सिंधुदुर्ग - नैसर्गिक साधनसंपत्ती, सांस्कृतिक परंपरा, पर्यटनस्थळे, स्वच्छ समुद्रकिनारे, खाद्यसंस्कृती यामध्ये सिंधुदुर्ग व गोवा राज्यात कमालीचे साधर्म्य आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या आयात-निर्यातीत एकमेकांवर अवलंबून असलेल्या या दोन्ही प्रदेशात सलोख्याचे संबंध आहेत. जागतिक पर्यटनाच्या नकाशावर असलेले गोवा राज्य आज एक औद्योगिक केंद्र म्हणून नावारूपास येत आहे. राज्य छोटे असल्याने व मनुष्यबळाला मर्यादा असल्याने आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो तरुण-तरुणी रोजगारासाठी गोव्याशी ‘कनेक्ट’ आहेत. सिंधुदुर्ग-गोवा सीमेवर मोपा येथे साकारत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मितीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. सुरुवातीच्या काळात नोकरीसाठी मुंबईकडे धावणारा तरुण आज गोव्यात स्थिरावू लागल्याने सिंधुदुर्ग व गोव्याचे रोजगाराचे नाते अधिक घट्ट बनू लागले आहे; मात्र जिल्ह्यातील तरुणांना रोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. त्यामुळे सिंधुदुर्ग ‘औद्योगिक हब’ झाल्यास रोजगारनिर्मिती होईल, असे मत काहींनी व्यक्त केले असून, या विषयावर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न....
गोव्याकडे वाढता कल
गोवा राज्याच्या निर्मितीनंतर राज्याने उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचा पुरेपूर उपयोग करत येथील पर्यटन व्यवसायाला चालना दिली. संपूर्ण देशात तसेच पर्यटनाच्या जागतिक नकाशावर आज गोवा प्रसिद्ध आहे. दरवर्षी १५ लाखांहून अधिक विदेशी पर्यटक गोव्याला भेट देतात. देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून नावलौकिक मिळविलेला सिंधुदुर्ग जिल्हा व गोवा राज्य यांच्यात पर्यटन दृष्टिकोनातून कमालीचे साधर्म्य आहे; मात्र राजकीय अनास्थेमुळे सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनात मागासलेलाच राहिला आहे. पर्यटनस्थळे दुर्लक्षित राहिल्याने साहजिकच येथे उद्योगनिर्मितीला चालना मिळाली नाही. त्यामुळे साहजिकच आजचा युवा वर्ग रोजगारासाठी गोव्यावर अवलंबून राहिला आहे. सुरुवातीच्या काळात मुंबई, पुणे या मेट्रो शहरांना युवकांची नोकरीसाठी पहिली पसंती असायची, मात्र आता नजीकच गोव्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्याने युवकांसाठी हे सोयीचे ठरत आहे.
औद्योगिक हब
पर्यटन हा गोव्याच्या अर्थकारणाचा मुख्य गाभा आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी गोवा शासनाने विविध योजना अंमलात आणल्या आहेत. गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री (कै.) मनोहर पर्रीकर हे उच्च शिक्षित असल्याने त्यांनी गोव्याची ओळख केवळ पर्यटन न ठेवता गोव्याला ‘औद्योगिक हब’ कसे बनविता येईल, याकडे लक्ष दिले. त्यांनी नियोजनपूर्वक अभ्यास करून अनेक मोठे उद्योगधंदे गोव्यात कसे येतील, यासाठी प्रयत्न केले. आज गोव्यात उत्तर व दक्षिणेत हजारो कारखाने निर्माण झाले आहेत. गोवा शासनाने जाचक अटी न ठेवता अत्यल्प नियमावली ठेवून अनेक उद्योगधंद्यांना राज्यात प्रवेश दिला. यामुळे देशातील बडे उद्योजक आपोआपच गोव्याकडे आकर्षित झाले. गोवा शासनाने यासाठी अनेक सवलतीही देऊ केल्यात. आज हजारो उद्योगधंदे राज्यात निर्माण झाल्याने गोवा हे पर्यटनाबरोबरच ‘औद्योगिक हब’ म्हणून नावारूपास आले आहे.
