवार रमलेत कार्यकर्ते, कुटुंबासमवेत
जाधव, बेंडल, गांधी यांच्याशी संवाद ; दोन दिवस निवांतपणा
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. २२: राजकीय क्षेत्रांतील व्यक्तींना उसंतीचे दोन दिवस मिळतात ते केवळ मतदान झाल्यावर मतमोजणी होईपर्यंत. या दोन दिवसांत मनसेचे उमेदवार प्रमोद गांधी अंतर्मुख झाले आहेत. महायुतीचे राजेश बेंडल यांच्या घरी कार्यकर्त्यांचा राबता होता, तर आमदार भास्कर जाधव कार्यकर्त्यांच्या भेटीबरोबरच घरी आलेल्या नातेवाईकांसोबत दोन दिवस होते.
निवडणुकीच्या धामधुमीनंतर मतमोजणीसाठी दोन दिवस शिल्लक असताना गुहागर विधानसभेतील उमेदवारांची दिनचर्या काय आहे, हे जाणून घेण्यासाठी उमेदवारांशी संवाद साधला. त्या वेळी आमदार जाधव म्हणाले, आजपर्यंत ९ निवडणुका लढवल्यामुळे निकालाची फारशी चिंता करत नाही. मतदानानंतर कार्यकर्त्यांसोबत तपशीलात संवाद साधून आम्ही उद्या काय निकाल लागेल, हे आधीच जाणून घेतो. या वेळी दोन दिवस कार्यालयात बसून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी केल्या. त्याचबरोबर सध्या घरात भाऊ, त्यांच्या मुली, जावई, सुना, मुले अशी जवळपास १०० जण आहोत. त्यामुळे उर्वरित वेळ मी परिवारासोबत घालावला. या वेळी राजकारणाशिवाय एकमेकांच्या सुखदु:खाच्या गप्पा सुरू आहेत.
प्रथमच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेले महायुतीचे उमेदवार बेंडल म्हणाले, यापूर्वी विधानसभा, लोकसभेच्या निवडणूक व्यवस्थापनात महत्वाची भूमिका बजावली; परंतु प्रत्यक्ष उमेदवार असल्याने निकालाबाबत उत्कंठा आहे. दिवसा अनेक मंडळी भेटायला येतात. मतदानापर्यंत आम्ही जे सांगत होतो ते कार्यकर्ते ऐकत होते. हे दोन दिवस आम्ही कार्यकर्ते काय सांगतात ते ऐकतो आहोत. वडिलांसोबत काम केलेली काही ज्येष्ठ मंडळी येऊन भेटली. गप्पा मारताना भावूक झाली. त्यातून पुन्हा एकदा वडिलांचे मोठेपण समजले.
----
मतदारांच्या विचाराने अंतर्मुख
निवडणुकीचा कोणताही पूर्वानुभव नसलेले प्रमोद गांधी मात्र या निवडणुकीतील प्रचारानंतर अस्वस्थ आहेत. गांधी म्हणाले की, आमच्याकडे कार्यकर्त्यांची कमी होती तरीही अनेकांनी आपण उमेदवार असल्याप्रमाणेच काम केले. असे जीव देणारे कार्यकर्ते या निमित्ताने भेटले. थेट जमिनीवर उतरून काम केल्याचा आनंद मिळाला; परंतु मतदान संपल्यानंतर मतदारांच्या मानसिकतेने अंतर्मुख झालो आहे. अनेक वाड्यावस्त्यांवर विकास नको, समस्या नको आम्हाला काय देणार ते सांगा, ही मानसिकता लक्षात आली. मतांची दलाली करणारे मध्यस्थ भेटले. हव्यासापोटी विचारधारा सोडण्यास तयार असलेले कार्यकर्तेही भेटले. हे सर्व कधीतरी संपले पाहिजे. समाजाच्या मानसिकतेत बदल झाला पाहिजे, असे वाटू लागले आहे, अशी प्रतिक्रिया प्रमोद गांधी यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.