गुहागर (रत्नागिरी) : एसटी महामंडळाच्या रत्नागिरी विभागातून राज्यात कुठेही आंबा पोचविला जाणार आहे. परिणामी राज्यातील जनतेपर्यंत थेट बागेतून स्वस्त दरात, सहजतेने रत्नागिरी हापूस उपलब्ध होणार आहे. मुंबई-पुण्याबरोबर राज्यातील अन्य मोठ्या शहरांत नवी बाजारपेठ मिळवण्याची संधी आंबा व्यावसायिकांना आयती चालून आली आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी रत्नागिरी विभागीय कार्यालयातील १० अधिकाऱ्यांसह ९ आगारातील २० कर्मचारी आंबा बागायतदारांच्या भेटी घेत आहेत.
कोरोनाच्या संकटानंतर एसटी महामंडळ फायद्यात येण्यासाठी एसटीने माल वाहतूक सुरू केली. किराणा माल, इमारती बांधकामासाठी आवश्यक साहित्य, औद्योगिक माल आदी विविध प्रकारच्या मालाची वाहतूक एसटी करत आहे. येत्या आंबा हंगामात रत्नागिरी विभागातून आंबा वाहतूक करण्याचे नियोजन एसटी महामंडळ करत आहेत. आंबा बागायतदार आणि खरेदीदार या दोघांचाही फायदा विचार या योजनेत आहे. थेट बागेतून किंवा पॅकिंग हाउसमधून आंब्याच्या पेट्या उचलणे, एसटीने निश्चित केलेल्या ठिकाणी बागायतदारांनी पेट्या आणून देणे, एकाच व्यापाऱ्याकडे सर्व माल उतरविणे, शहरातील विविध भागात ट्रक जाऊ शकेल, अशा ठिकाणी नगावर माल उतरविणे, असे पर्याय एसटीने खुले ठेवले आहेत.
राज्यातील एखाद्या शहरातून एसटीकडे आंब्याची मागणी केली गेली तर त्या ग्राहकाला थेट बागायतदाराशी जोडून देण्याचे कामही एसटी करणार आहे. या नियोजनामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदारांना संपूर्ण राज्याची बाजारपेठ खुली होणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील जनतेला कोकणच्या बागेतील आंबा उपलब्ध होणार आहे.
ट्रकमध्ये आवश्यक ते तांत्रिक बदलही
५ डझनाच्या लाकडी खोक्यापासून २ डझनाच्या पुठ्ठ्याच्या खोक्यापर्यंत सर्व पॅकिंगमधील आंबा एसटी स्वीकारणार आहे. पुठ्ठ्याचा खोका फाटू नये, तळातील आंबापेटीवर दाब पडू नये, वाहतुकीदरम्यान ट्रकमधील आंबा खोके सरकू नयेत, हवा खेळती राहावी, यासाठी एसटी आपल्या ट्रकमध्ये आवश्यक ते तांत्रिक बदलही करणार आहे.
"रत्नागिरी जिल्ह्यातील मोठ्या बागायतदारांसह छोट्या बागायतदारांनाही किफायतशीर दरात, राज्यात कुठेही आंबा पाठविण्याची व्यवस्था आम्ही करत आहोत. २०२० च्या हंगामातील अखेरच्या दिवसांत सुमारे ३५०० लाकडी खोक्यांची वाहतूक आम्ही केली. मुंबई उपनगरे, पुणे, वाशी मार्केटसह अकोला, औरंगाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आदी जिल्ह्यात एसटीने आंबा पोचला."
- अनिल म्हेत्तर, विभागीय वाहतूक अधिकारी, रत्नागिरी
हेही वाचा - अबब ! पाच डझन हापूसला चक्क १ लाख ८ हजार!
एक नजर
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.