मनुष्यबळाची कमतरता
गोवा हे लोकसंख्येने व क्षेत्रफळाने छोटे राज्य आहे. राज्यात हजारो कारखाने निर्माण झाले; मात्र कुशल व अकुशल कामगारांची कमतरता उद्योगधंद्यांना जाणवू लागली. गोव्यात तेवढ्या संख्येने मनुष्यबळ उपलब्ध होत नव्हते. यासाठी इतर राज्यातून मनुष्यबळाची मागणी वाढली. साहजिकच याचा सर्वाधिक फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्याला झाला. उपलब्ध आकडेवारीनुसार आज सिंधुदुर्गातील विशेषतः सीमेवरील सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले, कुडाळ तालुक्यातील ३० हजारांहून अधिक युवक नोकरीनिमित्त गोव्यातून ये-जा करतात. यामध्ये खासगी कंपन्या तसेच हॉटेलिंग व्यवसायाचा समावेश आहे. गोव्यातील अनेक कंपन्यांमध्ये जिल्ह्यातील युवक उच्चपदावरही कार्यरत आहेत. आज गोव्यातील तब्बल ९० टक्के खासगी आस्थापनांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण नोकरी करत आहेत. याठिकाणी दहावी, बारावीपासून ते उच्च पदवी प्राप्त युवकांसाठी नोकरीत अनेक संधी उपलब्ध असल्याने तरुणांची गोव्याला पहिली पसंती आहे.
कोरोनाचा फटका
कोरोनाच्या जागतिक माहामारीचा फटका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोकरदारांनाही बसला. संपूर्ण देशात अचानक लॉकडाउन करण्यात आल्याने सिंधुदुर्गातील हजारो युवक गोव्यात अडकले होते. राज्यांच्या सीमा बंद असल्याने त्यांना घरी परतणे कठीण झाले होते. यावेळी सिंधुदुर्ग व गोवा प्रशासनाने समन्वयाची भूमिका घेत गोव्यात अडकलेल्या युवकांना जिल्ह्यात पाठविले होते. दोन वर्षे कडक निर्बंध असतानाही व परराज्यातून वाहतुकीस बंदी असतानाही गोवा शासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातून नोकरीसाठी येणाऱ्या तरुणांसाठी नियम शिथिल केले होते. यावेळी सिंधुदुर्ग व गोवा राज्यातील ‘रोजगाराचे कनेक्शन’ अधोरेखित झाले होते.
जीवावरचा रोजगार
सिंधुदुर्गातील युवक-युवती गोव्यात रोज ये-जा करण्यासाठी दुचाकी, मोटार, एसटी किंवा गोवा परिवहन महामंडळाच्या कदंबा बसचा वापर करतात. एकूण नोकरदार संख्येच्या ९५ टक्के जण वाहतुकीसाठी दुचाकीचा वापर करतात. गेल्या काही वर्षांत दुचाकीने प्रवास करणाऱ्या कित्येक तरुणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे पोटासाठी दररोज ये-जा करणाऱ्या तरुणांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.
गोव्यात एकूण २० औद्योगिक क्षेत्रे
वेर्णा ही सर्वात मोठी औद्योगिक वसाहत, तुये, कोलवाळ, डिचोली, म्हापसा-करासवाडा, पिळर्ण, होंडा, पिसुर्ले, खोर्ली, कुंडई, बेतोडा, तिस्क, साखळी, शिरोडा, मडगाव, काकोडा, सांगवे, काणकोण, मडकई, कुंकळ्ळी. राज्यात ७ हजार ११० लघू, मध्यम उद्योग
जिल्ह्याला हवा पर्याय!
सिंधुदुर्ग जिल्ह्यात औद्योगीकरण नसल्याने जिल्ह्यातील तरुण मोठ्या संख्येने नोकरीसाठी गोव्याला जात आहेत. यामध्ये वेळ, पैसा वाया जात असून, दगदग होत असल्याने आरोग्याचा प्रश्नही निर्माण होत आहे. त्यामुळे पर्यटन जिल्हा म्हणून नावलौकिक असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात औद्योगीकरण होणे ही काळाची गरज आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.